बोन्साय !!!
पर्यावरण या चक्रव्यूहात अडकून गेलो. तो वटवृक्ष….. बुजुर्गपासून ते हुंदडणाऱ्या तरुणांना, पारंब्यांना लोंबकळणाऱ्या चिल्या पिल्यांना, बाया बापड्यांना, ऊन वारा पाऊस झेलताना साऱ्या मुळाना घट्ट पकडून ठेवणारा वटवृक्ष अलीकडे दुभंगलेल्या कुटुंब व्यवस्थेच्या, आधुनिक जगण्याच्या काळात, बोन्साय झालाय असं वाटलं.
रवी राजमाने
शासनाने सुट्ट्यांच्या यादीत वटपौर्णिमेला सुट्टी जाहीर केली म्हणून बऱ्याच सहकार्यांचा आनंद द्विगुणित झाला. सर उद्या सुट्टी!!!…. पूर्वी सुट्टी नसायची… यंदा ती दिसली… हो !! यादीत आहे.. मग देऊयात. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे अनिवार्य आहे. हा मेसेज आला. आनंद एका झटक्यात मावळला.. मग आंब्याचा विषय आज निघाला ८०० रुपये डझन. घ्यायलाच हवेत. शेतकऱ्यांना चार रुपये मिळाल की खूप बरं वाटतं… पिचलेत बिचारे…..वडाजवळ एक आंबा ठेवावाच लागतो.
आंब्यावरनं आठवलं. मला तो सरकारी दवाखान्याच्या कोपऱ्यातला वड आठवला. लहान वयात ग्रंथ, सत्यता, भाकडकथा योग्य, अयोग्य, श्रद्धा, अंधश्रद्धा काही माहिती नव्हतं. वटपौर्णिमेला आई खूप सजून जायची. खूप सुंदर साडी नेसायची तिच्या गळ्यात डोरलं, बोर बाळ, तिचा आवडता कोल्हापुरी साज, फुल, बुगड्या, नथनी, मास पट्टा, पाटल्या जोडवी, मासोळ्या करंगळ्या, सारं घालायची. माळावरच्या दहा-पंधरा बायका सजून एकमेकीला बोलावून घेऊन जायच्या. आईबरोबर मी ही जायचो. त्या वडाचा बुंधा दिसतच नव्हता. पांढरा लेप लावावा अस दिसायचं. एवढे धागे गुंडाळलेले असायचे.
तिथे भडजी किंवा स्वामी असायचा. पुजारीही प्रत्येक जातीचा वेगवेगळा… त्याच्याजवळ पाच-पन्नास आंबे दिसायचे. आंबा घेऊ वाटायचा. पण धाडस कुठ ? खूप बायका, आई, काकू, वहिनी यांच्याबरोबर जायला मिळतय ना मग बास… त्या दिवशी सुंदर मखमली पडद्यासारख्या मऊसूत पोळ्या व्हायच्या. शिकरण, कुरुड्या, भातवड्या, शेक, ओरिजनल बासमती, दूध, तुपाची बरणी.. अप्रतिम स्वयंपाक. कधी एकदा सण येईल असं वाटायचं.
चला आता कोल्हापूरला निघायचं रेल्वेत बसल्यावर एका …….ने मेसेज केला “वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!”. आमची विनोद बुद्धी जागी झाली.
” मॅडम ना केलात की मैत्रिणीला”. ते खळखळून हसले. व्हाट्सअप दाखवलं.
नवऱ्याच्या पेकटाच बसलेली बायको. बहुतेक दादा कोंडकेंचा ‘ह्योच नवरा पाहिजे’ सिनेमा असावा मी खळखळून हसलो. स्त्री मुक्ती हा विषय आठवला, वटपोर्णिमा आठवली. तेव्हाची व आजची… वटपौर्णिमा खूप फरक जाणवतो.
राजारामपुरीत कालच एक गोल कट्टा करून एक फांदी लावलेली दिसली. दोन-तीन हाय स्टॅंडर्ड स्त्रिया धागा बांधताना दिसल्या. श्रीमंताचा ईलाखा आहे. पुढे गेल्यावर वडाच्या तोडलेल्या फाद्यांचा कोमजलेल्या पानांचा ढीग दिसला. मूळ वटवृक्षापासून तोडलेल्या आणि कोमजलेल्या फांदीला पुजायचं….त्या फांद्यांची पूजा करायची. सात जन्मात हाच नवरा मिळू दे… बहुतेके हे जुनं झालं आता.. या जन्मातच कंटाळा आलेल्या किती टक्के आहेत ही स्त्रियांनाच माहिती…. आता स्त्रियांना खूप स्वातंत्र्य मिळालय…. त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे…. सावित्रीबाईंच्या मुळे कित्येक जनी शिकल्या पुढे आल्या. साऱ्यांना सारच पटावं असं काही नाही.
भाकड कथा, की नवऱ्यावरच प्रेम हे ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे .मॉडर्न मुला- मुलींच्या दृष्टीने त्यात काही विशेष नाही. नाहीतर कुठल्या स्त्रीला एकच नवरा सात जन्मी व कुठल्या नवऱ्याला एकच बायको सात जन्म मिळावी असं वाटत असेल…
मुळात पुनर्जन्मच असतो की नसतो हे माहीत नाही. अशी एका विधानाची फेसबुक पोस्ट वाचली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोक आपापल्या परीने व्यक्त होतात बरं वाटतं. थोडं पुढे आलो गरीब व मध्यमवर्गीयांचा एरिया. बऱ्यापैकी स्त्रिया एकमेकीची वाट बघत होत्या. कमी शिकल्या असतील पण खूप प्रेम वाटलं त्यांच्यात. भरगच्च दागिने बायका घातलेल्या पाहून रील आठवली. फेसबुकवरच्या रिलवाल्या बाईंची कमालच. “लय सोनं घालून जाऊ नको पुढची म्हणल हिचा नवरा पुढच्या जन्मी मिळावा” थोडा वेळ हसायला येतं. लिव्ह इन रिलेशनच्या जमान्यात अशा रील्स अगदीच थील्लर… वाटतात…. कोरोना पासून नाती तुटत चालली. प्रत्येकाला स्वतः जगून घ्यायचाय.
बेसमेंट ला आलो.बोन्साय केलेल एक वडाच झाड बघून लहानपणीचा प्रसंग आठवला. संध्याकाळी 65 वर्षे वयाच्या काकी त्या वडाजवळ दिवा लावून नमस्कार करत होत्या. हे दृश्य पाहून मी पुरानातल्या भाकडकथा, पुरोगामी, प्रतिगामी, घृणा, द्वेष, मत्सर, श्रद्धा, अंधश्रद्धा बांधलेला धागा, पर्यावरण या चक्रव्यूहात अडकून गेलो. तो वटवृक्ष….. बुजुर्गपासून ते हुंदडणाऱ्या तरुणांना, पारंब्यांना लोंबकळणाऱ्या चिल्या पिल्यांना, बाया बापड्यांना, ऊन वारा पाऊस झेलताना साऱ्या मुळाना घट्ट पकडून ठेवणारा वटवृक्ष अलीकडे दुभंगलेल्या कुटुंब व्यवस्थेच्या, आधुनिक जगण्याच्या काळात, बोन्साय झालाय असं वाटलं.
रवी राजमाने
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.