डॉ. खंडेराव शिंदे यांनी लिहिलेले रुकडी गावचा इतिहास हे पुस्तक म्हणजे खरोखरच रुकडी गावचे गॅझेटिअर आहे. १८० पानाच्या या पुस्तकात शिंदे यांनी चार प्रकरणे केली आहेत. यामध्ये रुकडी गावचा पूर्व इतिहास, रुकडी नावाची उत्पत्ती सांगितली असून काही ऐतिहासिक व्यक्ती आणि घटनांचा उल्लेख केला आहे.
सन ११७८ मध्ये रुकडीसह इतर ४६ गावातून कोल्हापूरच्या अंबाबाईला १५०० रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे. याशिवाय रुकडी – सेनापती घोरपडे संबंध, रुकडी आणि शाहू महाराजांचे दत्तक विधान, रुकडी कॅम्प आणि रुकडीतील खासदार माने घराणे यांचा त्यांनी उल्लेख केला आहे.
या पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणामध्ये शिंदे यांनी रुकडीतील समाज जीवन मांडले आहे. यामध्ये रुकडीतील शैक्षणिक विकास सविस्तर मांडला आहे. रुकडीचे आचार्यरत्न श्री बाहुबलीजी महाराज, संत ज्ञानेश्वरी परंपरेतील श्री मुनींद्र विश्वनाथ महाराज रुकडीकर, रुकडीतील अंबाबाई मंदिर, राजेबागस्वार दर्गा, विठ्ठल मंदिर, जैन बस्ती यांचाही उल्लेख केला आहे.
आचार्यरत्न श्री बाहुबलीजी महाराज हे मूळचे रुकडीचे. त्यांचे मूळ नाव संभवकुमार बळवंतराव चिंचवाडे. त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली त्यांचे ” आचार्यरत्न श्री बाहुबलीजी महाराज ” असे नामाविधान झाले. बाहुबलीजी महाराजांना आचार्य पदवीशिवाय ” शांतमूर्ती सद्धर्म प्रवर्तक चारित्र चुडामणी “, ” वात्सल्य रत्नाकर ” इत्यादी पदव्याने संबोधले गेले होते. श्री बाहुबलीजी महाराज ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी जीन मंदिर जिर्णोद्धार व जैन मंदिर निर्माण आणि पंचकल्याणक पूजा संपन्न केल्या. त्यांनी या निमित्ताने भारतातील १३५ ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. ते नियमितपणे दैनंदिनी लिहीत असत. याशिवाय त्यांनी ” क्षणभंगूर ” हे हिंदी भाषेत नाटक लिहिले असून ” प्रतिष्ठा तिलकम्, रयणसार, प्रायश्चित – समुच्चय, क्षत्र चुडामणी ” इत्यादी ग्रंथांचे हिंदी अनुवाद केले आहेत. तर अंतरंग या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे. श्री बाहुबलीजी महाराजांनी धर्मनगर ता. शिरोळ जीन मंदिर बांधले. सन १० मे २०१० रोजी त्यांना सहज समाधी प्राप्त झाली. महाराजांना ७८ वर्षाचे आयुष्य लाभले.
रुकडीमध्ये अष्टपद तीर्थ विकसित होत आहे. आचार्यरत्न श्री बाहुबलीजी महाराज यांचे जन्मगाव रुकडी. येथे एखादे जैन तीर्थ असावे अशी गणिनीप्रमुख मुक्तीलक्ष्मी माताजींची इच्छा. त्यांच्या संकल्पनेतून या तीर्थाची निर्मिती झाली आहे. श्री. शंकर कुंभार आणि श्री बाहुबलीजी महाराज यांची खास मैत्री. केवळ मैत्री खातर कुंभार गुरुजींनी एक एकर शेती जमीन दान म्हणून दिली आणि एक एकर शेती खरेदी करुन दिली. याच दोन एकर जागेमध्ये भगवान आदिनाथांची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
मुनींद्र श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर हे मूळचे पेठवडगाव येथील श्रीखंडे घराण्यातील. त्यांनी श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचा अनुग्रह घेतला. आणि ते १८७८ पासून रुकडीतील नारो कुलकर्णी यांच्याकडे वास्तव्यास होते. महाराजांचे जवळ जवळ चाळीस वर्षे वास्तव्य रुकडीमध्ये असल्याने त्यांना ” रुकडीकर महाराज ” म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी ०२ फेब्रुवारी १९१९ रोजी रुकडीजवळील पंचगंगा नदीकाठी समाधी घेतली आहे.
याशिवाय रुकडीतील थोर देशभक्त श्री. जिन्नाप्पा रायाप्पा खोत आणि देशभक्त श्री. अहमद शाबाजी मुल्ला यांचाही या ग्रंथात सविस्तर उल्लेख केला आहे.
प्रकरण तीनमध्ये त्यांनी रुकडीची आर्थिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे . रुकडीतील प्रयोगशील शेतकरी सचिन खोत, सतीश देसाई, शौकत पेंढारी आणि रुकडीचे प्रयोगशील शेतकरी शेती महर्षी म्हणून ओळखले जाणारे हिंदुराव अपराध या सर्वांचा त्यांनी उल्लेख केला आहे.
रुकडीचे खास वैशिष्ट्य म्हणून ओळखला जाणारा रुकडी येथील शेतकरी संघाचा दाणेदार मिश्र खत कारखाना. या खत कारखान्याने रुकडीची एक वेगळीच ओळख करुन दिले आहे. याशिवाय रुकडीतील चित्रकार, रुकडीकर चप्पल, रुकडी बॅग यांचेही संदर्भ या पुस्तकात दिले आहेत.
याशिवाय रुकडी गावच्या इतिहासातील चौथ्या प्रकरणात रुकडी आणि रुकडी पंचक्रोशीचा त्यांनी उल्लेख केला आहे. रुकडी गावामध्ये १९२७ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापन झाली. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात ग्रामपंचायतचा प्रयोग केला. त्यामध्ये रुकडी गावाचा ही उल्लेख आहे. याशिवाय रुकडी पंचक्रोशीमध्ये माणगाव, अतिग्रे, चोकाक ,मुडशिंगी, माले, हेरले या गावांच्या नावाची उत्पत्ती आणि थोडक्यात इतिहास मांडण्याचा प्रयत्न डॉ. शिंदे यांनी केला आहे.
त्यांच्या ” कोल्हापूर राज्याचा इतिहास १८३८ ते १८९४” या ग्रंथाचे आणि त्यांच्या ” पकाल्या” या आत्मकथनाचे वाचकांनी स्वागत केले आहेच. त्याच पद्धतीने ” रुकडी गावचा इतिहासा”चेही वाचक स्वागत करतील अशी अपेक्षा.
पुस्तकासाठी संपर्क – 9850117194
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.