May 30, 2024
Discovery of thousands of years old Ashni crater at Chokul
Home » चौकुळ येथे हजारो वर्षापूर्वीच्या अशनी विवराचा शोध: डाॕ.अतुल जेठे
संशोधन आणि तंत्रज्ञान

चौकुळ येथे हजारो वर्षापूर्वीच्या अशनी विवराचा शोध: डाॕ.अतुल जेठे

सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व भारतीय भूवैज्ञानिक व पर्यटकांना उत्साह देणारे संशोधन झाले असुन आंबोलीपासुन अवघ्या दहा कि. मी.अंतरावर असलेल्या चौकुळ या गावाला आता ‘जागतिक भूवैज्ञानिक स्थळ’ म्हणून ओळखले जाणार असल्याचा दावा डॉ. अतुल जेठे यांनी केला आहे.

येथील खमदादेव पठारावर शिरूर (पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॕ. अतुल जेठे व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी या परिसरातला भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर (- +) हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर त्यांच्या नजरेला पडले.

या संदर्भात डाॕ. अतुल जेठे यांनी दिलेली माहिती अशी –

चौकुळ येथे असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५००मीटर अंतरावर पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वी आकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त म्हणजे ७२० से. मी. पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व -पश्चिम व्यास सुमारे १८० मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे. या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी डाॕ. जेठे पावसाळ्यात पुन्हा भेट देणार आहेत. या स्थळाला शासनाने ‘अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संक्षित करावे, अशी मागणी डाॕ. जेठे यांनी केली आहे.

भौगोलिक स्थान-

या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर्व रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी’ देवाची न्हय’ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते.

भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील,(Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डाॕ.अतुल जेठे यांनी वर्तवली. असुन याला शास्त्रीय परिभाषेत ‘सिम्पल बाऊल क्रेटर’ म्हणजेच ‘साधे वर्तृळाकृती विवर’असे म्हणतात.

आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी.

‘रजतकृष्ण’विवर असे नामकरण

या विवरावर दोन दिवस संशोधन केल्यावर आपल्या या शोधून काढलेल्या विवराला ‘ RajatKrishna Crater म्हणजेत ‘रजतकृष्ण विवर असे नाव डॉ. जेठे यांनी दिले आहे. २००९ पासुन भारतातील विविध विवरांचा भूशास्रीय अभ्यास करताना मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या इस्रो (IIRS) डेहराडून (उत्तरा खंड)या जागतिक पातळीवर संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भूशास्र विभागाचे प्रमुख रजत चटर्जी यांचे शुभनाव व आपले सहकारी मित्र मराठी विभागात अध्यापन करणारे मालवणी बोली साहित्य व संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक मार्गदर्शक डाॕ. बाळकृष्ण लळीत यांच्या नावातील ‘कृष्ण’ यावरून चौकुळ येथील विवराचे ‘ रजतकृष्ण विवर’असे नामकरण या दोन्हींच्या (गुरू आणि मित्र) यांच्या सन्मानार्थ केल्याचे डाॕ. अतुल जेठे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी २०११साली शोधलेल्या लोणार जवळील विवराला ‘गगन विवर’असे नामकरण केले होते.

या संशोधना दरम्यान चौकुळ येथील समाजसेविका सुषमाताई गावडे, अनिल गावडे, प्रताप गावडे, सरपंच गुलाबराव गावडे तसेच सरपंच सुरेश शेटवे. डाॕ. सुश्रुत लळीत तसेत अन्य चौकुळ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

या शोधकार्याचे चां ता. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. के. सी. मोहिते व संस्था सचिव नंदकुमार निकम यांनी डाॕ.अतुल जेठे यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

गुलाबाचं फुल दे…

आदित्याच्या झाडाप्रमाणे मन सामर्थ्यवान हवे

आत्मज्ञान प्राप्तीसाठी हवे आत्मरूपी गुरूंचे स्मरण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406