September 27, 2023
Prof Dr Jalandar Patil article on Farmers Problems
Home » शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?

जपानमधील ‘सामुराई’ या क्षत्रिय जातीने जातीनिबंध मोडून राष्ट्र बलवान करण्यासाठी जसा पुढाकार घेतला तसा या देशातील उच्चभ्रू, सुस्थित वर्ग शेतीक्षेत्रात येणार असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे; पण आजघडीला तरी ते मृगजळ ठरलेले आहे.
प्रा. डॉ. जालंदर पाटील

प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, महाराष्ट्र
मोबाईल – 9421201500

एकरेषीय विचारधारेतून शेतकऱ्यांच्या जगण्याचे मूल्यांकन होऊ नये. सहज साध्या तर्काने, विशिष्ट प्रकारच्या जीवनधारेतील ठोकताळ्यात त्याच्या जीवनाचा विचार होऊ लागल्यामुळेच काही प्रश्न उभे राहिलेले दिसतात. शेतकऱ्याच्या जगण्याची जातकुळी शोधायला काही वर्षे शेतावर काम करायला हवे. ऊन, वारा, वादळ, पाऊस, नैसर्गिक आपत्ती. बाजारपेठ याचे ऊन पावसाळे झेलल्याशिवाय शेतीची दुःखे कळणार नाहीत. बालपणी पेनातील रिफील घ्यायलाही बापाचा खिसा का कचरत होता. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला नवे कपडे घेताना बाप सैरभैर का होत होता, याची उत्तरे काळाच्या गर्भात लोप पावलेली असली तरी आमच्या पिढीची ती वस्तुस्थिती होती. बदललेल्या काळाने, संघर्षाने, चळवळीने हे चित्र थोडेफार बदललेले असले, तरी ठिगळ लावलेली चड्डी आणि रफू केलेल्या शालेय जीवनातील शर्टनेच आम्हाला जमिनीवर आणले. शिकायला भाग पाडले. त्यामुळेच सुस्थिर जीवनाचा आनंद आज भोगता आला.

शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन सुस्थिर झालेले जेव्हा लेखणी आणि राजनीतीच्या माध्यमातून जन्मदात्यांवरच आसूड ओढतात तेव्हा मात्र मन खंतावते. आजमितीला अनेक गोरगरीब शेतकऱ्यांची मुले शिकली, नोकरीला लागली, त्यातील काही राजकारणाच्या केंद्रस्थानीही गेली. त्यांचे नाळ-संबंध शेतीतील आहेत. ते जन्माने शेतकरी कुटुंबातील आहेत म्हणून त्यांना शेतकरी म्हणता येईल का ? राजकारणात आणि बौद्धिकतेच्या उत्तुंग शिखरावर अनेक शेतकरीपुत्र आज कार्यरत आहेत. पोरगा खुर्चीवर आणि न्यायासाठी त्याचा शेतकरी बाप रस्त्यावर असे चित्र कृषिप्रधान भारतात आज पहायला मिळत आहे. शिक्षणाने चांगली कपडे अंगावर आले की नऊवारी साडीतील आई आणि पंजा पटक्यातल्या बापाचे विस्मरण करणारे शिक्षण खरंच कोणासाठी? बापाला शेतगडी, घरगडी आणि आईला मोलकरीण म्हणून राबवणारे महाभागही खूप आहेत. शहराबरोबर खेड्यांनाही ही दाहकता आज भाजून काढीत आहे. आजमितीला शेतकऱ्याच्या यादीत दिवसागणिक भर पडत आहे.

अनुत्पादित आणि भांडवलदार वर्गाचा शेतीवरील भार वाढत आहे. अंबानी, अदानी यांच्यासह अनेक सिनेअभिनेते आज शेतकरी बनलेले आहेत. ज्यांच्या हाताला कधी मातीच लागली नाही. ज्यांनी नांगराचा मुठ्या कधी हातात धरला नाही त्यांनी किलोमीटरच्या हिशेबाने जमिनी खरेदी केल्याची खंडोगणती उदाहरणे देता येतील. त्यांच्या गर्भात अनैतिक मार्गाने कमवलेले उत्पन्न लपवण्याचे मोठे षड्यंत्र आहे; शिवाय त्यांच्या मदतीला कार्पोरेट फार्मिंगचे वरकरणी शेतीहित दाखवणारे कायदेही आज बळकटीला येताना दिसतात. हा सर्व अनुत्पादित भांडवलदार वर्ग बलवान कृषी राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने शेतीक्षेत्रात येत नाही. हे धोरणकर्ते का ओळखत नाहीत, हाच खरा तर संघर्षाचा मुद्दा आहे.

जपानमधील ‘सामुराई’ या क्षत्रिय जातीने जातीनिबंध मोडून राष्ट्र बलवान करण्यासाठी जसा पुढाकार घेतला तसा या देशातील उच्चभ्रू, सुस्थित वर्ग शेतीक्षेत्रात येणार असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे; पण आजघडीला तरी ते मृगजळ ठरलेले आहे. दिशा आणि लक्ष्य स्पष्ट असेल, तर जगण्याचा प्रवास सुखकर होतो. सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवले आणि दृष्टिपथात आलेली स्वप्ने धडाधड कोसळून जातात. परवा झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिले. त्याचा सर्वाधिक फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. कष्टाच्या बळावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला वाकवण्याची धमक असलेला शेतकरी तर हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे पुरता हतबल झाला. सोयाबीन, भुईमूग सारखी सर्व खरीप पिके संपून गेली. शेडनेटमधील फूलशेतीचे नुकसान तर कल्पनेपलीकडे झाले.

शेतीतील दुःखे सांगून कधीच येत नाहीत. कालपर्यंत ती शेतकऱ्याला हसवत होती. आज धाय मोकलून रडवताना दिसतात. क्रूर नियती त्याच्याशी अशी का वागते, हेच कळत नाही. स्वप्नपूर्तीच्या सर्वच वाटा वैरी होतात तेव्हाच शेतकरी आत्महत्येच्या विचारात गढून जातो. आजअखेर झालेल्या शेतकरी आत्महत्या या सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीची थडगी आहेत. ही संकटे म्हणजे लोकनेत्यांना अनुकंपा तत्त्वावर घोषणा करायला आणखी एक संधीच म्हणायची; पण त्यांच्या घोषणांनी पोट भरत नाही, हे त्यांना सांगणार कोण?

बेसुमार वृक्षतोड, खनिज उत्खनन यंदा पावसाळ्यात आलेल्या आपत्तीला कारणीभूत असल्याचे अभ्यासक, संशोधक बोलतात. पण राज्यातील नैसर्गिक संपत्तीचे स्त्रोत सहजपणे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला तुम्ही लोकनेत्यानीच बहाल केले ना. त्यांच्या खासगी साम्राज्याचे अल्पावधीत उभे राहिलेले इमले तुमच्याच राजकारणाचे आधारवड आहेत. त्याची शिक्षा मात्र येथील भूमीपुत्राला भोगावी लागते. विज्ञानयुगाची श्रीमंती नोटात लपलेली असली तरी अर्धा भाकरीने भरणारी पोटाची श्रीमंती ही शेतकऱ्याची शेतीच भागवणार आहे याचा विसर पडता कामा नये.

Related posts

प्रकाश सापळा तंत्रज्ञान काय आहे जाणून घेऊ या

शेती पंप वीज बिलांची दुरुस्ती करताना `ही` घ्या काळजी

इथरेल फवारणीचे चांगले परिणाम मिळण्यासाठी…

Leave a Comment