कवयित्री संगीता अरबूने यांच्या कविता संग्रहाचे रामदास खरे यांनी केलेलं परीक्षण
‘बाईची जडणघडण आणि तिचा हा सगळा प्रवास माझ्या जाणीवेला कायम चुचकारत राहिला. त्यातुनच अशा कवितांची मालिका आकाराला आली.’
बायकाखूप सावरून धरतात जगणंत्यातुनही अडकलंच एखादं टोकसांदीकोपऱ्यात अडगळीततर स्वतःला पुन्हा पुन्हाहिसके देत राहतात बायका. तरीही नाही सुटलं तेतर पालीसारखं तोडूनच टाकतात त्या ते. पण पालीसारखं झटपट मोकळंनाही होता येत त्यांना !आजची स्त्री फक्त चूल आणि मूल यामध्ये रमलेली नक्कीच नाहीये. शिक्षणाची कास धरत ती प्रगतीच्या, यशाच्या शिखरांना स्पर्श करीत आहे. विविध क्षेत्रांमध्ये ती नाव कमवत आहे.
हे सारं साधत असताना तिचं दुर्लक्ष आपल्या घरकुलाकडे, आपल्या माणसांकडे अजिबात झालेलं नाहीये. उलट सर्वांना आपलेसं करून ती पुढे जात आहे. इतकं सारं संचित असूनही अर्थार्जनासाठी उंबरठ्याबाहेर पडल्यावर अनेक विखारी नजरांना आणि लोचट स्पर्शांना तिला सामोरं जावं लागतं. कारण नसताना दुसऱ्यांचे टोमणे, विचित्र कॉमेंट्स तिला ऐकायला लागतात. पण आपलं घर विस्कटू नये, नात्यांमधली वीण उसवू नये यासाठी ती जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते.
यादाहक अनुभवापेक्षा कधी कधी मनातली घुसमट अधिक वेदनादायी असते. पुन्हा काळ कोणताही असो ही घुसमट तिला काही टळलेली नाही. यामध्ये कधीकधी आपली माणसंही असतात त्यावेळी त्या स्त्रीचा कोंडमारा अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. अनेकांची इच्छा असूनही त्यांना व्यक्त होता येत नाही. त्याची वेगळी कारणं असू शकतील. पण ती स्त्री जर लेखिका, कवयित्री असेल तर भवतालची आणि अंतर्मनाची घुसमट ती प्रभावी, मोजक्या शब्दात कागदावर मांडू शकते. हे सारं मांडल्यावर ती काहीशी मोकळी होते.
कवितेच्या माध्यमातून ती आपल्याशी संवाद साधते.बायकांनीओलांडला असला उंबरठातरी आजवर मोडली नव्हती चौकटआज मात्र त्या निघाल्याहेतसगळ्याच चौकटी मोडतकात टाकलेल्या नागिणीसारख्या सळसळतवाट अडवणाऱ्या प्रत्येक पावलाला डसत !आता तिला कोणीही अडवू शकत नाही. ती मुक्त होऊ पहाते. नव्या जाणिवेचं, नव्या अनुभूतीचं ती गाणे गाऊ लागते.
सामाजिक जाणिवेचं उत्तम भान असलेल्या आणि आपल्या कवितेतून जीवनाविषयीचं मुक्त चिंतन रेखाटणाऱ्या आजच्या महत्वाच्या कवयित्री म्हणजे वसईच्या संगीता अरबुने. ‘ बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर’ असं लांबलचक शीर्षक असलेला त्यांचा हा चौथा कविता संग्रह ग्रंथाली सारख्या दर्जेदार प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. आजवर त्यांची एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या प्रत्येक बावन्न कवितांची सुरवात ही ‘बायका’ या शब्दापासून होते. या बावन्न कविता वाचत असताना मला खूप पूर्वी वाचलेल्या कवयित्री सुशील पगारिया यांच्या काही ओळींचे स्मरण झाले. त्या म्हणतात :वस्त्रांच्या ओढीने मागे वळते तोतू म्हणत होतास, गुंतणं म्हणजेच आयुष्य ! पदराचे रेशीम धागेखांबाच्या नक्षीत होते की तुझ्या बोटात ? स्त्री हा समाजव्यवस्थेचा भक्कम पाया आहे. नातीगोती, मित्रपरिवार घट्ट बांधून ठेवण्याचं, त्यांना खाऊपिऊ घालण्याचं महत्वाचं काम ती करीत असते. तिला कधी बाहेरची क्षितिजे खुणावतात मात्र तिचा पदर घरात अडकलेला आहे. सामाजिक वास्तवाला नेमकं पकडणारी ही कविता बरंच काही भाष्य करून जाते. संगीता अरबुने यांच्याही या संग्रहातल्या अनेक कविता आपल्या अंतर्मुख करतात.
