July 27, 2024
salary-economists-dedicating-loyalty-to-salary-article-by-gangadhar-mute-arvikar
Home » पगारावर निष्ठा समर्पित करणारे पगारी अर्थशास्त्री
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पगारावर निष्ठा समर्पित करणारे पगारी अर्थशास्त्री


आतातरी राजकीय आणि शासकीय यंत्रणेने जबाबदारीने, कार्यकुशलतेने आणि तत्परतेने आधुनिक अर्थशास्त्राच्या पायावर बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रामाणिकपणे सहकार्य केले, आपला नेहमीचा अडवा-अडवीचा खाक्या सोडून शेतकऱ्यांना उत्तेजन देऊन खंबीरपणे पाऊल टाकण्यास प्रोत्साहित केले तर उत्पादन क्षेत्रात पारंगत असलेला भारतीय शेतकरी प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रातही नक्कीच चमत्कार करून दाखवू शकतो, याची मला खात्री आहे.

गंगाधर मुटे आर्वीकर

फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या संकल्पनेचे जनकत्व युगात्मा शरद जोशींकडे जाते परंतु भारतीय जनमानस इतकं कृतघ्न आहे की ज्याचे श्रेय त्याला द्यायला भारतीय माणसांच्या प्रचंड जिवावर येते. शेतकऱ्यांनी आता एकत्र येऊन सामूहिक तत्त्वावर कंपनी लिमिटेड तयार करून सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती केली पाहिजे अशी हाक १९९२ मध्ये दिली होती. नुसतीच दिली नव्हती तर त्यासाठी लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीचे अधिवेशन घेऊन पूर्ण भूमिका समजावून सांगितली होती. त्याचे व्हिडिओ, मुद्रित लेखन आणि जिते-जागते हजारो शेतकरी साक्षीदार आजही जिवंत आहेत. ज्या वेळेस शरद जोशी शेतकरी कंपनी लिमिटेडची कल्पना मांडून आता यापुढे भविष्यात शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्याचे सांगत होते तेव्हा शासन आणि प्रशासन चक्क मख्ख होते. नुसतेच मख्ख नव्हते तर मुके आणि बहिरेही होते त्यामुळे शरद जोशींचे विचार शासन आणि प्रशासनाला ऐकायलाच गेले नाहीत.

पगारी अर्थतज्ज्ञांचे एक बरे असते. त्यांनी विद्वत्तेचा कितीही आव आणला आणि हुशारीची फुशारकी मिरवली तरी त्यांचा मेंदू मात्र पगारापोटी राजकीय व्यवस्थेकडे गहाण गेलेला असतोच असतो. त्यामुळे सरकारला जसजशी हवी असेल तसतशी पगारी अर्थतज्ज्ञांची विचारधारा बदलत जाते. पगारावर आणि अन्य वरकड कमाईवर गंडांतर येऊ नये म्हणून राजसत्तेच्या पायावर कायमच लोळत राहून राजाश्रय मिळवत राहणे हेच त्यांचे जीवितकार्य झालेले असते. स्वतःचा खिसा भरण्यासाठी ‘अर्थ’प्राप्ती होईल असे ‘शास्त्र’ निर्माण करण्यात जे ‘तज्ज्ञ’ असतात त्यांना ‘अर्थशास्त्री’ अथवा ‘अर्थतज्ज्ञ’ म्हणावे अशीच एकंदरीत परिस्थिती आहे. या पगारी अर्थतज्ज्ञांची त्यांच्या पगारावर एवढी जबरदस्त निष्ठा असते की त्यांची अर्थशास्त्रीय विचारधारा म्हणजे शासकीय धोरणांची इच्छापूर्ती असते आणि सरकारला उद्देशून ”तुम अगर दिन को रात कहे, तो हम रात कहेंगे” हे गीत गाण्याची अर्थतज्ज्ञांत चढाओढ लागलेली असते.

