रस्त्यावर जागोजागी आपल्याला ‘स्पीड ब्रेकर’ दिसतात. हे स्पीड ब्रेकर आपल्याला नकळत सांगत असतात कि, ‘ अरे माणसा, थोडा वेग कमी कर, ब्रेक घे’. ब्रेक म्हणजे विश्रांती. हि विश्रांती घ्यायची आणि पुन्हा नव्या जोमाने जीवनाचा रथ ओढायला सज्ज राहायचं. इसलिये, ब्रेक तो बनता है…!
पल्लवी काटेकर, कोल्हापूर.
९८८१२२७९८९
गाडी शिकताना पहिल्यांदा ओळख होते ती अर्थात ब्रेकची. गाडी चालवताना तोच महत्वाचा असतो. कधी, कुठे, किती प्रमाणात ब्रेक धरून ठेवायचा हेच आपण शिकतो. हे झालं गाडीचं. पण, आपल्या आयुष्यातही हा ब्रेक तितकाच महत्वाचा आहे किंबहुना तो आयुष्य समृद्ध करण्यासाठी आवश्यकच आहे, असं मला वाटतं. आपण सगळेच भौतिक सुखाचे पाईक. आपल्या जीवनाची गाडी सुसाट धावतच असते.
शिक्षण, नोकरी, संसार, मुलाबाळांना वाढवताना आपली दमछाक होतेच. पण मग या जीवनाच्या गाडीचा वेग कमी करण्यासाठी काहीकाळ ‘ब्रेक’ हवा असतो. मग तात्पुरता हा ब्रेक कधी पर्यटन, पिकनिक यासारख्या असंख्य रुपात आपण घेतो. स्त्रीच्या आयुष्यात तर ती आई झाल्यावर मोठा ब्रेक येतो. पण तो तीनं आनंदानं स्वीकारलेला असतो.
अनेक मराठी – हिंदी सिने तारकांनी ऐन बहरत आलेल्या त्यांच्या कारकिर्दीला आई झाल्यावार ब्रेक दिला आणि पुन्हा तितक्याच जोमाने त्या पुन्हा कामामध्ये गुंतत आहेत. हल्ली तर या ब्रेकचे अनेक प्रकार निघालेत बरं का ! इंटरनेट ब्रेक, स्पिरिच्युअल ब्रेक, रिलेशनशिप ब्रेक, मेडीटेशन ब्रेक इत्यादी.हल्ली तर ‘स्पिरिच्युअल ब्रेक’ नावाची एक झुळूक वाहते आहे. (झुळूक यासाठी कि ती काहीकाळासाठीच सुखावते) पण पुन्हा कोणत्याही मंदिरात किंवा साधूंच्या चरणी बसायचं, फोटो काढायाचे आणि मग ते सोशल साईटवर टाकायचे आणि खाली टॅगलाईन ‘स्पिरिच्युअल ब्रेक’.
मुळात अध्यात्म हि गोष्ट ब्रेक घेण्यासाठी आहे का ? अध्यात्म हा मनुष्य जन्माचा पायाच आहे आणि माणसाचा जन्मच मुळात मनुष्य योनीत परमेश्वर प्राप्तीसाठी झाला आहे. अध्यात्माला आपण ब्रेक समजतो. म्हणजे हा ब्रेक तात्पुरता घ्यायचा आणि नंतर हवं तसं वागायचं. वाह रे दुनिया ! कोणत्याही कार्यक्रमातला दहा- पंधरा मिनिटांचा ब्रेक असतोच ना ! ते मध्यंतर. काहीवेळा आपल्या स्वत: साठी ब्रेक घेणंही महत्वाचं असतं. अंतर्मनात डोकवून पाहता येतं.आपण कोण आहोत, आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे समजतं आणि आपल्या चुकांची प्रकर्षाने जाणीव होते. स्वत:मध्ये वृत्यंतर घडून येतं.
गाडी वेगाने चालवताना काहीवेळा आपलं लक्षच नसतं. मध्येच खड्ड्डा आल्यावर किंवा कोणीतरी पुढे अचानक आल्यावर आपण कचकन ब्रेक दाबतो ; आणि मग कधीतरी पडतो. आधीच समोर बघून गाडी चालवली असती तर ब्रेक कधी दाबायचा हे तरी कळले असते आणि अनर्थ टळला असता, असं वाटतं. म्हणून तर रस्त्यावर जागोजागी आपल्याला ‘स्पीड ब्रेकर’ दिसतात. हे स्पीड ब्रेकर आपल्याला नकळत सांगत असतात कि, ‘ अरे माणसा, थोडा वेग कमी कर, ब्रेक घे’. ब्रेक म्हणजे विश्रांती. हि विश्रांती घ्यायची आणि पुन्हा नव्या जोमाने जीवनाचा रथ ओढायला सज्ज राहायचं. इसलिये, ब्रेक तो बनता है…!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.