July 27, 2024
rahul-gandhi-in-raebareli lok sabha
Home » राहुल गांधी आणि रायबरेली…
सत्ता संघर्ष

राहुल गांधी आणि रायबरेली…

उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा गांधी परिवाराचा गड मानला जातो. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांपैकी जिंकलेली ही एकमेव जागा होती. या निवडणुकीत सोनिया गांधी या भाजप उमेदवाराचा १ लाख ६७ हजार मतांनी पराभव करून विजयी झाल्या होत्या. मोदी लाटेतही २०१४ व २०१९ मध्ये सोनिया गांधी या रायबरेलीतून लोकसभेवर घवघवीत मते घेऊन विजयी झाल्या होत्या. आता वयापरत्वे आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला व राजस्थानमधून काही महिन्यांपूर्वीच त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. तब्बल चार वेळा रायबरेलीच्या मतदारांनी सोनियांना लोकसभेवर निवडून पाठवले. आता राहुल गांधी यांनी आपल्या आईच्या मतदारसंघातून आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे.

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी व केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव करून इतिहास घडवला. सुदैवाने राहुल हे वायनाडमधून निवडून आल्याने लोकसभेवर खासदार म्हणून आले. खरं तर, यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने शक्तिप्रदर्शन काँग्रेसने केले. केरळमध्ये मतदानही झाले. आता त्यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सोनिया गांधी या राज्यसभेवर निवडून गेल्यामुळे रायबरेलीतून कोण निवडणूक लढवणार याची काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. अमेठीत पाच वर्षांपूर्वी राहुल यांचा पराभव झाल्यामुळे ते पुन्हा स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस करणार नाहीत हे सर्वांनीच गृहीत धरले होते. अमेठी व रायबरेली हे गांधी परिवाराशी थेट संबंध जोडणारे मतदारसंघ आहेत. म्हणूनच या दोन मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याचे अनेक अंदाज व्यक्त केले गेले. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल यांना रायबरेलीतून व गांधी परिवाराशी निकटचे संबंध असणारे व निवडणूक व्यवस्थापन पाहणारे के. एल. शर्मा यांना काँग्रेसने अमेठीतून उमेदवारी दिली आहे.

राहुल यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डरो मत… अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. रायबरेलीतून भाजपाने दिनेश प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली आहे. राहुल यांची आता अमेठीतून निवडणूक लढविण्याची हिम्मत नाही, त्यांनी अमेठीतून पळ काढला आहे, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली आहे. त्या मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीयमंत्री आहेत. शिवाय त्यांनी अमेठीत स्वत:चे घर बांधले असून तेथे त्या राहतात. आपण निवडून आल्यावर मतदारसंघात राहू असे त्यांनी गेल्या निवडणुकीत अमेठीच्या मतदारांना आश्वासन दिले होते. दुसरीकडे सोनिया गांधी असोत किंवा राहुल ते निवडून आल्यावर दिल्लीत राहतात. देशभर फिरतात किंवा विदेशात जातात पण मतदारसंघाकडे पाच वर्षे फिरकत नाहीत हा अनुभव अमेठी किंवा रायबरेलीतील मतदारांना आहे. आपला खासदार आपल्या मतदारसंघात राहणारा हवा, आपल्याला उपलब्ध हवा, अशी मतदारांची इच्छा असते. पण गांधी परिवाराला सल्ला देणार तरी कोण?

देशाला स्वातंत्र्य मिळल्यानंतर १९५२ मध्ये लोकसभा निवडणूक झाली तेव्हा रायबरेली-प्रतापगड असा मतदारसंघ होता. तेव्हा सर्वसाधारण वर्गातून व अनुसूचित जातीतून असे दोन खासदार निवडले गेले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जावई फिरोज गांधी हे सर्वसाधारण वर्गातून, तर बैजनाथ कुरिल हे राखीव मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. फिरोज गांधी यांना पं. नेहरूंनी पक्षाची उमेदवारी दिली व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रफी अहमद किडवाई यांनी फिरोज यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. आपल्या पतीचा इंदिरा गांधींनीही प्रचार केला होता.
१९५७ मध्ये या मतदारसंघाचे नाव रायबरेली असे झाले. या निवडणुकीत फिरोज गांधी १ लाख ६२ हजार मतांनी विजयी झाले. पण त्यांचे १९६० मध्ये निधन झाले, म्हणून या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आर. पी. सिंग निवडून आले.
१९६२ मध्ये रायबरेली मतदारसंघ दोन उमेदवारांचा होता ते रद्द झाले व अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हा काँग्रेसचे बैजनाथ कुरिल हे निवडून आले. त्यानंतर रायबरेलीत इंदिरा पर्व सुरू झाले.

१९६७ मध्ये रायबरेली मतदारसंघ आरक्षणमुक्त झाला, तेव्हा इंदिरा गांधी या राज्यसभा सदस्य होत्या. त्यांनी प्रथमच या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत ५५ टक्के मते त्यांना मिळाली. तब्बल १ लाख ४३ हजार मतांनी त्या विजयी झाल्या.

१९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. १९७१ च्या निवडणुकीत त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार राजनारायण यांचा दोन लाख मतांनी पराभव केला. निकालानंतर राजनारायण यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. १२ जून १९७५ रोजी उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींनी राज्य निवडणूक यंत्रणा वापरल्याचा ठपका ठेवला. त्यांची निवड अवैध ठरवली आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली. इंदिराजी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यांनी दि. २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली. नंतर संसदेचे अधिवेशन बोलावून अलाहाबाद न्यायालयाचा निकाल रद्द ठरवला.

डिसेंबर १९७५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संसदेने निवडणूक कायद्यात केलेले बदल कायम ठेवल्याने इंदिरा गांधींचे पंतप्रधानपद कायम राहिले. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींची लोकप्रियता कमालीची कमी झाली. १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढलेल्या राजनारायण यांनी त्यांचा रायबरेली मतदारसंघात ५५ हजार २०२ मतांनी पराभव केला. त्यांच्या कारकिर्दीतील हा एकमेव पराभव होता. रायबरेलीतून बिगर काँग्रेसचा खासदार म्हणून निवडून येणारे राजनारायण हे पहिले होते. १९८० मध्ये केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार कोसळले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी रायबरेली व मेडक (आता तेलंगणा) अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली व त्या दोन्ही मतदारसंघांतून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी मेडकची जागा कायम ठेवली व रायबरेलीतून खासदारकीचा राजीनामा दिला.

रायबरेलीत झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अरुण नेहरू निवडून आले. १९८९ व १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शीला कौल रायबरेलीतून निवडून आल्या. शीला कौल या कमला नेहरूंचे बंधू कैलाश नाथ कौल यांच्या पत्नी. त्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होत्या. हिमाचल प्रदेशच्या काही काळ राज्यपालही होत्या.

१९९६ मध्ये भाजपचे अशोक सिंह १ लाख ६० हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे विक्रम कौल यांचा पराभव केला. विक्रम हे शीला कौल यांचे पुत्र. त्यांना जनता दल व बसपा यांच्यानंतर चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. १९९८ मध्ये पुन्हा भाजपाचे अशोक सिंह २ लाख ४० हजार मतांनी विजयी झाले, त्यांनी काँग्रेसच्या दीपा कौल यांचा पराभव केला. दीपा या शीला कौल यांच्या कन्या. दीपा यांनाही चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.

२००४ पासून सोनिया गांधी सलग निवडून येत आहेत. २००४ मध्ये त्यांनी सपा उमेदवाराचा १ लाख ५० हजार मतांनी पराभव केला. नंतर यूपीएचे सरकार केंद्रात आले. यूपीएच्या चेअरमन, राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष अशा पदांवर काम करताना लाभाचे पद मिळवले म्हणून त्यांना खासदारकीचा राजीनामा देणे भाग पडले. २००६ मध्ये त्यांनी राजीनामा दिला व लगेच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विनय कटियार यांचा त्यांनी ४ लाख १७ हजार मतांनी पराभव करून त्या लोकसभेवर पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या. २००९ मध्ये सोनिया गांधींनी बसपाचे आर. एस. कुशावह यांचा ३ लाख ७० हजार मतांनी, तर २०१४ मध्ये भाजपाचे अजय आगरवाल यांचा ३ लाख ५० हजार मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये मोदी लाटेत सोनिया गांधींना ५ लाख ३३ हजार मते मिळाली, तर भाजपचे दिनेश सिंग यांना ३ लाख ६५ हजार मते मिळाली होती. आजोबा, आजी, आई यांनी लढवलेल्या मतदारसंघात आता राहुल गांधी आपले नशीब आजमावून पाहत आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग

परब्रह्माच्या विकासासाठी विषय वासनेच्या शेंड्याची छाटणी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading