पालवी फुटल्यावरच त्यावर आत्मज्ञानाचे झाड वाढते. या झाडाला मग फुले व फळे लागतील. या फळातून पुन्हा मग आत्मज्ञानाची बीजे तयार होणार आहेत. हे चक्र, ही गुरु-शिष्य परंपरा विचारात घ्यायला हवी. या चक्रातील पल्लवीचे महत्त्व समजून घ्यायला हवे. कारण साधनेची पालवी फुटेल तरच झाड वाढणार आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
पल्लवी फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ ।
तें निर्धारितां केवळ । बीजचितें ।। 100 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ – पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते. याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहीले तर ते झाड म्हणजे केवळं बीजं आहे.
पल्लवी या शब्दाचा अर्थ काय ? वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते. याचाच अर्थ ती नाविन्याची सुरूवात असते. पल्लवी म्हणजे नाविन्याची पालवी. या पालवीचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. कारण या पालवीतून वनस्पतीच्या अन्नाची निर्मिती होते. यातूनच झाडाची वाढ होत असते. झाडाला फुले, फळे यापासूनच उत्पन्न होतात. सर्वांना निरपेक्ष भावनेने सावली देणारा, विसावा देणारा मोठा वृक्ष तयार होतो तो एका बीजातूनच. पण तो पल्लवीच्या कृपेनेच. झाड म्हणजे बीजच आहे. बीजातून झाड आणि झाडापासून बीज हे निसर्ग चक्र नित्य आहे. पण यात पल्लवी म्हणजेच पालवीचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. पालवीवर रोग पडल्यास झाड वाळून जाऊ शकते.
शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या नावाने स्वराज्याचे बीज रोवले. या बीजातून जिजाऊंच्या रुपाने पालवी फुटली. यामुळेच स्वराज्याचा वटवृक्ष उभा राहीला. म्हणजेच जे बीज लावाल त्याचेच झाड तयार होते व पुन्हा त्याच झाडापासून त्याचीच बीजे तयार होतात. स्वराज्याच्या वटवृक्षाने कित्येकांना सावली दिली. आसरा दिला. यातूनच स्फुर्ती घेऊन पुढे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर निर्माण झाले. स्वराज्य बीजाच्या विचारातूनच स्वातंत्र्य मिळाले. स्वराज्यातूनच आता सुराज्य घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अध्यात्माचा विचार करता सद्गुरु सोहम साधनेचे बीज शिष्यामध्ये पेरतात. या गुरुमंत्राच्या बीजाला साधनेची पालवी फुटते. पालवी जितकी जोमात फुटेल तितक्या वेगाने झाडाची वाढ होते. तसेच साधना जितकी वाढेल तितकी अध्यात्मिक प्रगती होत राहाते. साधनेची पालवी फुटलीच नाही तर बीजाची वाढच होणार नाही. गुरुमंत्राचे ते बीज वाया जाईल. हे बीज वाया जाऊ नये यासाठी शिष्याने साधनेची पालवी कशी टिकवायची याचा विचार करायला हवा. साधनेच्या पालवीचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. साधनेची पालवी फुटल्यावरच त्यावर आत्मज्ञानाचे झाड वाढते. या झाडाला मग फुले व फळे लागतील. या फळातून पुन्हा मग आत्मज्ञानाची बीजे तयार होणार आहेत. हे चक्र विचारात घ्यायला हवे. या चक्रात पल्लवीचे महत्त्व समजून घ्यायला हवे. तरच आत्मज्ञानाच्या या वटवृक्षाचे संवर्धन होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.