२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पैठण येथे झालेल्या पाचव्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनात संत एकनाथ ज्ञानपीठावरून इंद्रजीत भालेराव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
पाचव्या शेतकरी साहित्य संमेलनाच्या मांडवात माझ्यासमोर बसलेल्या शेतकरी, शेती प्रेमी, रसिक अशा माझ्या भावांनो आणि बहिणींनो!
साष्टांग दंडवत! प्रणाम!!
तुमच्याशी संवाद साधताना, बोलताना मला फार फार आनंद होतो आहे. मी तुमच्या पेक्षा वेगळा नाही. माझ्या कविता चळवळीच्या उपयोगी पडल्या आणि युगात्मा शरद जोशी यांना त्या फार फार आवडायच्या, या एकाच योग्यतेमुळे मी इथं बसलो आहे. साहेबांनी आणि आपणही माझ्यावर अतूट प्रेम केलेलं आहे. आपला मी अत्यंत ऋणी आहे. तुमच्यासमोर मी जे बोलणार आहे. त्यात काहीही आगळं वेगळं, विचार करून मांडलेले हे शब्द नाहीत. सहज सुचलेले असे हे माझे शब्द आहेत. कवीला सुचतंच असतं. कवीचे विचार मनातून येतात, मेंदूतून नाही. त्यामुळे इथं विचाराऐवजी मी भावनाच मांडलेल्या आहेत. त्यात काही कमी-जास्त असेल पण काळबेरं काही नाही, याची खात्री मी देऊ शकतो. तुम्हाला चटणी भाकरीची सवय आहे. तसंच हे समजा. तुम्हाला तेच जास्त आवडतं हे मला माहीत आहे. माझी भाकर पिठाळ आणि पिठलं गाठाळ असणार याची मला जाणीव आहे. मला माझ्या उणीवा दाखवा. साहेबांनी नसता का कान धरला? तसा तुम्हीही धरा !
गंगाधर मुटे यांनी मागे एकदा माझ्या एकाच कवितेवर “शेतकरी संघटक” मध्ये एक अप्रतिम लेख लिहिला होता. त्या कवितेच्या शब्दाशब्दात शेतकरी संघटनेचं तत्त्वज्ञान कसं भरलेलं आहे. ते त्यांनी दाखवलं होतं. कवितेची ही समीक्षा निराळीच होती. रूढ समीक्षकांनी ती कविताच नाही. असं म्हटलं होतं. अजूनही म्हणतात. तिथं हा माणूस तिच्यातलं तत्त्वज्ञान दाखवत होता, मी हरखून गेलो. कृतज्ञता दाखवण्यासाठी आणि ओळख करून घेण्यासाठी लेखा खालच्या संपर्क क्रमांकावर मी त्यांच्याशी संपर्क केला, ती त्यांची माझी पहिली ओळख. आणखी काही वेळा आम्ही असेच दुरध्वनीवरुनच भेटत राहिलो. त्यांनी वर्ध्याला शेतकरी साहित्य संमेलनाचं पहिलं अधिवेशन आयोजित केलं आणि साहेबांना अध्यक्ष केलं. मला थेट उद्घाटकचं केलं. मी उडालोच, नाही नाही म्हणालो. मोठ्या संकोचाने त्यांच्या आग्रहाला बळी पडलो. पण मला काही उद्घाटनाच्या वेळे पर्यंत पोहचता आलं नाही. खूप अपराधी वाटलं. मग मी वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन अपराधभाव झाकला.
१) पैठणला संमेलन होणे हे उचितच
पैठणला संमेलन होणे ही अत्यंत योग्य अशी गोष्ट आहे. ते धार्मिक स्थळ आहे, म्हणून मी म्हणत नाही. ते माझ्या सोयीसाठी निवडलं म्हणूनही मी असं म्हणत नाही. तर शेतकरी संमेलन इथं होणं जास्त का योग्य आहे, ते मी सांगणार आहे. पैठण ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आद्य वसाहत आहे. इथूनच शेतकऱ्यांनी शेतीला सुरुवात केलेली आहे. आपण इथं आलोय ते शेतकऱ्यांची मूळं शोधायला इथं आलोय असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच इथं संमेलन होणं किती योग्य आहे, ते सांगतोय.
