अपघातात ज्या प्रमाणे मृत्यू होतात आणि जखमी होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे होणारे वित्तीय नुकसान हा स्वतंत्र विषय आहे. तरी प्राथमिकता प्राणघातकच नव्हे तर सर्वच अपघात रोखण्यास द्यायला हवी.
प्रशांत दैठणकर
रस्ते सुरक्षा म्हटल्यानंतर रस्त्यावर घडणाऱ्या सर्वच बाबींचा विचार करावा लागतो यात होणारे अपघात आणि त्यातील प्राणहानीचा विचार प्राधान्याने होतो. सोबतच आपण विचार करायला हवा तो या अपघातात ज्यांना इजा होते आणि अपंगत्व येते. अशा प्रकारे आलेले अपंगत्व घरातील कर्त्या व्यक्तीला आले तर घरच अपंग होवून जाते. घरातील इतर कुणाला इजा झाली तर असे घर रुग्णालय झाल्यासारखी स्थिती आपणास दिसते. यासाठीच अपघाताचे गांभिर्य लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यानुरुप आपले वाहतूक वर्तन असले पाहिजे.
अपघात झाल्यास साधारणपणे शरीरास ज्या प्रकारे नुकसान होवू शकते यावर संशोधन मोठया प्रमाणात झाले आहे. वाहनावरुन घसरणे, पडणे हा सर्वसामान्य प्रकार आहे. दुचाकीस्वार आणि सायकलस्वार यांचे या स्वरुपाचे अपघात होतात. यात स्नायू खेचले जाणे, स्नायू दुखावणे असे प्रकार आढळतात. जे साधारण उपचारांनी बरे होवू शकतात. सुरक्षा साधनांचा योग्य वापर केल्यास हे देखील आपल्याला कमी करता येतात.
वाहन अपघातात हाड तुटणे, हात किंवा पाय जाणे असेही प्रकार दिसतात. हा प्रकार गंभीर स्वरुपात येतो ज्यात आयुष्यात मोठा सेटबॅक बसू शकतो. हाताच्या नसल्याने कामे करता येत नाहीत. त्याचा थेट परिणाम रोजगारावर आणि उत्पन्नावर पडतो आणि उपचारांवरही यात खूप मोठा खर्च करावा लागू शकतो. यासाठीच अपघात होणार नाहीत याची काळजी घेणे चांगले.
याही पेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे अपघाताने मेंदूवर आघात होणे. साधारणपणे दुचाकीस्वारांचे जे अपघात होतात त्यात मेंदूवर आघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्या शरीराचे नियंत्रण करणारा मेंदूच जर अपघातात आघाताने काम कमी करायला लागला तर शरीरावर देखील नियंत्रण राहत नाही आणि अपरिहार्यपणे इतरांच्या मदतीवर अवलंबून रहावे लागते असे परावलंबित्व आलेल्या व्य्क्तींचा कुटुंबात सांभाळ होत असला तरी काही काळाने ती व्यक्ती असल्यापेक्षा नसलेली बरी या स्थितीपर्यंत कौटुंबिक दुरावा वाढतो.
मेंदूवर आघात झालेल्या व्यक्तींना देखील सातत्याने असलेल्या परावलंबित्वाचा उबग येतो. यातून पुढे अनेक जण आयुष्य संपवण्याचा मार्ग स्विकारतात. अशा प्रकारे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. आणखी एक मोठा आघात असतो तो मणक्यांना इजा होणे. अशा स्थितीत पाठीचा मणका काम करीत नसल्याने अशा व्यक्तींना उर्वरीत आयुष्य अंथरुणाला खिळूनच जगावे लागते. या व्यक्ती सर्वच कामांसाठी इतरांच्या मदतीशिवाय जगू शकत नाहीत.
अपघात झाल्यावर शारिरीक इजा नाही पंरतू मानसिक धक्का बसला आहे असेही अनेक बाबतीत घडते. शरिरावर इजा नाही परंतु अपघाताचा धसका घेणाऱ्या व्यक्तींची मानसिक स्थिती बिघडलेली असते. अनेक अर्थाने फोबीया प्रकारात याचा विचार करता येतो. मानसिक धक्का बसलेल्या व्यक्ती प्रवास करायला घाबरतात. अनेक जण वाहन चालवणेही सोडून देतात. बाह्य जखमांवर उपचार करता येतात पण मानसिक धक्क्यावर वैद्यशास्त्रात उपचार नाही. वारंवार स्वप्ने पडणे, झोपेत दचकून उठणे असे प्रकार काही जणांच्या वागण्यात यायला लागतात. अशा व्यक्तींना मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्यांच्या मदतीने काऊन्सीलींग च्या माध्यमातून आधार देता येतो. त्यांच्या मनात घर करुन बसलेली भिती काढता येते.
रस्ते अपघात 2021 मध्ये 3 लाख 71 हजारांहून अधिक जण जखमी झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे आणि या आकडेवारीत सातत्याने वाढत होत आहे यामुळे रस्ता सुरक्षितता काळजी आणि त्यानुरुप असे वाहतूक वर्तन अत्यावश्यक आहे. अपघातात ज्या प्रमाणे मृत्यू होतात आणि जखमी होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे होणारे वित्तीय नुकसान हा स्वतंत्र विषय आहे. तरी प्राथमिकता प्राणघातकच नव्हे तर सर्वच अपघात रोखण्यास द्यायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.