‘रंधा’ फिरविल्यावर चोपडे , गुळगुळीत बनविते . लेखकाच्या दृष्टीने त्याच्या आधिच्या पिढ्यांची आयुष्ये वाकसाने तासलेल्या लाकडासारखी ओबडधोबड होती पण आई-वडील रुपी ‘रंध्याने’ लाकडाचं बेढपपण काढून त्याला सरळ करुन , त्यावरील पापूद्रा काढून चकचकीत करुन मुलांच्या जीवनात शिक्षणरुपी ‘रंधा’ मारुन लेखकाची व भावंडांची आयुष्ये गुळगुळीत व समृद्ध बनविली म्हणून ते सुखी जीवन जगत आहेत
भास्कर सखाराम गायकवाड (माजी प्राचार्य)
व्याड, ता. रिसोड जि . वाशीम . ९७६३४२२५१८
शब्दान्वय प्रकाशनाने नुकतीच प्रकाशीत केलेली आत्मकथनात्मक भाऊसाहेब मिस्तरी यांची रंधा ही कादंबरी वाचण्यात आली .या कादंबरीत खेड्यातील वास्तव वाचकांच्या मनाचा ठाव घेते. ग्रामीण प्रथा, परंपरा, लोकजीवन,अठरा विश्वे दारिद्रय, संघर्ष, अस्सल ग्रामीण अहिराणी बोलीभाषा,सुक्ष्म बारकावे, ग्रामीण जीवनाचे अंतरंग अत्यंत प्रगल्भतेने ‘रंधा’ या कादंबरीत उतरलेले आहे. खेडयातील समाजजीवन रुढी, परंपरा सनवार यांचे तपशीलवार वर्णन खेडं साक्षात उभं करतात. माझीही जडणघडण खेडेगावातील असल्याने व विशेषतः सुताराचे व माझे घर- अंगण एकच असल्याने (आत्तापण आहे ) सुतार कामाशी, त्याच्या जीवनाशी हत्यारे, अवजारांशी जवळून परिचित आहे. सुताराच्या कार्याशी निगडित काही हजारांची नावे वानगीदाखल सादर करतो उदा.( अंभोर , आरगडा, खतावणी, करवत, कानस, कैवार , कचरा, गिरमिट, चिरणं, ठिय्या , दातवाकी, पटाशी, माथकडी, रंधा व बरेच काही ) ‘रंधा’ मध्ये वर्णन केलेल्या घटना किंवा सन यांचे वर्णन वाचतांना सुताराचा कामठा व बालपण डोळ्यासमोर उभं राहतं .धुळे शहराच्या दक्षिणेला सतरा किलोमीटरवर मुंबई – आग्रा महामार्गावर वसलेलं ‘आर्वी’ या गावातील लेखक भाऊसाहेब मिस्त्री यांच्या जीवनातील जडणघडण ‘रंधा’ या कादंबरीत त्यांनी चितारलेली आहे .
सकाळचं कोवळं ऊन आता तापायला लागलं होतं वाल्मिक अण्णाचं सुतारकाम आपल्या अंगणात चालू होतं . या वाक्याने कथानकाची सुरुवात होते . अण्णाने संशयी स्वभावामुळे पहिली पत्नी शकुंतलाला काडीमोड दिला .दोन नंबरची पत्नी द्वारका स्टोव्हच्या भडक्याने घर पेटून दोन मुलांना मागे सोडून आगीत जळून मृत्यू पावते अण्णांचा सोन्यासारखा संसार क्षणात उद्ध्वस्त होतो . भविष्यावर विश्वास नसतांनाही तुम्हाला तिन बायका होतील ही भविष्यवाणी सत्यात उतरते आईविना पोरक्या झालेल्या लहानग्यांच्या आत्मिय कळवळ्याने आपल्या तरुण उपवर मुलीचं लग्न लावून देणारे गंगाराम सुतार हे पात्रही मनात घर करते ताई एकटीच माहेराला आली असता मुलांना का आणले नाही (सावत्र) म्हणून घरात येऊ नको म्हणणारा वडिल विरळाच . लेखकाच्या वडिलांचे म्हणजे अण्णांचे पात्र सह्रदयी, कष्टाळू व मूल्यवादी आहे .सहजच्या कामातून लेखकाला ध्येयाप्रत जाण्याचे धडे देणारे अण्णा आपणाला या आत्मकथनात भेटतात. रंधा ओढताना लेखकाला धाप लागते लेखक म्हणतो माझ्याच्याने हे काम होणार नाही अण्णा म्हणतात “एक कर’ शाळेत मन लाऊन अभ्यास कर, पुढे तुला आपोआप तुझी वाट सापडत जाईल” अण्णा काम करता करता मला जगण्याचे आणि जगाचे धडे देत होता. (पेज -९६) देव माणूस होता माझा बाप . अण्णा तत्त्वाने जगणारा माणूस होता. वामणला बैलाला टोचण्याची आरी (पुराणी) बसवून दिली नाही. कोणी कितीही पैसै दिले तरी अण्णा हिरवं झाड तोडून देत नव्हता .पाटलाने सतत तिन वर्षे खराब ज्वारी दिली म्हणून शेतीचे औतं भरुन देण्यास नकार दिला व त्यावर ठाम राहिले हा बाणेदारपणाचा गुणही होता .विषारी गवत खाल्ल्याने भावाच्या गाई मरतात तेंव्हा “माझे भांडण भावाशी होतं, मुक्या जिवाशी थोडच होत”? म्हणून हळहळणारा हळव्या मनाच्या अण्णाचे काळीज हेलावते .
आईचे नाव कुसुम पण लेखक तिला ‘ताई’ च म्हणतात . अतिशय हळव्या तसेच करारी, कष्टाळू आईचे चित्र लेखकाने दमदारपणे उभे केले आहे . अतिशय कष्टाने रोजमजूरी करून संसाराला हातभार लावणारी आई कादंबरीभर व्यापून आहे .सावत्र मुलांनाही सख्या आईची माया देणारी ताई लक्ष वेधून घेते .बापाने पाहिलेल्या स्वप्नांत स्वतःला झोकून देणारी आई फार मोठी त्याग मूर्ती म्हणून ती आपल्या समोर येते. तिचं मन मारुन जगणं, सात पोरांची बाळांतपणे, कुणाही पुढे न झुकण्याची वृत्ती, स्वाभीमानाने जगणारी व मुलांनाही स्वाभीमानाने उभी करणारी माऊली फार मोठ्ठी प्रेरणा देते. घर बांधताना दोन्हीही बाजूचे शेजारी जाणूनबुजून त्रास देतात अडथळा निर्माण करतात तर अण्णांचा सख्खा भाऊ अडिचशे रुपये मागतो तेंव्हा घर बांधण्यासाठी परवानगी देतो तेंव्हा शांत , संयमी ताई संतापते “कष्टाचं पुरत नाही माणसाला हे तर हरामाचं घेतलं “असे तळमळून बोलते हे बोल खुप आतुन आल्यासारखे वाटतात .नविन आलेली सून आर्वी सोडून नव-यासोबत जातांना एक कळशी सुद्धा ठेवत नाही तेंव्हा तिचे विदीर्ण मझालेले मन खुप आक्रंदते वाचकांच्या मनालाही वेदना होतात. चंदूला दोनदा बाजरीचे पोते विकून सहलीला पैसे देणारी आई खूप मोठी वाटते. सर्वांपेक्षा ती अधिक भावते .
लेखक कादंबरीच्या दुस-या भागापासून प्रथमपुरुषी निवेदन करतो. शाळेत जाणारी लेखकाची ओढ थक्क करणारी आहे. प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक पण पाहणे त्याबद्दल प्रश्न विचारणे, रोकडोबाचया मंदिरासमोरचा गाईचा अपघात हळवा बनवतो. उत्तर महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये लेखक हिरिरीने भाग घेतात. होळी पौर्णिमा, दांडी पौर्णिमा यांचे अगदी आत्मियतेने वर्णन केले आहे त्यात भाग घेतात खान्देशी गीतं , ओव्याने कादंबरी समृद्ध झाल्यासारखी वाटते .भिका कल्हईवाला खुपचं सुंदर चितारला त्याला चहा, जेवण नेऊन देणे , त्यांच्या मृत्यूचा चटका सर्व गावाला लागणे, त्याला मुठमाती देऊन गावाने माणूसकीचे दर्शन घडविले हा प्रसंगाचे वर्णन डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही हा प्रसंग सुंदर चितारला आहे. गारेगार वाला समीरभाई तो पण सुंदर रेखाटला आहे. चिमणीचा मोडलेला पाय फेविकाॅलने जोडून दिल्यावर ती दोन्हीही पायावर उभी राहिल्यानंतर लेखकाला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे . त्यातच त्यांच्या डाॅक्टरकीचे बीजं रुजलेली आहेत असे वाटते .बलूतेदारीचे प्रतिक अक्षयतृतीयेला पुरणाची पोळी मागण्याची चालत आलेली अनेक पिढ्यांची परंपरा लेखकाने खंडित केली ही बंडखोरी सुद्धा वाचकाला भावल्याशिवाय राहातं नाही .यातून आत्मसन्मानाचे, स्वाभिमानाचे दर्शन घडते .
#रंधा या शब्दांचा अर्थ “रंधणे ” “रांधणे” असा होतो. म्हणजे लाकडावर लाकूड घासणे, त्या लाकडाला चकचकीत करणे, गुळगुळीत बनविणे, लाकडाला देखणेपण आणणे या साठी या हत्यारांचा वापर होतो .लाकडाचे स्वरुप ओबडधोबड, रखरखीत, खरबरीत असते त्यावर ‘रंधा’ फिरविल्यावर चोपडे , गुळगुळीत बनविते . लेखकाच्या दृष्टीने त्याच्या आधिच्या पिढ्यांची आयुष्ये वाकसाने तासलेल्या लाकडासारखी ओबडधोबड होती पण आई-वडील रुपी ‘रंध्याने’ लाकडाचं बेढपपण काढून त्याला सरळ करुन , त्यावरील पापूद्रा काढून चकचकीत करुन मुलांच्या जीवनात शिक्षणरुपी ‘रंधा’ मारुन लेखकाची व भावंडांची आयुष्ये गुळगुळीत व समृद्ध बनविली म्हणून ते सुखी जीवन जगत आहेत . ग्रामीण जीवनाचा पट डोळ्यासमोर उभे करणारी ही कादंबरी एकदा तरी वाचावी असे वाचकाला आवाहन करतो.
पुस्तकाचे नाव – ‘रंधा’
लेखक – भाऊसाहेब मिस्तरी
प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ – नितीन खिल्लारे, मूल्य – ३२१ रुपये
कादंबरीसाठी संपर्क नंबर : मो. +९१ ९३२१७७३१६३