प्राचीन काळी इथला शेतकरी इतका समृद्ध होता की त्याचा परदेशाशी व्यापार चालायचा. गोमेद आणि रेशमी वस्त्रांची इथून परदेशात निर्यात होत असे. त्यातून मोठे परकीय चलन प्राप्त होत असे. इतका तो प्रगत होता. आज आपला शेतीमाल परदेशात पाठवायला किती यातायात करावी लागते ते आपण पाहतो. किंबहुना आयात निर्यातीचे परवाने हे मंत्र्यांना समृद्ध करणारी आणि शेतकऱ्यांना कंगाल करणारी गोष्ट झालेली आहे. इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० असे ४६० वर्षे इथं राजधानी असलेल्या सातवाहनांची सत्ता होती. शेतकरी सुखी ठेवला तर सत्ता किती दिवस टिकवता येते त्याचे ते उदाहरण आहे. आजच्या सत्ता एक एक दिवस मोजूनच परेशान होताना आपण पाहतो.
शेतकऱ्यांचे हाल अहवाल दाखविणारा “गाथा सप्तशती” हा ग्रंथ सातवाहनाने संकलित आणि संपादित केलेला आहे. गोदावरीच्या परिसरात म्हटली जाणारी ही प्राचीन शेतकरी लोकगीत आहेत. प्रत्यक्षात संकलित केलेल्या एक कोटी गाण्यातून निवडलेली ही सातशे गाणी आहेत. इतिहासानं ज्यांच्या जगण्याची नोंद कधीच केली नाही. अशा सामान्य शेतकरी माणसाच्या जगण्याची नोंद या गाण्यात आहे. आणि हे सगळं एका राजाने केलं आहे. ज्या काळातले राजे स्वतःवर ग्रंथ लिहिण्यासाठी कवींना कामावर ठेवत त्या काळात त्या काळात त्याने हे काम केलेले आहे. का नाही टिकणार त्याची सत्ता 460 वर्षे? सुरुवातीला संस्कृत पंडितांनी लोकभाषेतल्या या ग्रंथाची हेटाळणी केली आणि नंतर त्यांनी या ग्रंथाची लोकप्रियता पाहून त्यांची संस्कृत भाषेत भाषांतर केली.
काय आहे या गाथांमध्ये? मुलाच्या डोक्यावर कर्ज ठेवून मरणारा बाप आहे, फाटक्या कपड्यांच्या चिंध्यांतून निथळणाऱ्या पाण्यासारखा रडणारा शेतकरी आहे, आपल्या नवऱ्याच्या गरिबीला लाजवण्यासाठी नटून-थटून येऊ नका असं माहेरच्या माणसांना सुनावणारी सासुरवासीन आहे, घरातलं दारिद्र्य लक्षात घेऊन आपले कोणतेच डोहाळे कोणालाच न सांगणारी गरोदर शेतकरी स्त्री आहे, आपल्या गरीब शेतकरी नवऱ्याची गरिबी झाकण्या इतकी अफाट माया आपल्या नवर्याला देणारी शेतकरी स्त्री आहे, कधी कल्पनाही न केलेले रंगीत लुगडे नेसायला मिळाल्यामुळे रस्ता भरून वाटणारी शेतकरी स्त्री आहे, पत्नीच्या उबेच्या खात्रीने एकुलते एक घोंगडे देऊन त्या बदल्यात बैल घेणारा गरीब शेतकरी आहे, ताब्यात आलेल्या शेतकऱ्याला त्रस्त करणारी थंडी आहे, थंडीने रखरखीत झालेल्या त्वचेला लावायला तेल मिळत नाही म्हणून पाणी लावणारा शेतकरी आहे, अश्या कितीतरी हृदयस्पर्शी कहाण्या सांगून शेतकरी जीवनाचं वास्तवं या गाथांनी जगासमोर आणलं आहे.
गेली सहाशे वर्षे ज्यांच्यामुळे पैठणचं माहात्म्यं टिकून आहे त्या नाथांनीही शेतकऱ्याविषयी काही कमी कळवळा दाखवला नाही. आपला बाप बहुजनांची बाजू घेतो म्हणून एकुलता एक मुलगा दूर गेला तरी नाथांनी बहुजनांना दूर केले नाही. त्यांचं सगळं लेखन विद्वानांमध्ये मान्यता पावलं असलं तरी त्यांनी ते निर्माण केलं सामान्यांसाठी. नाथांनी भागवताची रचना जरी काशीला केली असली तरी त्यांच्यासमोर सतत होता तो महाराष्ट्रातला सामान्य माणूसच. त्या सामान्य माणसाला आपले म्हणणे पटवण्यासाठी नाथांनी सतत शेतीमातीतीलच उदाहरणं दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात सतत शेतीचे संदर्भ येतात. त्यांचे भागवत म्हणजे शेतीचंही भागवत आहे. असं नेहमी मला वाटत आलेलं आहे.
उत्पत्ती स्थिती आणि लयीचं तत्त्व समजून सांगताना नाथांना शेतीचंच रूपक आठवतं. स्वतःच्या हातानं उत्कंठतेनं पेरलेलं, लेकराच्या मायेनं जोपासलेलं पीकही शेतकरी कापून काढतो. हाच या सृष्टीच्या उत्पत्ती-स्थिती-लयीचा सिद्धांत आहे, असं नाथ सांगतात. हे सगळं करताना शेतकरी हाच ब्रह्मा, विष्णू, महेशाची रूप आहेत, असंही सांगायला नाथ विसरत नाहीत. सिंचना विषयीच्या नाथांच्या ओव्या तर पाहण्यासारख्या आहेत.
का अनावृत मेघजळा
धरणी धरुणी घालिजे तळा
मग नेमेची ढाळीजे ढाळा
पिकालागी जळा, काढिजे पाट
का मळा सिंपावया लागुणी
मोटपाट उपाय दोन्ही
मोटा काढीजे विहीरवणी
बहुत कष्टोनी, अतिअल्प
मोट नाडा बैल जोडी
अखंड झोडीता आसुडी
येजा जाता ओढाओढी
भोय भिजे थोडी, भाग एक
तेथंही मोट फुटे का नाडा तुटे
ओडव पडे बैल अवचटे
तरी हाता येता पीक आटे
ओल तुटे, तात्काळ
तैसा नव्हे सरीतेचा पाट
एकवेळ केल्या वाट
अहर्निशी घडघडाट
चालती लोट, जीवनाचे
जणू त्यांनी पाहिलेले स्वप्न सहाशे वर्षांनी शंकरराव चव्हाणांनी जायकवाडी धरणाच्या रूपानं पूर्ण केलं. तेच पाणी आमच्या परभणी जिल्ह्यात आलं आणि आमची पिढी शिकलीसवरली. एका ठिकाणी नाथांनी स्वर्गप्राप्तीच्या वाटेत येणारे अडथळे आणि शेती करताना शेतकऱ्यासमोर येणारे अडथळे यांची तुलना केलेली आहे. जणू एकवेळ स्वर्गप्राप्ती सोपी, पण शेती सोपी नाही, हेच नाथ सांगतात. हे सांगताना नाथांनी वाचलेला शेतीच्या अडचणींचा पाढा इतका दीर्घ आहे. की तो अजूनही सुरूच आहे. संपलेलाच नाही. असे हे नाथ आणि भागवतात त्यांनी लिहिलेलं शेतीचं भागवत हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. म्हणून मी म्हणालो की पैठणला शेतकरी साहित्य संमेलन होणं किती उचित आहे.
२) शेतकरी साहित्य
शेतकरी आणि लेखन-वाचन या गोष्टींचा एकेकाळी काहीही संबंध नव्हता. शेतकऱ्यांचा संबंध प्रामुख्याने राबण्याशीच होता. राबताना तो जी लोकगीतं म्हणायचा ती कधी अक्षरबद्ध झाली नाहीत. लिहून ठेवण्याच्या लायकीची ती पूर्वी कुणाला वाटतंही नसत. इंग्रजांना त्याचं महत्त्व कळालं. आपल्या विद्वानांना ते नंतर पोट भरण्याचं साधन होऊ शकतं हे लक्षात आल्यावर कळालं.
मराठीत वाङ्मयनिर्मिती सुरू झाल्यावर चारशे वर्षांनी पहिला शेतकरी कवी निर्माण झाला. त्याचं नाव तुकाराम. त्यानंतर थेट दोन अडीचशे वर्षाच्या खंडानंतर फुले ज्योतीराव यांच्या रूपात शेतकरी साहित्यिक जन्माला आला. तुकारामानंतर सुरू न होऊ शकलेली शेतकरी साहित्याची परंपरा महात्मा फुले यांच्या नंतर मात्र सुरू झाली. कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, ताराबाई शिंदे आणि असेच आणखी कितीतरी लोकं लिहायला लागले. पण महात्मा फुले यांच्यानंतर पन्नास-साठ वर्षांनी तीही परंपरा खंडित झाली. सगळा समाजच स्वातंत्र्य चळवळीभोवती केंद्रित झाला. सामाजिक चळवळी थंडावल्या. स्वातंत्र्य चळवळीचा रेटा इतका वाढला, की गो. ग. आगरकरांचा राजकीय सुधारणे आधी सामाजिक सुधारणा हा विचार मागे पडला. त्यात साहित्याचा तर आपण विचारच करू शकत नाही. इथेच महात्मा फुलेंची परंपरा खंडित झाली.
पन्नास-साठ वर्षाच्या खंडानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रसार झाल्यावर पुन्हा ती परंपरा सुरू झाली. ग्रामीण साहित्य चळवळ आणि शेतकरी चळवळीनंतर ती परंपरा फोफावली. पण अजूनही शेतकऱ्यांचा वाचक वर्ग निर्माण झाला नाही. बाबासाहेबांच्या प्रेरणेनं आणि घटनेनं दिलेल्या सवलतीमुळं दलितांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं. त्यातून साहित्याच्या वाचकांचं प्रमाण वाढलं. दलित माणसं नोकरदारही होऊ लागल्यामुळं त्यांची क्रयशक्ती वाढली. दलित साहित्याच्या वाचकाप्रमाणे ग्राहकही वाढला. त्यामुळे दलित साहित्याला मोठा उठावही मिळाला. तसा शेतकरी साहित्याला तो मिळाला नाही. क्रयशक्ती प्राप्त झालेला शेतकरी साहित्याऐवजी चैनीच्या वस्तू विकत घेतात. युगात्मा शरद जोशी साहेब नेहमी म्हणायचे तसा ग्राहक निर्माण होणं शेतकरी साहित्याला आवश्यक आहे. शेतकरी साहित्याचा वाचक वर्ग तयार करा. मार्केट निर्माण झालं तर व. पु. काळे आणि गंगाधर गाडगीळही शेतकरी साहित्य लिहायला लागतील असं वास्तव ते अधोरेखित करायचे. आमची उपेक्षा होते, कुणी दखल घेत नाही, असं म्हणू नका. दखल घ्यायला भाग पाडा असंही ते म्हणायचे.
शेतकऱ्यांच्या केवळ प्रश्नावर लिहिलेलं साहित्य म्हणजे शेतकरी साहित्य असं नाही. प्रश्नावर तर लिहावंच, त्यासोबतच किडे मुंग्यासह निसर्गाच्या सगळ्या हालचालीसह शेत जिवंत करता आलं पाहिजे. त्यासाठी अनेक जगप्रसिद्ध लेखकांची ते उदाहरणं द्यायचे. नाहीतर साहित्य एकसुरी होईल ते साहित्य होणार नाही. ते प्रचाराचं एक साधन होईल. प्रचार संपताच धूळ खात पडेल. साहित्यानं शेतकऱ्यांच्या उपयोगी तर पडावंच पण साहित्य म्हणून चिरंतन टिकावं देखील अशी त्यांची इच्छा असे. शेतकरी साहित्यानं साहित्याची मुख्य धारा व्हावं, अशी तर त्यांची फार फार इच्छा होती.
शेतकरी चळवळीच्या भावविश्वावर किंवा कार्यकर्त्याभोवती गुंफलेल्या ललित कलाकृती अजून फारशा निर्माण झाल्या नाहीत. अनंतराव उमरीकर यांनी लिहिलेली काही कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे, रा. रं. बोराडे यांची चारापाणी, सुरेंद्र पाटील यांची चिखलवाटा या कादंबऱ्या, भास्कर चंदनशिव आणि आसाराम लोमटे यांच्या काही कथा, माझ्या काही कविता यातूनच केवळ काय ते शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रं आलेली आहेत. वसुंधरा काशीकर आणि भानू काळे यांनी लिहिलेल्या युगात्मा शरद जोशी यांच्यावरच्या पुस्तकातून, परुळेकर, उमरीकर यांनी लिहिलेल्या आंदोलनावरच्या वृत्तांतातून काही व्यक्तीचित्र आलेली आहेत. शेषराव मोहिते यांच्या आंदोलनावरील कादंबरीची आपण सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत, पण किती दिवस?
३) साहित्य आणि चळवळी
सामाजिक चळवळी मंदावल्या की साहित्य चळवळी सुरू होतात. सामाजिक चळवळीच्या मुशीतूनच साहित्य चळवळीचे कार्यकर्ते घडत असतात. कुठल्यातरी सामाजिक विचारांच्या प्रेरणेतूनच साहित्य चळवळी सुरू होतात. सामाजिक चळवळींचे विचार रुजवण्याचं काम कलात्मकपणे साहित्य चळवळी करत असतात. आतापर्यंतच्या सर्व साहित्य चळवळीकडं आपण पाहिलं तर हे आपल्या सहज लक्षात येईल. आंबेडकरी विचारांच्या कृतिशील सामाजिक चळवळी मंदावल्यानंतरच साहित्य चळवळ फोफावली. दलित साहित्य चळवळीने आंबेडकरी विचार रुजवण्याचं काम केलं.
सामाजिक असो की वाङ्मयीन असो,. आपले ध्येय साध्य झाले की त्या चळवळी थंडावतात नाहीतर औपचारिक दृष्ट्या सुरू राहतात, पण त्यात मजा राहत नाही. युगात्मा शरद जोशी यांनी काळानुरूप विकसित केलेले महात्मा फुले यांचे शेतकरी विषयक तत्त्वज्ञान रुजवण्याचं काम आता शेतकरी साहित्य चळवळीला करावं लागणार आहे. अर्थात युगात्मा शरद जोशी यांचा देव होता कामा नये. युगात्मा शरद जोशी हे स्वतःच अशा गोष्टींच्या विरोधात होते. त्यांनी कधीच मूर्तिपूजा केली नाही. ते आयुष्यभर सतत मूर्तिभंजन करीत राहिले. त्यामुळेच ते अनेकांना अप्रिय होते, आहेत.
