गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. माणसाच्या मनाला यामुळे उभारी मिळते. मन प्रसन्न राहते. सतर्क राहण्यासाठी प्रसन्न असणे गरजेचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
अर्जुना तुझे चित्त । जऱ्ही जाहले द्रवीभूत ।
तऱ्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ।। 183 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – अर्जुना, तुझें चित्त जरी दयेनें विरघळून गेलें, तरी तें तसें होणें या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही.
रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग..सीमेवर लढणाऱ्या शिपायाची हीच अवस्था असते. सदैव त्यांना सतर्क राहावे लागते. कोठून गोळी येईल याचा नेम नाही. डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. डोळा जराही लागला तरी काहीही घडू शकते. सतर्कता ठेवावी लागते. जो झोपला, तो संपला. हे जसे सीमेवर पहारा देणाऱ्या शिपायाचे जीवन आहे तसे प्रत्येकाच्या जीवनातही अशी जागरूकता असावी लागते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागते.
गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. माणसाच्या मनाला यामुळे उभारी मिळते. मन प्रसन्न राहते. सतर्क राहण्यासाठी प्रसन्न असणे गरजेचे आहे. मनाला जर गंज चढला तर तो उतरविणे महा कठिण असते. यासाठी मनाला गंज येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गंज येऊ नये यासाठी वस्तूला तेल, ग्रीस लावावे लागते. तसेच मनाचे आहे. मनाला गंज येऊ नये यासाठी मन चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवावे लागते.
मनाला शांतता ही गरजेची आहे. ध्यानामध्ये मन रमले तर मनाला आनंद मिळतो. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकाग्रतेने मन विचलित होत नाही. मनाला या गोष्टीची सवय लागली तर मनाची प्रसन्नता कायम राहाते. सदैव मन आनंदी ठेवावे. राग, द्वेष, मत्सर, लोभ नसावा. मन प्रसन्न ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. दैनंदिन जीवनात असे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला तर प्रत्येकाचे जीवन आनंदाने फुलून जाईल. यासाठी तसे विचार आत्मसात करावे लागतील.
विचाराने माणसात बदल घडतो. मनात प्रसन्नतेचा विचार घुसला तर बदल निश्चितच घडेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मन खचू देता कामा नये. ते प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहिले तर जीवनात सहज विजय संपादन करता येऊ शकतो. यासाठीच ध्यान धारणा आहेत. हे विचारात घेऊन प्रत्येक क्षण हा युद्धाचा प्रसंग आहे असे समजून मनाची सतर्कता कायम ठेवायला हवी. युद्धात मन जिंकायचे आहे. मनात सतर्कता ठेऊन इंद्रियांवर विजय मिळवून आत्मज्ञानी व्हायचे आहे. आत्मज्ञानी होण्यासाठीच्या या युद्धात चित्त जागेवर ठेवून साधना करणे गरजेचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.