मातृसत्ताक परंपरेत मातृभाषा या शब्दाला छेद देत पितृभाषा हा शब्द बऱ्याच जणांना नक्कीच बुचकाळ्यात पाडेल. तसे काहीसे माझे पण झाले होते. प्रसंग होता जुनासुर्ला येथील २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन. झाडीबोली शोधमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर मंचावरुन बोलत होते. त्यांच्या भाषणातील एक वाक्य कानावर पडले , “लक्ष्मण खोब्रागडे झाडीबोलीत लिहितो आणि त्याच्या कवितेतील भाषा ही पितृभाषा आहे.
लक्ष्मण खोब्रागडे
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१
मातृसत्ताक संस्कृतीचा प्रभाव आजही भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे . सांस्कृतिक उत्क्रांतीत अनेक स्थित्यंतरे उलथापालथ करून गेली असली , तरी संस्कृतीचा मूळ गाभा भारतीयांच्या परंपरेचा आत्मा आहे . एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीसंवहनाचे कार्य करणारी भाषा त्यातून सुटणार कशी ? आजही जन्मजात लाभलेली भाषा मातृभाषा म्हणून जीवनाच्या अंतापर्यंत मानवाची संगिनी बनून व्यक्तिमत्वाला आकार देत आहे . भारतीय इतिहासातील मातृसत्ताक संस्कृतीचा हा सन्मान आणि परिपाक असल्याचा एक उत्कृष्ट उदाहरण विश्वालाही वंदनीय आहे.
मातृसत्ताक परंपरेत मातृभाषा या शब्दाला छेद देत पितृभाषा हा शब्द बऱ्याच जणांना नक्कीच बुचकाळ्यात पाडेल. तसे काहीसे माझे पण झाले होते. प्रसंग होता जुनासुर्ला येथील २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन. झाडीबोली शोधमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर मंचावरुन बोलत होते. त्यांच्या भाषणातील एक वाक्य कानावर पडले , “लक्ष्मण खोब्रागडे झाडीबोलीत लिहितो आणि त्याच्या कवितेतील भाषा ही पितृभाषा आहे.” नी मी सावध होऊन ऐकू लागलो.
त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द न शब्द मी कान टवकारून श्रवण केला. डॉ. बोरकर सांगत होते, ” मातृभाषा म्हटली की ती आईकडून येणारी भाषा. आपली आई म्हणजे ज्या मातीत जन्म झाला ती भूमी. जन्मभूमी ही आपली माता नी त्या भूमीशी नाळ जुळलेली मातृभाषा. पण कित्येकदा अपरिहार्य कारणास्तव त्या भूमीपासून दूर गेलो तर, नवीन नाते जुळलेल्या भूमीतील भाषेचा आपल्यावर परिणाम होऊन मूळ भाषेत बदल होतो. दुसरे सांगायचे झाले तर, मुलगा आईच्या कुशीत शिकतो म्हणतात. मग ही आई पित्याच्या घरी बाहेर भूमीतून आलेली असते, तिच्यावर दोन प्रदेशातील बोलीचा प्रभाव असतो. आपला जन्म पित्याच्या भूमीत होत असताना मातेच्या भूमीतील भाषा आपली मातृभाषा होऊच शकणार नाही. जन्मभूमितील पित्याची भाषा हीच आपली मूळ बोली.
हे इतक्यासाठी सांगायचे आहे की, मुलगी सासरी आपल्या पित्याची आणि सासरची भाषा बोलत असते. पण पितृभाषा म्हटली की त्यात कोणताही प्रभाव नसते. पित्याकडून चालत आलेला वारसा जसेच्या तसा पुढील पिढीकडे जात असते. मातेकडे दोन प्रदेशातील संस्करण असले तरी पिता हा एकाच प्रदेशातील संस्कारात वाढलेला असल्याने त्या प्रदेशाची खरी संस्कृती पित्याद्वारे प्राप्त होऊ शकते. म्हणूनच लक्ष्यार्थाने बघायचे झाल्यास झाडीबोलीतील साहित्यिकांनी पितृभाषा अवगत केली पाहिजे. म्हणजे खरी बोली आणि तिचा इतिहास व विज्ञान समोर येईल.”
डॉ . हरिश्चंद्र बोरकरांच्या या नवीन प्रांजळ विधानाचा गाभा चटकन माझ्या लक्षात आला आणि मनाला उभारी देत सांगत होता की, आपल्याला आपली बोली समजून घ्यायची असेल तर त्यात झालेली भेसळ दूर सारून, दुसऱ्या कोणाचे हातचे न घेता,आपल्या वाडवडिलांनी / पूर्वजांनी जतन केलेल्या आणि विस्मरणात गेलेल्या संस्कृतीला उजाळा देऊन आपली बोलीपरंपरा उजेडात आणली पाहिजे. पूर्वजांनी दिलेला वारसा गमावणारी पिढी नालायक म्हणून गणल्या जाते,हे जगजाहीर आहे. त्यासाठी वाडवडिलांच्या वतनात भर घालून पुढील पिढीला भरभराट दाखविण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो पाहिजे. पितृभाषा टिकवून आपल्या मातृभाषेला अधिक समृद्ध केले पाहिजे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.