एकेकाळी ग्रामीण साहित्य चळवळीनं शेतकरी साहित्य जोपासण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. आनंद यादव, रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापले, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशिव यांनी चळवळीत जीव ओतला. वैयक्तिक पातळीवरही अनेक शेतकरी साहित्यिक घडवण्याचं काम केलं. त्यातूनच तयार झालेली पिढी नवनवे विक्रम करीत आहे. श्रेय सांगत किंवा श्रेय नाकारत. कोणतीही चळवळ कधीच पूर्णपणे निर्दोष नसते. काही चुका आणि त्रुटी सार्वजनिक कामात राहतच असतात. ग्रामीण साहित्य चळवळीतही त्या असतील. पण म्हणून त्या चळवळीचं श्रेय नाकारता येणार नाही. मी त्या चळवळीतून आलो आणि त्या चळवळीतल्या त्रुटीवर वेळोवेळी टीकाही केली. म्हणूनच साक्षीभावाने मी हे सगळं सांगतो आहे.
महात्मा फुले, युगात्मा शरद जोशी, ग्रामीण साहित्य चळवळ यातून बळ घेऊन, त्यात नवी भर घालून शेतकरी साहित्य चळवळीला पुढं जावं लागणार आहे. चळवळ पुढं जाण्यासाठी प्रचंड यंत्रणा लागते. विचार, कार्यकर्ते, संमेलनं, मेळावे, चर्चासत्र, शिबिरं, नियतकालिक यांची राळ उठवावी लागते. त्यासाठी झपाटलेले, त्यागी, समर्पित, निष्ठावंत कार्यकर्ते लागतात. त्यांच्यात समन्वय घडवण्यासाठी एक धैर्यशील नेतृत्व लागतं. चुकलेली वाट दाखवण्यासाठी चळवळी जवळ विचारवंतही लागतात. चळवळीचे सगळ्यात मोठे भांडवल प्रतिभावंत असतात. ते आपल्याकडे वळवता आले पाहिजेत. नाहीतर साहित्य चळवळीला अर्थ राहणार नाही.
दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य चळवळींना हिणवण्यासाठी एकेकाळी स्वतंत्र चुली, सवत्या चुली असं म्हटलं जायचं. हिणवणाऱ्यांना अपेक्षितही नसेल अशा वाईट अर्थाने या चुली सवत्या झाल्या आहेत. नुसत्या सवत्या नाही, तर अक्षरशः एकमेकींच्या सवती झाल्या आहेत. अलीकडचं ‘पाणी कसं असतं’ या कवितेच्या वादानं हे सिद्ध केलेलं आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती.
यावर आता एकच उपाय आहे. प्रस्थापितांसह सगळ्यांनी चांगलं साहित्य आणि वाईट साहित्य असे दोनच गट करावेत. आपलं भावविश्व असलेलं साहित्य आपल्याला जास्त भावतं इथपर्यंत ठीक आहे. पण दुसऱ्याचे भावविश्व समजून घेण्याची आस, प्रेम आणि उत्सुकता कायम जपली पाहिजे. आपल्यात मुलभूत माणुसकी नसेल तर त्या साहित्याला काही अर्थच उरणार नाही.
या वेगवेगळ्या चळवळीचं सोडा पण चळवळीअंतर्गत गटांनीही केवळ नावावरून वाद घालत, शब्दांचे कीस पाडत जो धुमाकूळ घातला आहे, तो अत्यंत निंदनीय आहे. यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि चळवळ भरकटत जाते. आता काही मुद्दा शिल्लक नाही की काय, अशी शंका यायला लागते. सर्व जाती जमातीमध्ये शेतकरी आहे, तोही नागवलेला आहेच. त्यांच्या साहित्यातून तोही येतोय. पण तिथे अस्मितेची जास्त गरज असल्यामुळं, तिथला शेतकरी सध्या दुर्लक्षित आहे. पण शेतकरी साहित्य चळवळीनं तिकडे लक्ष द्यायला हवे. साहित्याला कोणतेच भावविश्व ताज्य नसते.
चळवळी नुसार त्याचा प्राधान्यक्रम बदलू शकतो. कोणी कुठेही असो, जाणिवेनं भिडणं महत्त्वाचं असतं. चळवळींच्या पातळीवर सध्या परिस्थिती भयंकर आहे. काहीतरी (श्रेय, मान्यता, पुरस्कार) मिळवण्यासाठी भयंकर वखवख वाढली आहे. कोण कोणाचा विरोधक यामागे तात्त्विक कारणाऐवजी हितसंबंध कारणीभूत ठरत आहेत. कोणीतरी कोणाचीतरी लाज उघडी करण्यासाठी काहीतरी लिहितोय, दुसरा कोणीतरी कुणाचीतरी लाज झाकण्यासाठी काहीतरी लिहितोय किंवा आधीच्याचीच वस्त्र ओढतोय. कुणीतरी कुणालातरी काहीतरी मिळवून देण्यासाठी झटतोय. कोणीतरी कोणालातरी काहीतरी मिळू न देण्यासाठी झटतोय, अशी भोवतीची भयानक वाङ्मयीन परिस्थिती पाहून अक्षरशः घाबरायला होते. नवोदित भयभीत होतात.
शेतकऱ्यावर लिहिणारे जातीवादी ठरवले जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर लिहिणाऱ्यांना आक्रस्ताळं, उरबडवं, गळाकाढू ठरवलं जातं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चेष्टा करणाऱ्या कविता लिहिल्या जातात. त्या पुरस्कृत होतात. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे कुणी अभिजन नव्हे बहुजनच करत आहेत. काहीबाही मिळविण्यासाठी त्यांना तो जवळचा रस्ता वाटतोय. युगात्मा शरद जोशीचे नाव घेणाऱ्याला वाळीत टाकले जातंय. गाव पंचायतीतून संपलेला वाळीत टाकण्याचा प्रकार आता साहित्यात प्रतिष्ठित होऊ लागलाय.
४) अभिरुचिसंपन्न रसिक घडविण्यासाठी
ग्रामीण भागात साहित्याची अभिरुची विकसित करण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनाऐवजी लेखक-वाचक प्रशिक्षणाची गरज जास्त आहे. कारण ग्रामीण साहित्याला अभिरुचीसंपन्न ग्रामीण वाचकाची वाणवा आहे. साहित्य संमेलनातून रसिक प्रेक्षक तयार होतात. त्यांचं रूपांतर अभिरुचिसंपन्न वाचकात करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता आहे. तसं झालं तर ग्रामीण साहित्य संमेलनं फलद्रुप होतील. नाहीतर ती निष्फळ ठरतील. ग्रामीण वाचक अजूनही बहिणाबाई, ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ यांच्या पुढे सरकायला तयार नाही. त्यांनी रमेश इंगळे उत्रादकर आणि अमृत तेलंगही वाचायला हवेत. समजायला थोडे कठीण असलेले कवी वाचण्यासाठी अभिरुची संपन्नतेची गरज असते. आणि ग्रामीण वाचकांनी केवळ ग्रामीण साहित्यच वाचावं असं नाही. ते त्याच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलतं म्हणून त्याला झुकतं माप स्वाभाविक असलं तरी त्यानं समग्र मराठीतलं सर्वच प्रवाहातलं आणि विचाराचं साहित्य वाचायला हवं. त्याशिवाय प्रगल्भता शक्य होणार नाही. ही प्रगल्भता गांभीर्याने केलेल्या प्रशिक्षणाशिवाय येणार नाही. नाहीतर हौसे, नवसे, गवसे लोकं त्याला झुलवत राहतील. त्यासाठीच अशा अभिरुची संपन्न रसिक घडवणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांची जास्त गरज आहे.
अशा गांभीर्यपूर्वक होणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची गरज साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राजकारण्यांना कदाचित वाटणार नाही. त्याचा तसा तात्काळ फायदा काही नसतो. त्यांना तर तात्काळ फायदा हवा असतो. त्यामुळं त्यांना साहित्य संमेलनाचं भव्य आयोजन करू द्यावं आणि शिक्षण संस्था, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था यांनी असे संस्कार शिबिरे घ्यावीत. त्यातून रसिकांवर उत्कृष्ट वाङ्मयाचे संस्कार होतील, उत्तम वाचक तयार होतील.
हौसेला मोल नाही. हे खरं असलं तरी कायम हौस करायची नसते. कधी कधी गंभीर व्हायचं असतं. हौसेतून गांभीर्याकडं प्रवास करायचा असतो. गांभीर्याचे पाठीराखे नेहमी कमीच असतात. त्यामुळं त्याची काळजी न करता रसिक घडविण्याचं आपलं काम चिवटपणे करायचं असतं. रा. रं. बोराडे आणि भास्कर चंदनशिव यांनी घेतलेल्या अशाच शिबिरातून मी घडलो आहे. गेल्या चार वर्षांपासून होणारी शेतकरी साहित्य संमेलनं हा इव्हेंट नाही, नुसताच महोत्सव नाही. तिथं सर्व प्रकारच्या चर्चा या अतिशय गंभीरपणे केल्या जातात याचा मला आनंद आहे. यातूनच साहित्याचे अभिरुची संपन्न रसिक घडतील अशी मला अपेक्षा आहे.
शेवटी मी कवी आहे. कवीनं आपली भूमिका खरंतर कवितेतूनच मांडायला हवी, म्हणून आता एक कविता म्हणून थांबणार आहे.
५) बूर्गुंडा
बुर्गुंडा होईल बयो बुर्गुंडा होईल
असाही एक दिवस येईल भलता सलता बुर्गुंडा होईल
आभाळातला पाऊस पृथ्वीवरची माती गायब होईल
मातीशिवाय शेती होईल, बिजा शिवाय पीक येईल
गर्भिचा अवतार गायब होऊन दुसऱ्या गर्भी रुजावा
तशी इंजेक्शनलाच इंजेक्शन देऊन शेती होईल
जिथं हवापाण्याची गरज राहणार नाही
तिथं शेतकऱ्यांचा प्रश्नच राहणार नाही
जगाचा पोशिंदा हे त्यांचे पद काढून घेतलं जाईल
शेतकरी नसून खोळंबा होणार नाही
असून अडचण होईल त्याची जगाला
निरुपयोगी अवयव झडून जावा तसा शेतकरी झडून जाईल
अलुतेदार-बलुतेदार आधीच झडलेले आहेत
त्यांना टाटा बिर्ला पुरले यांच्यासाठी कुणी परका येईल
नाही तर आपलेच परक्यांची भूमिका बजावतील
अंबानी अदानी तर आहेतच तयार, त्यांची सेवा रुजू होईल
असाही एक दिवस येईल भलता सलता बुर्गुंडा होईल
बुर्गुंडा होईल बयो बुर्गुंडा होईल
सुपीक डोक्याचं सरकार शास्त्रज्ञांना ताब्यात घेईल
आदेश देऊन त्यांना अशी औषधी तयार करून घेईल
फवारली शेतावर की चालता-बोलता शेतकरी
सहकुटुंब सहपरिवार पंचतत्त्वात विलीन होईल
ना पुरावं लागेल, ना जाळावं लागेल
इतकं सोपं, इतकं चांगलं मरण कुणाच्या भाग्यात असेल?
ना मडकं धरायला मुलगा लागेल
ना वारा घालायला मुलगी लागेल
ना रडायला नातेवाईक लागतील
ना सावडायला आप्त लागतील
सगळे सगळे एकसंघ एकाच वेळी
एकाच मरणानं मरतील
मग कोल्ह्या, कुत्र्यांचं राज्य सुरु होईल
असाही एक दिवस येईल
भलता सलता बुर्गुंडा होईल
बुर्गुंडा होईल बयो बुर्गुंडा होईल
इंद्रजीत भालेराव,
एकनाथ नगर, परभणी – ४३१४०१
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.