ज्या झुळकीमुळे तो पदर झुळझुळता राहिला आहे त्या झुळकीचे अस्तित्व कवयित्रीने विविध निरीक्षणांच्या माध्यमातून अचूक टिपलं आहे. यामध्ये कुठेही आक्रोश नाही, त्रागा नाही की बंडाची भाषा नाही. आहे फक्त स्त्रीवादी समजेची उत्तम जाण. दैनंदिन कामकाजामध्ये, संसारात व्यग्र असताना एका संवेदनशील स्त्रीने टिपलेली आपल्या आयुष्याची ही टोकदार स्वगतं आहेत.
घरातल्या किंवा बाहेरील अगदी साध्यासुध्या प्रसंगाला सामोरं जाताना होणारी बाईची सूक्ष्म घुसमट कवयित्रीनं अचूकपणे टिपली आहे. अनेकांच्या नजरेतून सुटलेली ही स्पंदनं ही कवयित्री मात्र प्रभावी शब्दांतून कागदावर मांडते. ही स्वगतं आपल्याला अस्वस्थ करतात. सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी या संग्रहाची पाठराखण (blurb) केली आहे. त्यात त्या म्हणतात.’ आजवर खांद्याभोवती घट्ट पदर लपेटणाऱ्या स्त्रियांनी काळाने बहाल केलेल्या आधुनिकतेच्या, परिवर्तनाच्या सुंदर मुक्त वाऱ्यावर आता आपला पदर झुळझुळत ठेवला आहे. या सुखद शीतल झुळकीचे अस्तित्व संगीता अरबुने यांनी या कवितांमध्ये टिपलं आहे.’ तर आपल्या मनोगतातून कवयित्री संगीत अरबुने या संवाद साधतात. ‘बाईची जडणघडण आणि तिचा हा सगळा प्रवास माझ्या जाणीवेला कायम चुचकारत राहिला. त्यातुनच अशा कवितांची मालिका आकाराला आली.’
ग्रंथालीने या संग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे. चित्रकार सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ बोलके आहे. बायका करत नाहीत आताशा स्वप्नांना पिनअपत्या झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदरअसं लक्षवेधी, प्रत्ययकारी, अल्पाक्षरी लिहीणाऱ्या या कवयित्रीकडून आता वाचकांच्या अपॆक्षा नक्कीच वाढल्या आहेत.
कविता संग्रह – बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर
कवयित्री – संगीता अरबुने मोबाईल – ८०८०२३३९६३
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई.
पृष्ठे : ६६, मूल्य : रु. १००
बायकाझुळझुळतठेवतातआयुष्याचापदर’ मधील एक कविता
असंही होतं कधी कधी
मेनॉपॉज आला की
येऊ लागतात तिच्या हनुवटीवर केस
वाढू लागते ओठांवरची लव
मऊ मुलायम केस
होत जातात अरबट चरबट
त्वचा राठ
वेळी अवेळी भरून येणारं
डोळ्यातलं आभाळही होतं जातं कोरडं ठाक
ओढणीशिवाय बाहेर न पडणार्या तिला
ओढणीची घडीही मोडविशी वाटत नाही
छातीवर रेंगाळणाऱ्या पुरुषांच्या नजरेने
कावरीबावरी होणारी ती
त्याची नजर छातीत रुतत गेली
तरी तिच्या लक्षात येत नाही
आणि आलं तरी ती फारशी विचलित होत नाही
नटण्या मुरडण्यातलंही तिचं संपत जातं स्वारस्य
घरात असूनही नसल्यासारखीच असते ती
करतही नाही तिन्हीसांजेला दिवाबत्ती
नवऱ्या मुलांत घुटमळणारा
तिचा जीवही होत जातो मोकळा मोकळा!
नवऱ्यासोबत एखादं दुसरा पेग घेणारी ती
घेऊ लागते मोकळेपणाने
आणि त्याच्याचसारखी टीपॉयवर ऐसपैस पाय टाकून
पाहत राहते ‘अर्णवज डिबेट’
ड्रायव्हिंग करताना अधेमध्ये घुसणाऱ्याना
घालत राहते शिव्या
पुरुषासारख्या उद्दामपणे
छळत नाही तिला आता कुठल्याच प्रियकराची आठवण
हव्या हव्याशा मित्राचा सहवासही
नकोसाच वाटू लागतो तिला
आणि मैत्रिणींबद्दल वाटणारी असुयाही
कुठेतरी लुप्त होऊन जाते
बघता बघता तिच्यातलं कणभर तत्व
पसरत जातं मनभर
घुमू लागतो देहामध्ये शंखध्वनी
ती ऐकते पुन्हा पुन्हा ऐकते
स्वत:मध्ये खोल खोल डोकावते
तेव्हा ती नसतेच तिथे कुठे
मेनॉपॉजच्या दिवसात
कधी कधी बाई पुरुष होत जाते
– संगीता अरबुने
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.