मराठी साहित्यासाठी पावसाच्या कथा कविता नवीन नाहीत. ही सृष्टी सुंदर बनवणारा व वातावरण प्रसन्न करून सोडणारा रोमॅन्टिक पाऊस आपण अनेक ठिकाणी वाचला असेल. पण या कथेतला पाऊस काही वेगळाच आहे. सतत कोसळणारा हा पाऊस या कथेत खलनायक आहे. इतका की त्याची चीडही यायला लागते.
शिरीष देशमुख
मंगरूळ, पो. विडोळी, ता. मंठा, जि. जालना
मराठी साहित्यविश्वाला उमेश मोहिते या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठवाड्यातील एक प्रतिभासंपन्न ग्रामीण साहित्यिक म्हणून ते सुपरिचित आहेत. ‘ जागरण ‘, ‘ वळख ‘, व ‘ निवद ‘ हे तीन कथासंग्रह आणि ‘ वळण ‘ आणि ‘ बांधणूक ‘ या दोन कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी वाङ्मयविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. विविध नियतकालिके व दिवाळी अंकांमधून सातत्याने लेखन करत त्यांनी स्वतःचा एक वेगळा वाचकवर्ग निर्माण केला आहे. यावेळी उमेश मोहिते आपल्या वाचकांसाठी एक अस्सल ग्रामीण दीर्घकथासंग्रह घेऊन आले आहेत. पुस्तकाचे नाव आहे ‘ भाकरी आणि कर्म ‘.
या पुस्तकात आपणास एकूण पाच दीर्घकथा वाचायला मिळतात. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने जरी आपण या कथांना दीर्घ मानत असलो तरी वाचायला लागल्यानंतर ‘ दीर्घकाळ मनात रूतून बसणाऱ्या कथा ‘ या अर्थाने मी यांना दीर्घकथा म्हणणे पसंत करीन. या संग्रहातील ‘ भाकरी ‘ ही पहिली कथा आहे. एक वेळची भाकरी मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांच्या सर्वपरिचित कथांपेक्षा ही कथा सर्वार्थाने वेगळी आहे. इथे भाकरी या शब्दाचा अर्थ ‘ शिदोरी ‘ असा आहे. सासरी असलेल्या मुलीला माहेरी आणायला जाताना बाप सोबत काही खाण्याचे पदार्थ घेऊन जातो. त्याला सामान्यपणे ‘शिदोरी’ असं म्हणतात. मराठवाड्याच्या लातूर, बीड पट्ट्यात अशा शिदोरीलाच ‘ भाकरी नेणे ‘ असं म्हणतात.
एकाच घरात सून म्हणून आलेल्या पण माहेरची आर्थिक स्थिती भिन्न भिन्न असलेल्या स्त्रियांना सासू सासऱ्यांकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या वागणूकीचं अत्यंत वास्तववादी चित्रण या कथेत वाचायला मिळतं. पारबती या सुनेचे मायबाप दरिद्री आहेत, ते मुलीसाठी – मुलीच्या सासरच्या मंडळींसाठी काहीही आणून देत नाहीत याचा सासू सासऱ्यांना राग आहे. त्याहीपेक्षा पारबतीच्या माहेरच्या मंडळींबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार ठासून भरलेला आहे. कारण काय तर त्या मंडळींची आर्थिक परिस्थिती ! तेवढ्यावरून सुनेला टोमणे देणं, तिचा छळ करणं हे सगळं नेहमीचंच झालेलं. पारबतीचा नवरा काही अंशी बायकोला साथ देतो खरा, पण त्याच्याही मनात विष कालवण्याचे प्रयत्न ही माणसं सातत्याने करत असतात. असंच विष कालवण्याची नामी संधी त्यांना मिळते, पारबतीला बाळंतपणासाठी माहेरी नेण्याच्या निमित्ताने. परिस्थितीने पिडलेल्या पारबतीच्या बापाकडे पोरीला माहेरी नेण्यासाठी गाडीभाड्याचे पैसे देखील नसतात. मग तो ‘भाकरी’ काय घेऊन जाईल ? तो त्याच्या विवंचनेत आणि इकडे पारबतीचा नवरा ‘ सासऱ्याला आपली किंमतच नाही ‘ या गैरसमजूतीत अडकलेला. केवळ संवाद न होऊ शकल्यामुळे नातं तुटण्याची वेळ येऊन ठेपते.
