July 15, 2025
Book Review of Ghamache Sandharbha poetry collection of Kiran Bhavsar
Home » कष्टाची गाथाः घामाचे संदर्भ
मुक्त संवाद

कष्टाची गाथाः घामाचे संदर्भ

या संग्रहात कवीने फक्त कारखान्यात राबणाऱ्या कामगाराचेच जगणे चितारले नाही तर शेतात राबणारा कुणबी, दगड फोडणारा, रंगकाम करणारा, ड्रायव्हर, कुल्फी विकणारा, खाणीतले मजूर, वायरमन, गुरखा, रोजंदारीवर जाणाऱ्या बायका, भंगारवाला, विड्या वळणारी बाई अशा विविधस्पर्शी कविता हे या संग्रहाचे विशेष आहे. कष्टाचे ओझे वाहणारे हे लोक कवितेचा विषय होतात तेव्हा नक्कीच काळीज कुरतडणारे शब्द कवितेत उतरतात.

कवी किरण भावसार हे मराठी कवितेतील प्रतिथयश नाव आहे. त्यांचा “घामाचे संदर्भ’ हा महत्वाचा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. एक वेगळी, आशयसंपन्न आणि गंभीरपणे लिहिलेली कविता म्हणून या संग्रहाकडे पहावे लागेल. आजच्या काळात अपवादाने अशी कविता लिहिली जातेय. त्यामुळे ‘घामाचे संदर्भ’ या कवितासंग्रहाची दखल घ्यावीच लागेल. ‘भूक आणि व्यवस्थेपुढे गुडघे न टेकता कष्ट आणि जोखीम खांद्यावर पेलून परिस्थितीशी झुंजणा-या हरेक कष्टकऱ्यास..’ ही अर्पणपत्रिका वाचून मन गलबलून येते. कष्ट करुन सुखाचा घास खाणाऱ्या कष्टकऱ्यांचे, कामगारांचे आयुष्य नक्कीच सोपे नसते. जगण्याचा संघर्ष अटळ असतो. या संघर्षाचा ही कविता आहे. किरण भावसार यांच्या कुटुंबातील आजोबांपासूनचा आयुष्याचा संघर्ष कवीने पाहिला आहे. त्यातून आलेली ही कविता आहे. त्यामुळे ही कविता सच्ची आहे. वास्तव आहे. आपल्या जवळची वाटणारी आहे.

आयुष्य म्हणजे
फक्त तीन शिफ्ट का ?

हा कवीचा ‘रात्रपाळी’ या कवितेतील प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. माणसाचे सारे प्रश्न भुकेजवळ येऊन थांबतात. चकचकीत जगातले कुरुप वास्तव कवी किरण भावसार यांनी मांडले आहे. ते म्हणतात ,

पिझ्झा डिलिव्हरी
करणारा मुलगा
धावपळीत
जेवलाच नाहीये
सकाळपासून …

‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.’ हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शब्द कालातीत आहेत. ते आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडतात. समाजाची उतरंड व्यवस्था जरी सरल्यासारखी वाटत असली तरी ती संपलेली नाही. फक्त त्यांची नावे बदलली आहेत. आजही शोषित, वंचित, कष्टकरी जिवांच्या भोगवट्याला अंत नाही. मराठीत अनेक लेखक, कवींनी या वेदना साहित्यात आणल्या. कवी भावसार यांनी नारायण सुर्वे यांचे काम जवळून पाहिले आहे. त्यामुळे आजही विस्कटलेली कामगार संघटना पाहून ते व्यथित होतात. ‘माफ करा सुर्वे’ कवितेत ते म्हणतात,

माफ करा सुर्वे
कसले कामगार अन्
कसल्या तळपत्या तलवारी

याच कवितेत पुढे ते म्हणतात ,

हँग झालेल्या आमच्या मेंदूत कोण पेरील आता तुमच्यासारखे झोतभट्टीत शेकलेले पोलादी विचार या संग्रहात कवीने फक्त कारखान्यात राबणाऱ्या कामगाराचेच जगणे चितारले नाही तर शेतात राबणारा कुणबी, दगड फोडणारा, रंगकाम करणारा,ड्रायव्हर, कुल्फी विकणारा, खाणीतले मजूर, वायरमन, गुरखा, रोजंदारीवर जाणाऱ्या बायका, भंगारवाला, विड्या वळणारी बाई अशा विविधस्पर्शी कविता हे या संग्रहाचे विशेष आहे. कष्टाचे ओझे वाहणारे हे लोक कवितेचा विषय होतात तेव्हा नक्कीच काळीज कुरतडणारे शब्द कवितेत उतरतात. ‘बोजा’ मध्ये कवी म्हणतात, तुझ्या पायाखाली वीट तीच डोईवर माझ्या युगायुगांचा हा भार कसा वाहू विटू बोजा कवितासंग्रहामध्ये एकूण सत्तेचाळीस कविता आहेत. अभंग ,अष्टाक्षरी, मुक्तछंद असे काव्यप्रकार कवीने हाताळले आहेत. वेगळे प्रतिमाविश्व या कवितेत भेटते. विविध व्यवसायातील, कामातील रोजचे बोलीचे शब्द कवितेत आले आहेत. कवितेची गरज म्हणून काही कवितांमध्ये चपलखपणे इंग्रजी शब्द आले आहेत. कविता अल्पाक्षरी आहेत. कुठेही पसरट झाल्या नाहीत. प्रा. डॉ. अरुण ठोके यांनी या कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे. ते म्हणतात ,’मराठी कवितेतून विरळ झालेला कामगार जाणिवांचा अमोघ स्वर या कवितांत पुलकित झाला आहे. दारिद्रय, अन्याय, विषमता, हिंसा व शोषण या जीवनसत्यांकडे पाहण्याची अभिनव दृष्टी ही कविता देते.’ मराठीतील नामांकित प्रकाशन ‘काव्याग्रह प्रकाशन’ने या संग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे. मुखपृष्ठ मांडणी प्रदीप खेतमर यांची आहे. अनेक कवितांबद्दल विस्ताराने बोलता येईल पण आपण संग्रह वाचावा, त्याशिवाय त्या कवितांची खोली लक्षात येणार नाही. ‘घामाचे संदर्भ ‘ वाचल्यानंतर खूप दिवसांनी चांगली कविता वाचल्याचा आनंद मिळाला. कवी किरण भावसार यांचे या संग्रहासाठी मनःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.

कवितासंग्रह – घामाचे संदर्भ
कवी – किरण भावसार
प्रकाशन – काव्याग्रह प्रकाशन
पृष्ठसंख्या – १०८
मूल्य – १६० रुपये

कामगार चळवळीला वाहिलेलं किरण भावसार यांचं काम आणि कविता सुद्धा कामगारांच्या जगण्या – मरण्याशी. तसेच त्यांच्या रोजच तारेवरची कसरत करीत जगण्याशी समानुभूती दर्शविणाऱ्या. कामगारांच दुखः, वेदना विशीवर टांगणा-या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading