July 27, 2024
Book Review of Onjalithil Chapha
Home » ओंजळीतील चाफा – आत्मशोधाचा नकाशा
मुक्त संवाद

ओंजळीतील चाफा – आत्मशोधाचा नकाशा

व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं आहे.

रवीन्द्र दामोदर लाखे

हेन्री डेव्हिड थोरोशी आत्मसंवाद साधणारं लागोपाठ दुसरं पुस्तक वाचलं. ऋजूता नि समंजस आकलन यांचा मिलाफ म्हणजे संतत्वच ते या पुस्तकात गवसतं. भटकंती या हेसेच्या पुस्तकापाठोपाठ हे पुस्तक वाचणं हा योगायोग नाही. स्वानंद कुलकर्णींना मी आत्मसखा म्हणून ओळखतो. त्यांच्याशी झालेल्या पूर्वींच्या तुरळक संवादातून ते मला पूर्ण कळले होते हे मला हे पुस्तक वाचल्यावर खात्रीचे वाटले.

यातले बहुतांशी निबंध वजा लेख महाराष्ट्र टाईम्सच्या सगुण निर्गुण या सदरातून पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक वाचतांना लेखकाच्या मनाची निर्मळता पाहून मला तरी गिल्ट आले. या पुस्तकाचं सूत्र कवी दत्ता हलसगीर यांच्या एका कवितेतील दोन पंक्तीत आहे.

ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी द्यावीत.

रवीन्द्रनाथ टागोरांच्या म्हणण्यानुसार हे लेखन तुम्हाला काही शिकवत नाही. टागोर म्हणतात, I have come not to teach you, but to awaken. काही ठिकाणी तर हे पुस्तक झडझडून जागं करतं. ते एके ठिकाणी सॉक्रेटिसचा हवाला देऊन म्हणतात की प्रवाहात पडणे स्वाभाविक असू शकते; पण पडणे हे हरणे नसते तर पडल्यानंतर पुन्हा न उठणे हे हरणे असते.

प्रभो द्यायचे असलेच काही ! तर माझे मी पण जाऊ दे जनसेवेत तुज पाहता ! निर्माल्य माझे होऊ दे !
असली अवतरणं आणि संदर्भ यांची निवड या माणसाची अभिरूची लक्षात आणून देते. त्याची जीवन जाणीव ठरवते.

चित्र काढणाऱ्या मुलाला ते सांगतात,” तुझ्या देखाव्यातल्या माणसाला तू या देखाव्यात छान दिसणाऱ्या रंगसंगतीप्रमाणे कोणताही रंग दे. कारण माणसाचा खरा रंग शोधण्याची प्रक्रिया चिरंतन चालणारी आहे.

लेखकाला वाटतं की उत्तुंग तरीही सखोल व्यक्तिमत्वे आपल्याला आयुष्य जगायला शिकवत असतात. हा सत्संग वेगळा नाहीय – पण आपल्या आत जो कुणी आहे त्याच्या वाढीसाठी असला सत्संग उपयोगाचा आहे. व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं आहे.

ते एके ठिकाणी म्हणतात की आयुष्यातल्या आदर्शापेक्षा, आयुष्यापलीकडील आदर्शे अंगीकारली पाहिजेत अशा आदर्शात घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे असते ज्याची परंपरा निर्माण होऊ शकते.
या पुस्तकात येणारे काही संदर्भ हे महत्त्वाचे आहेत उदाहरणार्थ सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ हेन्द्री डेविड थोर हो हा विचारवंत इमर्सन यांच्या बंगल्याच्या बगीच्या मध्ये काम करीत होता कारण त्याला माहित होतं थोरामोठ्यांचा सहवास ही खरी पाठशाळा असते.

एकनाथांनी दत्तांच्या गुरुंबद्दल लिहिले आहे “ जो जो जयाचा गुण तो तो गुरु म्या केला जाण “ ज्याच्या ज्याच्याकडून काही घेण्यासारखे वाटले तो तो त्याबाबतीतला गुरु झाला. असे मधून मधून येणारे संदर्भ आपल्याला समृद्ध करतात. त्यामुळे हे सर्व लेखन अत्यंत सात्विक, सोज्वळ पण सत्यधर्मी झालेलं आहे. हे आत्मपरीक्षण करणारे आत्ममग्न लेखन आहे. जणू काही आत्मशोधाचा नकाशा. लेखकाने सर्वांकडून काही ना काही घेतले आहे. ज्यांच्याकडून घेतले त्या माणसांच्या निवडीमध्ये कुठलेही सूत्र नाहीये किंवा कुठलाही इझम नाहीये.

उदाहरणार्थ या पुस्तकात कर्मवीर येतात, शाहू महाराज येतात, रत्नाप्पा कुंभार येतात, टागोर येतात अनेक लोक येतात त्यांच्याकडून या लेखकाने काही घेतलेलं आहे. त्यांच्या मते मूल्यं जपायची असतील तर आंतरिक सच्चेपणा हा महत्त्वाचा ठरतो. कशी असतात मूल्यं ? कवी इंदिरा संत म्हणतात की कवितेने मला आनंद दिला मी कवितेला आयुष्य दिले. ही गोष्ट फार कठीण आहे – हे एक मूल्य आहे.

जगताना एक वेळ अशी येऊ शकते की या आयुष्याला काही अर्थ नाही असं आपल्याला वाटतं इथेच आपली परीक्षा असते आणि ती परीक्षा अशी असते या अर्थ नसलेल्या आयुष्याला आपण अर्थ देण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्व कलाकार करत असतात पण सामान्य माणूसही हे करू शकतो. अरुपाचे रूप दाखवणाऱ्या या पुस्तकात उत्तम जीवन दृष्टीचा शोध घेण्याचा ध्यास प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे एक विधान मला उद्बोधक वाटले ते म्हणतात नाट्यकला म्हणजे सत्यापर्यंत नेणारे मिथ्य.
या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण म्हणजे साक्षात्कारासारखे आहे कबीराचा एक दोहा देऊन त्यांनी म्हटले आहे की जे जे आपल्याला वाटतं आहे तो एक भ्रम आहे – मग या भ्रमाचं काय करायचं ? तर
कहै कबीर भरम सब भागा ! एक निरंजन सूँमन लागा
कबीर म्हणे भ्रम नसे राहिला! एक निरंजन हृदयी पाहिला !!
स्वयम्अध्ययाने आणि जीवनाचा व्यवहार वाद या पुस्तकातून सांगितला आहे. तरी लेखक म्हणतो
तुम कहते हो कागज लेखी! मै कहता मुझ नयनदेखी !!.
आयुष्याच्या पातळीहून उंच व्हायचं असेल ,उन्नत व्हायचं असेल तर हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं. त्यावर चिंतन मनन करावं. जे काही त्यातून सापडेल त्याचा मार्ग धरावा – पुढे तो चुकला आहे वाटलं तर थांबावं, शोध घ्यावा नि पुढे जावं.

रवीन्द्र दामोदर लाखे

पुस्तकाचे नाव – ओंजळीतील चाफा ( ललित निबंध )
लेखकः स्वानंद कुलकर्णी
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
किंमत – २८० रुपये

Bestsellers
ओजळीतील चाफा
फुलं झाडावर तर छान दिसतातच, पण जेव्हा ती एका ओजळीतून दुसऱ्या ओंजळीत जातात, तेव्हा ती आणखी छान दिसतात. जी गोष्ट फुलांची, तीच विचारांचीही.
मनात जेव्हा शुद्ध, सात्त्विक विचार उमलतात, तेव्हा ते त्या कुणा एका व्यक्तीला तर आनंद देतातच, पण जेव्हा ते शब्दरूप लेवून
एका मनातून दुसऱ्या मनात शिरतात, तेव्हा ते अधिक प्रकाश पसरवतात, अधिक प्रेरणादायी ठरतात.
जगातलं, निसर्गातलं सौंदर्य आपल्या आस्वादक नजरेनं टिपण्याची किमया साध्य झाली म्हणजे ते इतरांनाही दाखवण्याची असोशी जन्म घेते. अशाच असोशीतून एका रसिकाला स्फुरलेल्या काही ललित लेखांचं हे संकलन,
हे छोटेखानी लेख म्हणजे जणू काही सोनचाफ्याची फुलंच. त्या फुलांचा सुगंध जसा मन मोहरवून टाकणारा असतो,
तसेच हे लेखही सात्त्विक समाधान देणारे आहेत. चौफेर संचार करणारे, प्रेरणेच्या पणत्या पेटवणारे आणि भावविश्व समृद्ध करणारेही !

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्वानुभवासाठीच हवे वैराग्य

अरुण पौडवाल स्मृति गौरव पुरस्कार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर

ब्रह्माशी ऐक्य साधन्यासाठी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading