आत्मा अमर आहे. त्याला वास नाही. तो दिसतही नाही. त्यामुळे त्याची ओळखच आपणाला पटकण होत नाही. पण त्याचे अस्तित्व आपल्यात आहे. शरीरात असूनही तो निस्तेज वाटतो. त्याचे अस्तित्व जाणून घेणे. शरीरापासून तो कसा वेगळा आहे हे समजून घेणे हेच अध्यात्म आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
https://iyemarathichiyenagari.com/
राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगे रुंधला ।
तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ।। 1011 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – राजा शत्रूच्या आधीन झाला असता, जसा निस्तेज होतो. अथवा सिंह रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या आधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो.
आपण आजारी असल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर त्यांची लक्षणे स्पष्ट दिसतात. चेहऱ्यावरील तेज नाहीसे होते. आपल्या आवाजात, विचारातही फरक दिसून येतो. आपले स्वातंत्र्य ज्यावेळी हिरावून घेतले जाते त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर नाराजी येते. आपल्यातील तेज नष्ट होते. आपला चेहरा निस्तेज होतो. मोठ्या पदावरील व्यक्तीकडील अधिकार जेव्हा काढून घेतले जातात तेव्हा त्या व्यक्तीच्याही चेहऱ्यावर त्याची लक्षणे स्पष्ट दिसून येतात. त्यांची वाईट अवस्था यातून स्पष्ट होत असते. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा राहात नाही. ते निष्क्रिय होतात.
राजा शत्रूच्या आधीन झाल्यानंतर तो सुद्धा निस्तेज होतो. अशीच अवस्था आत्मा शरीरामध्ये आल्यानंतर आत्म्याची होते. तो शरीरात असतो. त्याचे अस्तित्व असते. पण त्याचे तेज दिसून येत नाही. उघड होत नाही. त्याची जाणिव आपणास होत नाही. सर्व काही आपले लक्ष शरीरावरच असते. सर्व व्यवहार शरीराकडूनच होतात असा आपला ग्रह होतो. कारण आत्म्याची जाणिवच आपणाला होत नाही.
आत्मा अमर आहे. त्याला वास नाही. तो दिसतही नाही. त्यामुळे त्याची ओळखच आपणाला पटकण होत नाही. पण त्याचे अस्तित्व आपल्यात आहे. शरीरात असूनही तो निस्तेज वाटतो. त्याचे अस्तित्व जाणून घेणे. शरीरापासून तो कसा वेगळा आहे हे समजून घेणे हेच अध्यात्म आहे. आत्म्याचे ज्ञान होणे, जाणिव होणे हेच आत्मज्ञानी होण्याचे लक्षण आहे. संत ज्ञानेश्वरांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी उदाहरणे देऊन तेच तेच सागण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. हा त्यांचा प्रयत्न लोकांना ज्ञानी करण्याचा आहे. विश्वातील सर्वांना हे ज्ञान व्हावे यासाठीच हे वारंवार आपल्या मनावर बिंबवण्यात आले आहे. आपली ओळख करून घेण्याचा सल्ला ज्ञानेश्वरीत अनेक उदाहरणे देऊन केला आहे. आपणाला जागे करण्याचा, सावध करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
स्वः ची ओळख, खऱ्या तेजाची ओळख आपणास व्हावी. मी कोण आहे ? याचे ज्ञान व्हावे. यातूनच आपणास जगाचे ज्ञान होते. आपल्या शरीरात असणारा आत्मा विसरलो आहोत. त्याचे हे अज्ञान दूर करून ज्ञानी होण्याचे आपण विसरलो आहोत. अशामुळेच आपण आपल्या स्वतेजाला, अमरत्वाला मुकलो आहोत. आपण सदैव तेजस्वी राहण्यासाठी स्वःचे नित्य स्मरण आपण ठेवायला हवे. स्वःच्या ओळखीतूनच आपण तेजस्वी, अमर व्हायला हवे. यातून येणारी आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आपणास आत्मज्ञानाकडे, ब्रह्मसंपन्नतेकडे नेते हे जाणायला हवे. त्यानुसार आपण आपले आचरण ठेवायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.