October 14, 2024
Agnidivya A Woman Struggle Aashish Ningurkar story
Home » Privacy Policy » अग्निदिव्यः एका स्त्रीचा लढा
मुक्त संवाद

अग्निदिव्यः एका स्त्रीचा लढा

एका स्त्रीचा लढा मर्यादित न राहता ‘अग्नितांडव’ मधून तो ‘अग्निदिव्य’ बनत गेला. म्हणूनच हा जीवनप्रवास केवळ त्या महिलेपुरता मर्यादित न राहता त्याला अनेक छटा आहेत. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ‘अग्निदिव्य’ हे पुस्तक रसिकवाचकांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे या पुस्तकातून सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा मिळेल हा विश्वास वाटतो.

आशिष निनगुरकर

एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा आहे. जीवनातील गोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केलं. त्याच्या पायावर उभं केलं. एका आईचं कर्तव्य मनापासून पार पाडलं. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. एका स्त्रीचा स्वतःच्या आस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक ‘अग्निदिव्य’.या पुस्तकाचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.

दोन वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात डाक कार्यालयात काम करतांना भेटलेला मित्र अभिषेक कांबळे. त्याचा जीवनप्रवास ऐकल्यावर मला राहवले नाही. अभिषेकच्या मनात त्याच्या भूतकाळाविषयी अनेक प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न मी चालू केला. मग त्यातून ‘अग्निदिव्य’ हे पुस्तक जन्माला आले.

मी गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीशी संबंधित अनेक क्षेत्रात कामे करत आहे. आतापर्यंत काही चित्रपटात व अनेक मालिकांमध्ये माझ्या छोट्याश्या भूमिका केल्या आहेत. त्याबरोबरच मालिकालेखन,चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात देखील मुशाफिरी करत आहे. तसेच मी लिहिलेल्या लघुपट व चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले असून विविध चित्रपट महोत्सवात त्याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे मला अभिषेकच्या जीवनात जे काही झाले आहे, त्याबद्दल सविस्तर लिहावे असे वाटले. कारण अभिषेकला पडलेले प्रश्न केवळ वरवरचे नव्हते,त्याला एक खोल संदर्भ होता आणि ते प्रश्न सोडवावेत असे मला वाटले.अभिषेक हा मनातून कधी शांत होईल तर तो केवळ या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर…म्हणून मग मी या प्रश्नांच्या मागे लागलो आणि एकेक उत्तरे शोधायला मार्गस्थ झालो.एक लेखक म्हणून मला समृद्ध करण्यासाठी हा प्रवास वेगळाच होता. मी याअगोदर ‘हरवलेल्या नात्यांचं गावं’, ‘न भेटलेली तू’,’कुलूपबंद’ आदी कवितासंग्रह तसेच ‘स्ट्रगलर’ व ‘चित्रकर्मी’ आदी सिनेमाविषयक पुस्तके आणि ‘उजेडाच्या वाटा’ हा सकारात्मक विचारांचा लेखसंग्रह आदी लेखन केले आहे.चरित्रलेखन हा प्रकार मी पहिल्यांदा हाताळला आहे.चपराक प्रकाशन चे प्रकाशक-संपादक घनश्याम पाटील यांनी मला या लेखनासाठी प्रवृत्त केले व त्यांच्या इतक्या मोठ्या प्रकाशनाद्वारे हे पुस्तक निर्मिती करण्याचे ठरवले. त्यांनी माझ्यावर एक लेखक म्हणून टाकलेला विश्वास मोठा होता. त्यामुळे माझे सातवे पुस्तक ‘चपराक’ प्रकाशनाद्वारे येत असल्याचा आनंद मोठा आहे.

एका महिलेचा संघर्ष, माहेर-सासर जबाबदारी त्यातून वाढलेल्या अनेक गोष्टी या सर्व परिस्थितीतून एका स्त्रीला कशाप्रकारे सर्व गोष्टींमधून जावे लागते. सासर व माहेरची दोन्ही नाती कशी सांभाळावी लागतात.हे सर्व या पुस्तकातून बारकाईने मांडण्यात आले आहे. एक स्त्री आपल्यावर आलेल्या सर्व संकटावर कशी मात करते. वेळप्रसंगी पळ न काढता प्रत्येक गोष्टीला कशी सामोरी जाते. तोंड देते, कुणाच्या खोट्या आश्वासनांना बळी पडत नाही. प्रत्येकाच्या जीवनात अनेक चढउतार येत असतात. आयुष्य हे असेच चित्रविचित्र गुंतागुंतीचे बनलेले आहे. कुठलाही रस्ता सरळ नसतो आणि सहजसोप्या पद्धतीने काहीच मिळत नसते आणि सहजसोपे काही मिळाले तरी त्याची किंमत नसते. कोणतेही मोठे दुःख झाले तरी आत्महत्या करणे हा शेवट असता कामा नये. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, फक्त आपण ती शोधायला हवीत.

हे पुस्तक वाचून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि ती आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जगात जगायला बळ देईल.आज आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत अडकलो आहोत. काहीतरी आपल्याला कमी पडते म्हणून याचना करत आहोत. मुळात समाधान नावाची गोष्ट आपण विसरलो आहोत. जगण्यातील निखळ आनंद हरवून बसलो आहोत. हे पुस्तक वाचताना तुम्हाला एक कुटूंब,नाते,आचार-विचार, मैत्री, नात्यांची पारदर्शकता व एकूणच जगण्याची वस्तुस्थिती कळेल. पुस्तकाचे विषयाला धरून जबराट असे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे.

तर मंडळी ही कथा आहे स्त्रीची. तिचं आत्मकथनच म्हणा ना! मात्र सांगतोय मी. मी सांगितलेलं हे तिचं अल्पचरित्रच म्हणता येईल. या हृदयीचं त्या हृदयी पोहोचवण्याचं फक्त माझं काम एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा. लागोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केलं. त्याच्या पायावर उभं केलं. एका आईचं कर्तव्य पार पाडलं. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. अजूनही तिची वाटचाल संपलेली नाही. अजूनही तिची वाटचाल सुरूच आहे. सुख-शांती-आनंदाचे दिवस तिला उत्तरायुष्यात लाभावे, हीच सदिच्छा. मंडळी, लक्ष देऊन वाचा तिच्या कष्ट-त्याग समर्पणाचीच ही एक गाथा! गाथा अग्निदिव्याची… अग्निदिव्य…!!

आशिष निनगुरकर

या चरित्रपुस्तक लेखनाच्या निमित्ताने माझी एक लेखक म्हणून जीवन जगण्याची व विचार करण्याची प्रवृत्ती बदलली. ‘स्त्री’ कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपल्या जगात प्रत्यक्ष देव कुणी पाहिलेला नाही परंतु हा देव माणसात असतो.जो तो त्याने शोधावा व त्याच माणुसकीच्या देवाची पूजा करावी. कारण त्यातून मिळणार आनंद हा सर्वोत्तम पराकोटीचा आहे.

पुस्तकाचे नाव – अग्निदिव्य
लेखक – आशिष निनगुरकर मोबाईल – ९०८२४७१९१२
प्रकाशक – चपराक प्रकाशन
किंमत – १५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – ७०५७२९२०९२


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading