October 16, 2024
an-observation-of-ground-water-and-ground-temperature-by-upendra-dhonde
Home » Privacy Policy » भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण

गेल्या आठवडाभरात सहजच सोलापूर, रावेत (पुणे), हिंदुपूर व लेपाक्षी ( आंध्र) या शहरांमधील तापमानाचे निरिक्षण केले तेव्हा आढळले की, एका भागात जिथं दुपारी दोन ते तीन पर्यंत तापमान स्थिती महत्तम असते, ती दुपारनंतर हळूहळू कमी होत जाते. उदाहरणार्थ, दुपारी 38 अंश सेल्सिअस असलेले तापमान दर तासाने एकेक अंशाने कमी होत, सायंकाळी सात आठ वाजेपर्यंत साधारणपणे 28 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत पोचते आणि रात्री बारापर्यंत अगदी 24-25 पर्यंत पोचते. याउलट सोलापूर मध्ये मात्र दुपारी एक वाजता असलेलं 30 अंश तापमान वाढत जात, जवळपास चार ते पाच दरम्यान महत्तम 41 पर्यंत पोचते आणि मगच ते कमी व्हायला सुरुवात होते, ते ही अगदी हळूहळू (साधारणपणे आठ वाजेपर्यंत ते 6-7 अंश इतकेच उतरते).

मी नुकतेच एका अभ्यास दौऱ्यानिमित्तानं आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात (पुर्वीचा अनंतपूर जिल्ह्याचा भाग) हिंदूपुर – लेपाक्षी या ठिकाणी गेलो होतो. दोन्ही शहरांत फक्त 13 किमीचे अंतर, पण सायंकाळी सहा ते सात दरम्यान हिंदूपूर मध्ये रस्त्यावर फिरताना अक्षरशः ओव्हन मध्ये भाजल्यासारखा अनुभव, तर लेपाक्षीत मात्र थंडावा. तसे पाहता, हिंदुपूर हे शहर जास्त दाटीचे- गजबजलेले आणि लेपाक्षी मात्र तुलनेने मोकळे. वृक्षांची संख्या म्हणाल तर फारसा फरक नाहीच, उलटपक्षी लेपाक्षीत कमीच. अर्थात, थंडाव्यातला हा फरक हा फक्त वनराईचा परिणाम म्हणून नव्हताच. भौगोलिकदृष्ट्या देखील दोन्ही शहरं अगदी जवळपास, त्यामुळे हवा, तापमान, पर्जन्यमान वगैरेत देखील तितकासा फरक नाहीच. मग फरक नेमका कुठं होता?

उत्तर मिळाले, फरक होता तो भू-तापमानात. होय, हिंदूपूरमध्ये भूजल पातळी प्रचंड खोल, सरसकट 800- 1000 फूट खोलीच्या बोअरवेलनं जमिनीची चाळण झालेली. त्यामुळे दुपारच्या उन्हात जमिन, बांधकामं प्रचंड तापलेली. दिवसभर जमीन तापल्यावर, सायंकाळी ती लगेचच थंड होतच नाही, त्यामुळे जमिनीलगतची हवा सायंकाळी देखील तशीच गरम राहते. त्यामुळे दुपारी तीन-चारला असलेले महत्तम तापमान सायंकाळी सात वाजले तरी फारसे कमी होत नाही. दुसरीकडे, लेपाक्षीला मात्र दुपारी हिंदूपूर इतकिच गरम जमीन व हवा असते, वृक्षराजी देखील तशी कमीच आहे पण सायंकाळी मात्र तिथं लगेचच थंडावा निर्माण होतोय, कारण जमीन थंड होतानाच लगतची हवाही थंड होत रहाते.

तात्पर्य, भूजलाकडे फक्त पिण्यासाठी वा आपल्या इतर वापरासाठी आवश्यक पाणी म्हणून पाहताना, आपण भूजलाचे पर्यावरणीय महत्व याकडे सहजच दुर्लक्ष करतोय. ज्या भागात भूजल पातळी प्रमाण उथळ आहे, त्या भागात दिवसाचे तापमान व रात्रीचे तापमान यातला फरक हा जास्त आढळून येतो. तर ज्या भागात भूजल पातळी प्रमाण खूप खोल आहे, अर्थात जलधर रिकामे होत आहेत त्या भागात दिवसाचे तापमान व रात्रीचे तापमान यातला फरक हा कमी आहे. उदाहरणार्थ, अशा शहरी भागात दिवसा महत्तम तापमान 41 पर्यंत गेलेले, रात्री 33-35 पर्यंतच खाली येते पण त्याचवेळी ग्रामीण भागात जिथं भूजल पातळी सुस्थितीत आहे तिथे मात्र अगदी 43 पर्यंत वाढलेले तापमान, रात्री अगदी 25 -30 पर्यंत खाली येते.

शहरी भागातील अनिर्बंध भूजल उपशामुळे तिथे भूमी सातत्याने तापत आहे, जलधर रिकामे होण्यानं तापलेली हि जमीन फक्त वृक्षलागवडीनं थंड होण्यास असमर्थ आहे ( अर्थात वृक्षांचा काहीच उपयोग नाही असे नाही ). म्हणून जमिनीचा तापलेला हा आत्मा शांत करणे हाच एक पर्याय आहे आणि तो फक्त वृक्षलागवडीनं शक्य नाही तर सोबत भूजल संधारणा देखील अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा, आहे ती वृक्षराजी देखील टिकून राहणं अवघड आहे.

तात्पर्य: लक्षात घ्यायला हवे की, भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण होतात. वृक्षलागवड न टिकणे हा त्यापैकीच एक परिणाम जो निसर्ग बेट संकल्पनेत सांगितलेला. तसाच, शहरी भागात आढळणारा हवेतला उष्मा हा देखील एक परिणाम. म्हणूनच सोलापूर मध्ये दुपारी दोन तीनला महत्तम तापमान असण्याऐवजी ते अगदी चार-पाच वाजता आढळून आले, जे पुढच्या चार तासांतही विशेष कमी होत नव्हते.

उपेंद्र धोंडे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading