June 19, 2024
Spiritual Love article by Rajendra Ghorpade on Dnyneshwari
Home » संत माहेर माझें…
विश्वाचे आर्त

संत माहेर माझें…

प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजें जी ।। 597 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहोत. (म्हणून) तुम्ही भेटल्यावर मी लडिवाळपणा करतो. महाराज, जो लडिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय, असे आपण समजावे.

माहेर म्हणजे आई – वडिलांचे घर. महिलांना माहेरची अधिक ओढ असते. सासरी कितीही प्रेम मिळाले, कितीही संपन्नता असली तरी माहेरच अधिक प्रिय असते. काही झाले तरी लगेच माझ्या माहेरी, असे नाही. माझे माहेर तसे होते अशी उदाहरणे, टोमणेबाजी सुरू होते. माहेरविषयी कोणी वाईट बोललेले त्यांना सहन होत नाही. माहेरचे कौतुक त्यांच्या तोंडी नेहमीच असते. माहेरसारखे प्रेम या जगात कोठेच नाही, असे त्यांना वाटते. असे प्रेम सासरी असले तरी माहेरची बरोबरी होत नाही, असे त्यांना वाटते.

माहेरमध्ये सर्व हक्काचे असते. आपलाच अधिकार असतो. सासरी आल्यावर तसा अधिकार मिळत नाही. काही स्त्रिया आपला अधिकार राहावा, वचक राहावा यासाठी माहेरकडचाच एखादा गडीमाणूस खास कामासाठी नेतात. सासरचा गडीमाणूस त्यांना फारसा आवडत नाही. माहेरकडची सर्व माणसे त्यांना प्रेमळ वाटतात. हवीहवीशी वाटतात. बदलत्या काळात आता असे माहेरचे प्रेमही बदलत चालले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या संस्कृतीत माहेरविषयीच प्रेम राहिले नसेल तर सासरविषयी प्रेमाची कशी स्थिती असेल, हा मोठा प्रश्‍न आहे.

प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. खरे प्रेम लुप्त होत चालले आहे. काळाच्या ओघात माणसामधील स्वार्थी वृत्ती वाढल्याने हा फरक पडला आहे, पण समाधानासाठी माहेरसारखे सुख कोठेच नाही.

खरे प्रेम हे माहेरीच असते. तेच खरे प्रेम आहे. तीच खरी प्रेमाची ओढ आहे. तीच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. तेथेच खरे प्रेम मिळते. तसे संतांचे घर म्हणजे आपले माहेर घर आहे. तिथे प्रेम अधिक मिळते. तिथे आपले लाड केले जातात. म्हणून संतांचा सहवास असावा. संतांच्या संगतीत प्रेमामुळे मनातील राग, द्वेष, मत्सर नाहीसे होतात. माहेरच्या घरात जसे हक्काचे प्रेम असते तसे संतांच्या घरात हक्काचे प्रेम मिळते.

प्रेमाने हे लिखाण संत माझ्याकडून करवून घेत आहेत ही अनुभुती आहे. जे शब्द उमटतात ते त्यांनीच दिलेले आहेत. सद्गुरुंच्या अनुभुतीतून हे प्रेमाने लिखाण माझ्याकडून करवून घेतले जात आहे. जे विचार सुचतात ते त्यांनीच मनात उत्पन्न केले आहेत. यामुळेच हा ग्रंथ, हे लिखाण हे एक प्रेमाची भेट आहे. हक्काचे व्यासपीठ सद्गुरुंनी मला मिळवून दिले आहे. शब्दांची अनुभुती निश्चितच आत्मज्ञानप्राप्तीकडे नेईल. शब्दांच्या स्वरातूनच ब्रह्मसंपन्नता येईल हा विश्वास आता दृढ होतो आहे. सोन्याची अक्षरे लुटून आता आत्मज्ञानाचे लाभार्थी होऊ हाच संकल्प या निमित्ताने. हक्काच्या माहेर प्रेमाने आता विश्वास दृढ होऊ पाहात आहे.

Related posts

तूर, उडदाची आयात ‘मुक्त श्रेणी’ वाढवली, तर मसुरीवरील आयात शुल्क शून्यावर

दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी

ती सध्या काय करते ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406