भारतीयांचे हे अमरत्त्वाचे तत्त्वज्ञान मात्र परकीय घेऊन जाऊ शकले नाहीत. हे तत्त्वज्ञान घेण्यासाठी त्यांना येथे यावे लागेल. हे तत्त्वज्ञान जबरदस्ती करून काढून घेता येत नाही. तर ते स्वतः साधनेने आत्मसात करावे लागते. जगाच्या सुख-शांतीसाठी भारतीयांनी हे तत्त्वज्ञान सर्वांसाठी खुले केले आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
येणें फलत्यागें सांडें । तें तें कर्म न विरुढे ।
एकचि वेळें वेळुझाडें । वांझे जैसी ।। 135 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – जसें वेळुचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही. त्याप्रमाणें या फलत्यागानें जें जें कर्म टाकलें जाते त्या त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही.
पूर्वीचे साधू-संत हे संशोधक होते. आसपास दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता. त्याच्या नोंदी ठेवल्या होत्या. भारतात नालंदा विद्यापीठ हे यासाठीच प्रसिद्ध असावे. भारतातील हे संशोधन परकीयांनी आत्मसात केले असावे. त्याचा दैनंदिन व्यवहारात कसा उपयोग केला जाऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला. यामुळे ते आपल्यापेक्षा अधिक प्रगत झाले. ही प्रगती आपल्याकडे केलेल्या संशोधनातून आहे याचा पुरावा आपल्याकडे नाही. पण पुराणात आढळणाऱ्या या नोंदीवरून असे स्पष्ट होते, की देशातील विद्यापीठे संशोधनात आघाडीवर होती. विध्वंसक विचार त्यामध्ये नव्हता. त्यामुळे संशोधनाचा वापर हा योग्य कार्यासाठीच केला गेला. तशी जडणघडण, संस्कार आपल्या संस्कृतीत रुजवले गेले. यामुळे देशात सुख-शांती समाधान नांदते.
गुन्हेगारीवृत्ती कमी होती. पण सध्या आपले हे संशोधन परकीयांनी वापरून आपणासच आव्हान दिले. पण संशोधनाचा मुख्य पाया असणारे अध्यात्मशास्त्र आजही भारतात अस्तित्वात आहे. जेव्हा जेव्हा भारतात अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी भगवंत जन्म घेतो. असा आजवरचा इतिहास आहे. सध्याच्या स्थितीत भगवंतांनी अवतार घ्यावा, अशी आशा वाटत आहे. पण आता हा अवतार कसा असेल याचे उत्तर मात्र कोणी शोधत नाही.
हा अवतार आता स्वतःमध्येच आहे. प्रत्येकांमध्येच त्याचे अस्तित्व आहे. असे भगवंतानीच सांगितले आहे तरीही याकडे या मानवजातीचे लक्ष नाही. आता हे विचारात घेण्याची गरज वाटू लागली आहे. तो भगवंत मीच आहे असेही म्हणायला कोणी तयार नाही. ती त्याला अतिशयोक्ती वाटू लागली आहे. त्याचाच त्याच्या कर्मावर विश्वास राहिलेला नाही. असे हे कसे शक्य आहे. असाच प्रश्न आता या मानवजातीला पडला आहे. आपले इतके सामर्थ्य नाही म्हणून तो याकडे दुर्लक्ष करत आहे. पण हे सत्य आहे.
वेळू, बांबू किंवा या जातीतील वृक्षांना जसे एकदाच फुले फुलतात तसे या मानवजातीलाही असाच एकदा बहर येतो. हा बहर यावा यासाठी मानवजातीने प्रयत्न करायला हवेत. फुलावर आलेल्या वेळूला पुन्हा अंकुर फुटत नाही. तसे त्याच्या मनात पुन्हा विकल्प उत्पन्न होत नाही. हा बहर आल्यानंतर तो जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. तो अमर होतो.
भारतीयांचे हे अमरत्त्वाचे तत्त्वज्ञान मात्र परकीय घेऊन जाऊ शकले नाहीत. हे तत्त्वज्ञान घेण्यासाठी त्यांना येथे यावे लागेल. हे तत्त्वज्ञान जबरदस्ती करून काढून घेता येत नाही. तर ते स्वतः साधनेने आत्मसात करावे लागते. जगाच्या सुख-शांतीसाठी भारतीयांनी हे तत्त्वज्ञान सर्वांसाठी खुले केले आहे. त्याचे पेटंट करावे लागत नाही. ते विकतही मिळत नाही. सद्गुरूंच्या कृपेने ते आत्मसात होते. पण या तत्त्वज्ञानाच्या संवर्धनाची खरी गरज आहे. हे तत्त्वज्ञान तेव्हाच जगभरात नेता येऊ शकेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.