लेखकाने विसंवादातून निर्माण होणाऱ्या दुराव्याची फार प्रत्ययकारी मांडणी या कथेत केली आहे. शेवटी जावयाला सगळी परिस्थिती जेव्हा कळते त्यावेळी तो जो समंजसपणा दाखवतो, ते या कथेचं बलस्थान आहे, असं मला वाटतं. नाती ताणल्या जातच असतात, पण ती तुटली जाऊ नयेत, यासाठी कुणीतरी समजूतदारपणा दाखवण्याची गरज असते.’ जावयाच्या जातीचं ‘ आजवर साहित्य सिनेमांत झालेलं सगळं नकारात्मक चित्र पुसून काढण्याचं काम ही कथा करते !
‘ घात ‘ ही या संग्रहातील दुसरी कथा असून आजच्या तथाकथित शिक्षणसम्राटांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचा कसा बाजार मांडला आहे, याबद्दल ही कथा भाष्य करते. गुणवत्ता असूनही केवळ वशिलेबाजीमुळे एका हुशार होतकरू मुलीचा होणारा विश्वासघात वाचकांसमोर समाजाचं उघडं – नागडं रूप उजागर करून जातो. विश्वासाने ज्यांच्या खांद्यावर मान ठेवावी तीच माणसं केसाने गळा कापतात हे वास्तवही ही कथा अधोरेखित करून जाते.
एखादी कथा त्यातल्या व्यक्तीचित्रणांमुळे लक्षात राहते, तर एखादी कथा त्या कथेतल्या प्रसंगचित्रणामुळे ! या संग्रहातील ‘ पाऊस ‘ या तिसऱ्या कथेत लेखकाने प्रचंड ताकदीने पाऊस रेखाटलाय. मराठी साहित्यासाठी पावसाच्या कथा कविता नवीन नाहीत. ही सृष्टी सुंदर बनवणारा व वातावरण प्रसन्न करून सोडणारा रोमॅन्टिक पाऊस आपण अनेक ठिकाणी वाचला असेल. पण या कथेतला पाऊस काही वेगळाच आहे. सतत कोसळणारा हा पाऊस या कथेत खलनायक आहे. इतका की त्याची चीडही यायला लागते. कथानायिका सुमित्राच्या बरोबरीने वाचकही पावसाला मनोमन शिव्या घालायला लागतात, इतका तो अंगावर येणारा पाऊस आहे. नशीबातल्या अठराविश्व दारिद्र्याशी मनगटाच्या बळावर दोन हात करणारी सुमित्रा आहे. तिच्या पदरात तीन लेकरं टाकून तिचा नवरा परलोकाला निघून गेलाय.त्या लेकरांना जगवण्यासाठी सुमित्रा मोलमजुरी करते आहे. रोज कमवायचं आणि रोज खायचं. हातावर पोट असलेल्या सुमित्राचं काम पावसानं बंद पाडलंय. तो सतत कोसळतोय. घरात अन्नाचा कण नाही. लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी भरपावसात सुमित्रा धडपडत राहते. जिथे जमेल तिथे हात पसरते. आबरूच्या बदल्यात पोटाची व्यवस्था करणारी माणसंही तिला भेटतात, पण ती त्यांना लाथाडते. पोटात आग पेटलेली असतानाही सन्मान गहाण न टाकणारी ती एक मानी बाई आहे! ती झगडत राहते.माणसांशी झगडते. निसर्गाशी झगडते. ही केवळ सुमित्रा या एकाच अशिक्षित दरिद्री स्त्रीची कथा आहे असं नाही. संकटांचे डोंगर अंगावर कोसळत असताना, पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असतानाही धीरोदात्तपणे उभं राहून आयुष्याशी चार हात करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही कथा आहे. सगळं आभाळ कोसळलेलं असतानाही आयुष्याच्या रणांगणात जगण्यासाठी जिद्दीने उभ्या राहणाऱ्या प्रत्येक वीरांगनेची ही कथा आहे.
‘ स्थापना ‘ ही या संग्रहातील एक वेगळ्या वळणाची कथा. राजकारणाचं सार्वत्रिकीकरण होण्याचा आजचा काळ. गल्लीबोळातल्या बारीक सारीक घटनांमध्येही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसाद उमटताना दिसतात आजकाल. हेच राजकारण एका छोट्याश्या गावातल्या गणेशोत्सवातही घुसतं आणि त्यातून कार्यकर्त्यांची होणारी दुरावस्था याचं भेदक चित्रण या कथेत वाचायला मिळतं. खरे तर बहुतांश कथा या चांगुलपणाला नायक ठरवून रेखाटलेल्या असतात. पण या कथेतल्या नायकामध्ये चांगुलपणा नाही. व्हिलनच्या बाजूने या कथेचं निवेदन केलंय. पण लेखक त्याची बाजू घेत नाही. उलट आजच्या राजकारणामुळे एखाद्या सुस्थापित माणसाचीही कशी धूळधाण होऊ शकते यावरच ही कथा परिणामकारक भाष्य ही कथा करते.
‘कर्म’ ही या संग्रहातील शेवटची कथा. सटवा या आपल्याच कर्मानं वाया गेलेल्या एका दारूड्याची ही कथा असून दारू मिळवण्यासाठी सतत धडपडणारा, दारूपाई सगळा संसार उघड्यावर आणणारा सटवा आणि तरीही त्याला सांभाळून घेत राहणारी त्याची बायको गया यांच्यातल्या नात्याची ही सुंदर गोष्ट ! खरंतर असा व्यसनाधीन जोडीदार कुणासाठीही तापदायकच. पण तरीही तो सात जन्माचा सोबती आहे, असं मानून त्याला पुजणाऱ्या कित्येक गया आपल्याला अवतीभवती बघायला मिळतात. आपला नवरा सुधारावा, त्याने दारू सोडावी यासाठी त्या सतत धडपडत असतात. पण म्हणतात ना सुरूवातीला माणूस दारूला पितो आणि नंतर मात्र दारूच अख्ख्या माणसाला गिळून टाकते. इथेही सटवाचा अख्खा संसार गिळंकृत करणाऱ्या बाटलीने गयाच्या मांडलेल्या छळाची ही कहाणी. या कथेत येणारं सटवाच्या घराचं, गल्लीचं, गावाचं वर्णन वाचताना आपण स्वतः त्याच्यासोबत फिरतोय असं सतत वाटत राहतं. सटवा कितीही वाईट असला तरी आपल्या नवऱ्याचं काहीही बरं – वाईट होऊ नये यासाठी धडपडणारी गया, ही या देशातल्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे.
तर असा हा एकूण पाच दीर्घकथा असलेला ‘ भाकरी आणि कर्म ‘ ! हा दीर्घकथा संग्रह आहे. डोळ्यांसमोर हुबेहुब प्रसंग उभा राहिल इतकं प्रभावी शब्दचित्र रेखाटन, खास मराठवाडी बोलतील अस्सल ग्रामीण शब्दांचा चपखल वापर, समाजातील दारिद्र्याचं, माणसांच्या स्वभावाचं अतिसूक्ष्म निरीक्षण आणि अनुभवांना मूर्तरूप देणारी समर्थ, किमयागार लेखणी ही उमेश मोहितेंच्या लिखाणाची वैशिष्ट्ये म्हटली पाहिजेत. या संग्रहात वाचायला मिळणारे कित्येक शब्द हे लूप्त होऊ पाहणाऱ्या अस्सल मराठवाडी बोलीला पुनरुज्जीवन देणारे आहेत.’
शिणकरी ‘, ‘ बोंदा, ‘ नाटी ‘, ‘ सनिताप ‘, ‘ खणपट ‘, हाळजून, ‘ खिनभर ‘, ‘ कूड ‘, ‘ गुडघेमिठी ‘, ‘ चितागती ‘, ‘ कोरड्यास,’ हारबड ‘ असे एक ना अनेक अस्सल ग्रामीण शब्द आपल्याला पानापानांवर भेटत राहतात. कितीतरी शब्दांचे तर अर्थही ठाऊक नसतात. वाक्याच्या संदर्भाने त्या शब्दांचा अर्थ लावावा लागतो. त्यामुळेच असंही वाटतं की अशा शब्दांचा अर्थ उलगडणारे एक परिशिष्ट पुस्तकाच्या शेवटी जोडायला हवे होते. अर्थात ते नसल्यामुळे कथा वाचताना रसभंग होतो, असेही काही नाही. कथा वाचायला लागल्यानंतर कथेतील वातावरणाशी वाचकाची नाळ घट्ट जुळते, हे उमेश मोहितेंच्या लेखनाचं खूप मोठं यश आहे !
भाकरी घेऊन जाणारा दरिद्री बाप दर्शविणारं मुखपृष्ठ पुरेसं बोलकं झालं आहे. एकूणच ‘ भाकरी आणि कर्म ‘ हा एक दर्जेदार आणि वाचनीय कथासंग्रह झाला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण कथासाहित्यात उमेश मोहिते यांचं नाव ठळकपणे अधोरेखित करणारा हा संग्रह एकवेळ नक्कीच वाचलाच पाहिजे !
पुस्तकाचे नाव – ( कथासंग्रह ) – भाकरी आणि कर्म
लेखक – उमेश मोहिते
प्रकाशक – तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर. ( मो. ८२७५६३८३९६ )
पृष्ठे – १४४
मूल्य – २०० रू
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.