April 14, 2024
Need of One Roof to All Indian Language
Home » भारतीय भाषा संमेलनाची गरज
विशेष संपादकीय

भारतीय भाषा संमेलनाची गरज

अशा या साऱ्या भाषा भगिनी एकाच छताखाली संमेलनाच्या रुपाने आणता आल्यास या भारतीय भाषांत एक वेगळा प्रवाह निश्तितच उत्पन्न होईल. यामुळे भाषांच्या संवर्धनास चालना मिळेल. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने तर निश्चितच याचा लाभ होईल. असा प्रयत्न सरकारी पातळीवर, विद्यापीठ स्तरावर झाल्यास देशातील विद्यापीठातही संशोधनाच्या स्तरावर ऐक्य वाढीस लागेल. याचा लाभ विद्यार्थ्यांबरोबरच देशातील जनतेलाही होऊ शकेल. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

गुजरातमधील भाषा संशोधन केंद्राने काही वर्षापूर्वी भारतीय भाषांच्या स्थितीचा आढावा घेतला होता. यामध्ये त्यांनी गेल्या ५० वर्षात भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या असल्याचे म्हटले होते. १९६१ मध्ये भारतात ११०० भाषा अस्तित्वात होत्या. पण २०११ च्या जनगणनेनुसार भारतात केवळ ८८० भाषा आढळतात. म्हणजेच भाषांचा हा उतारता आलेख भारतीय संस्कृतीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. तसेच जागतिकरणाच्या या वेगात या भाषांना वाचवणे हे मोठे आव्हानच राहाणार आहे. यातच भाषा-भाषांतील सीमावादही निश्चितच कळीचा मुद्दा होऊ शकतो. यावर निश्चितच आता तोडगा काढण्यासाठी प्रांतिक भाषा संमेलनाबरोबरच सर्व भारतीय भाषांचे एकत्रित संमेलन भरवणे ही काळाची गरज वाटू लागली आहे. या संमेलनातून भाषांची होणारी पिछेहाट थांबून नव्या तंत्रज्ञानाच्या युगात या भाषांना एक वेगळे व्यासपिठ निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. यासाठी यावर अभ्यास होण्याची निश्चितच गरज आहे. राष्ट्रीय एकात्मचेच्या अनुशंगाने दुरदृष्टी ठेवून याकडे पाहील्यास हा विषय अनेक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकेल.

पूर्वी गावांची ओळख नदीच्या तिरावरून सांगितली जायची. या नदीच्या तिरावर हे शहर, हे गाव वसले आहे असे सांगितले जायचे. नदी ही गावाची ओळख असायची. एकाच नदीचा प्रवाह अनेक गावातून, शहरातून, इतकेच काय प्रांतातून जातो. या सर्व ठिकाणी एकच भाषा असेल असे सांगता येत नाही. पण या नदीचे पाणी ना जात पाहाते, ना धर्म पाहाते, ना प्रांत पाहाते. सर्वांना तृप्त करत तिचा प्रवास सुरु असतो. कोणताही संकुचित विचार तिच्याकडे नसतो. भाषा सुद्धा या नदीच्या प्रवाहासारखीच असते. जो कोणी हे भाषाजल प्राशन करतो तो इतरांशी सुसंवाद साधत सुखी होऊ शकतो, अशाच हेतूने लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी १९९६ मध्ये सोलापूरमध्ये बहुभाषीय संमेलनाचा ध्यास घेत तेलुगु-मराठी संमेलन भरवले होते. मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्था आणि हैदराबादचे तेलुगु विद्यापीठाच्या सहकार्याने हे संमेलन घेतले होते. याच धर्तीवर कन्नड-मराठी’ द्विभाषा साहित्य चर्चेचे आयोजन गुलबर्गा येथे आयोजित करण्यात आले होते. भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विचार केल्यास आता भावीकाळात अशा आंतरभारती विचारांची गरज निश्चितच वाटणार नाही. तंत्रज्ञानाने आता कोणत्याही भाषेतील लेखाचे सहज भाषांतर करणे सोपे वाटू लागले आहे. यातून त्या भाषेच्या जवळ आपण जात आहोत. पण त्या भाषेशी आपण खऱ्या अर्थाने एकरूप होत नाही. त्या संस्कृतीशी एकरूप होणे तितकेच गरजेचे आहे. अशा दृष्टिकोनातून सर्व भारतीय भाषांचे एकत्रित संमेलन भरवण्यासंदर्भात विचार होणे गरजेचे आहे.

मुळात कोणतीही भाषा स्वतंत्र किंवा स्वयंभू नाही. ती पुरातन भाषेच्या पोटी जन्माला आलेली आहे. सर्व भारतीय भाषांची जननी “संस्कृत’ असल्याचे मानले जाते. आपले पुरातन वेदसाहित्य याच भाषेतून लिहिले गेले आहे. एकंदर आजच्या सर्व भारतीय भाषा, एकाच आईच्या पोटी म्हणजे संस्कृतपासून जन्माला आलेल्या कन्या होत. म्हणूनच या सर्व भाषेच्या बहिणींना एकत्र आणणे तितकेच गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेने राजभाषा म्हणून आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्लाळम, मणिपूरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळी, तेलुगू आणि उर्दू या २२ भाषांना मान्यता दिलेली आहे. पण आज राज्यांच्या सीमाभागात भाषिक वाद हा पाहायला मिळतो. प्रत्येक प्रांताला आपली अस्मिता टिकवण्यासाठी भाषेची सक्ती गरजेची वाटू लागली आहे. दक्षिणात्य देशात हिंदीला वावडे आहे तर कर्नाटक सीमाभागात मराठीला वावडे आहे. आपल्या राज्यात इतर राज्याची भाषा वरचड होऊ नये यासाठी त्याभाषेची गळचेपी केली जाते. दुकानाच्या पाट्या अन्य भाषेत पाहायला मिळाल्यास वाद होतात. हा भाषिक वाद संप वायचा असेल अन् देशात एकोपा नांदवायचा असेल तर या सर्वांना या भाषा एकाच कुळातील आहेत हे सांगणे, पटवून देणे अन् त्यांच्यात असणारे साम्य दाखवून देणे आता तितकेच गरजेचे झाले आहे. तसेच या भाषातील भगिनीभाव वाढवण्यासाठी त्यांच्या साहित्याची देवाणघेवाण वाढवणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. साहित्यातील भाषांतरातून या सर्व भाषात एकोपा तर होईलच पण त्याबरोबर या सर्व भाषांच्या संवर्धनालाही चालणा मिळेल.

डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी भारतीय भाषा व साहित्य या पुस्तकात कशा या सर्व भाषा एकमेकींच्या बहिणी आहेत हे सांगितले आहे. आसामी बंगालीची बहिण आहे. तर बंगालीचे तमिळी लिपीशी साम्य आहे. बंगालीतील काही अक्षरे, वर्ण विशेषतः ख, ग, श हे तमिळी लिपीशी साम्य साधनारे आहेत. बंगालीतूनच मैथिलीचा विकास झाला आहे. मराठी-गुजराथी तर भगिनी-भगिनीच आहेत. निदान, ताबडतोब, उलट हे अस्सल मराठी शब्द गुजराती भाषेत आढळतात. कन्नड तर मराठीची जुळी बहीण असल्याचे डॉ. लवटे सांगतात. कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृतप्रचुर खऱ्या, पण प्राकृतातून त्या विकसित झाल्या आहेत. मल्ल्याळम् ही भारतातील श्रेष्ठ साहित्य असलेली भाषा आहे. पूर्वी ती बोली होती. मल्ल्याळम भाषा तशी तमिळ पुत्री भगिनी आहे. तिच्यावर संस्कृतचा सुद्धा मोठा प्रभाव आहे. मणिपुरी ही तर मराठीप्रमाणेच प्राकृतपासून जन्माला आलेली आहे. या भाषेत अनेक मराठी शब्द आढळतात. पूर्वी मणिपुरी ही भाषा संस्कृत प्राकृत प्रभावामुळे देवनागरीत लिहीली जायची पण बंगाली भाषेच्या पगड्यामुळे ती आता बांगला लिपीत लिहीली जाते. सिंधी भाषेचा जन्म तर संस्कृतपासूनच आहे. अन् उर्दू भाषेचा उगम हिंदीपासून. उर्दू आज भले स्वतंत्र भाषा असली तरी तिचा उगम हिंदीपासून झाला आहे. तिचे मुळ नाव हिंदूई, हिंदुस्तानी असे होते. अमीर खुसरोने उर्दूचा उल्लेख अनेकदा हिंदी असाच केलेला आढळतो. उर्दू हे नामभिधान अठराव्या शतकात मीरतळीमीरच्यामुळे लाभले. असे अनेक उल्लेख आणि संदर्भ देत डॉ. लवटे यांनी या भाषांची खरी तोंडओळख भारतीय भाषा व साहित्य या पुस्तकात करून दिली आहे.

अशा या साऱ्या भगिनी एकाच छताखाली संमेलनाच्या रुपाने आणता आल्यास या भारतीय भाषांत एक वेगळा प्रवाह निश्तितच उत्पन्न होईल. यामुळे भाषांच्या संवर्धनास चालना मिळेल. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने तर निश्चितच याचा लाभ होईल. असा प्रयत्न सरकारी पातळीवर, विद्यापीठ स्तरावर झाल्यास देशातील विद्यापीठातही संशोधनाच्या स्तरावर ऐक्य वाढीस लागेल. याचा लाभ विद्यार्थ्यांबरोबरच देशातील जनतेलाही होऊ शकेल.

Related posts

सगळेच ऋतू दगाबाजमध्ये वर्तमान वास्तवाची कणखर शब्दांत झाडाझडती

पक्षांतरबंदी कायद्याचा अभ्यास कमी पडला…

प्राणीमात्राचे, किटकांचे जगणे

Leave a Comment