पण काळ कुणालाच माफ करत नाही. १९९२ मध्ये जरी शासनाने शरद जोशींचे विचार स्वीकारले नाही तरी नाईलाजाने का होईना (खरेतर इथे नाईलाज ऐवजी वऱ्हाडी भाषेतील ‘झक मारून’ हा शब्द अधिक चपखल बसेल) तेच विचार वीस वर्षानंतर स्वीकारावेच लागले आणि मग त्याच अपरिहार्य नाइलाजातून शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड अशा स्वतंत्र कंपनीची प्रक्रिया सुरू करावीच लागली. जर शरद जोशींची संकल्पना १९९२ मध्ये स्वीकारली गेली असती तर या कामाचा प्रारंभ २०१३ ऐवजी १९९३ मध्येच होऊ शकला असता. वीस वर्षे आधीच शेतमाल प्रक्रियेला चालना मिळू शकली असती. जेव्हा मुक्त बाजारपेठेची संकल्पना जागतिक स्तरावरच बाल्यावस्थेत होती आणि सर्व जग धूसरशा भविष्यातून मार्ग काढण्यासाठी चाचपडत होते तेव्हा जर भारतीय शेतकऱ्यांना पंख फडफडायला संधी मिळाली असती तर कदाचित आज भारत देश कृषिमाल निर्यातीमध्ये जगाच्या पाठीवर अव्वल ठरू शकला असता.

शरद जोशींपासून प्रेरणा घेऊन आमचे सहकारी मित्र विलास शिंदे यांनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. स्थापन करून दैदिप्यमान यश मिळवून दाखवले आहे. एक शेतकरीपुत्र योग्य वेळी योग्य संधी मिळाल्यास प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रात शेतीच्या बांधावरून भरारी घेत उत्तुंग उंची गाठत यशस्वितेची कशी पताका रोवू शकतो याचा उत्कृष्ट वस्तूपाठ त्यांनी शेतकरी, शासन आणि प्रशासन यांच्यासमोर सादर केला आहे. योग्य वेळी आणि योग्य कालखंडात निर्यातीला संधी मिळून जर शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे आले असते तर आतापावेतो नैसर्गिकरित्या गावागावात शेतीमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी फुलली असती. पण जेव्हा शासकीय आणि राजकीय यंत्रणेला उशिरा जाग येऊन शेतकरी उत्पादक कंपनीचे महत्त्व कळले तोपर्यंत जग भारताला ओलांडून बरेच पुढे निघून गेले होते. आता जागतिक शेतकरी बराच पुढे गेला असताना स्पर्धात्मक बाजारपेठेत पाय रोवून जम बसवणे भारतीय शेतकऱ्यांसाठी तितकेसे सोपे राहिलेले नाही. वरातीमागून घोडे नाचवणे म्हणतात ते यालाच. कालौघाच्या परिस्थितीनुसार जी संधी उपलब्ध होते ती संधी हेरून संधीचे सोने करण्याचे शास्त्र ज्याला कळते तोच खराखुरा अर्थशास्त्री आणि व्यापारशास्त्री असतो.

तरीही हरकत नाही. ”देर आए दुरुस्त आए” हेही कमी नाही. शेतकऱ्याला वेठबिगारासारखे कायमच कामात गुंतवून ठेवण्यासाठी कट-कारस्थान आखल्यासारखे शासकीय कृषी धोरण राबवण्याऐवजी अस्सल व्यापारनितीचा मार्ग स्वीकारला तर शेतीच्या सक्षमीकरणाकरिता महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरू शकेल. आतातरी राजकीय आणि शासकीय यंत्रणेने जबाबदारीने, कार्यकुशलतेने आणि तत्परतेने आधुनिक अर्थशास्त्राच्या पायावर बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकरी उत्पादन कंपन्यांना प्रामाणिकपणे सहकार्य केले, आपला नेहमीचा अडवा-अडवीचा खाक्या सोडून शेतकऱ्यांना उत्तेजन देऊन खंबीरपणे पाऊल टाकण्यास प्रोत्साहित केले तर उत्पादन क्षेत्रात पारंगत असलेला भारतीय शेतकरी प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रातही नक्कीच चमत्कार करून दाखवू शकतो, याची मला खात्री आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जोतिबाच्या नावानं चांगभलं…

उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

1 comment

Anonymous March 31, 2022 at 7:10 AM

Good article….muteji

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading