अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाही दूरदृष्टी असणारे भक्त अधिक प्रिय असतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ।। 180 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणें आकाश सर्वव्यापक असून उदास असते, त्याप्रमाणें ज्यांचे मन सर्वव्यापक असून उदास असते. म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते.
जुन्या पिढीतील जनतेमध्ये दूरदृष्टी अधिक होती. सध्याच्या पिढीत तितकीशी दूरदृष्टी दिसून येत नाही. पूर्वी जनतेवर अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीचा मोठा पगडा होता. या संस्कृतीतच मुळात दूरदृष्टीचा विचार मांडला गेला आहे. अमेरिकेला दूरदृष्टी अधिक आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे ते आज प्रगत आहेत, असेही सांगितले जाते; पण प्रत्यक्षात तेथे सुरू असलेल्या मंदीच्या बातम्या वाचल्यानंतर असे वाटते की, त्यांनी शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केले पण त्याच्या वापरात दूरदृष्टीचा अभाव होता, असे मानावेच लागेल.
कदाचित मी म्हटलेले चूकही असेल, पण अनेकदा त्यांच्याकडे मंदी असते. त्यांचे नियोजन कोलमडते हे खरे आहे. म्हणजे त्यांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे, हे निश्चित. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दूरदृष्टी असणारे अनेक थोर नेते होते, यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. दूरदृष्टी असणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे विकासाला मोठी चालना मिळाली. देशाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. संतांप्रमाणेच या लोकप्रतिनिधींमध्ये त्यागी वृत्ती होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला, पण आताच्या काळातील तरुणांत, लोकप्रतिनिधींमध्ये अशी त्यागी वृत्ती नाही.
जुन्या पिढीतील लोकप्रतिनिधींप्रमाणे त्यागी वृत्ती असणारे, दूरदृष्टी असणारे लोकप्रतिनिधी आता क्वचितच पाहायला मिळतात आणि असले तरी सध्याच्या राजकारणात त्यांचा निभाव लागणे तसे कठीणच वाटते. मुळात ते सध्याच्या राजकारणात उतरण्यास नापसंती दर्शवितात, हेही तितकेच खरे आहे. इतका काळ बदलला आहे, पण देशाच्या विकासासाठी आणि सार्वभौमत्वासाठी नव्या पिढीत दूरदृष्टी असणे गरजेचे आहे.
अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाही दूरदृष्टी असणारे भक्त अधिक प्रिय असतात. निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थी देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, निरहंकारी असा भक्त सद्गुरूंना अधिक जवळचा वाटतो. असा भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो. भौतिक विकासातही अशा व्यक्ती पुढे असतात. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा अनेकांना होतो. सध्याच्या राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.