मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ रणधीर शिंदे आणि प्रा. विलास वैद्य यांना पुरस्कार
औरंगाबाद : ‘मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार’ व्यासंगी समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर झाला आहे. ‘कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार’ ज्येष्ठ प्रा. विलास वैद्य यांना जाहीर करण्यात आला आहे,’ अशी माहिती ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी दिली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी (२६ फेब्रुवारी) कविता दिनानिमित्त दोन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नांदापूरकर सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम होईल. यंदाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार’ कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर झाला आहे. ते तरुण पिढीतील अग्रगण्य काव्यसमीक्षक आहेत. दि. पु. चित्रे, बा. सी. मर्ढेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, संतकविता या विषयांवर त्यांनी व्यासंगपूर्ण मांडणी केली आहे. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
हिंगोली येथील प्रसिद्ध कवी प्रा. विलास वैद्य यांना ‘कवयित्री लीला धनपलवार काव्यपुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांचे ‘गलफ’, ‘आलाप’, ‘माझ्या प्रयोगशील देशात’ आणि ‘लढा’ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. वाचक चळवळीत त्यांचे विशेष योगदान आहे. कवयित्री अनुराधा पाटील, डॉ. आसाराम लोमटे आणि श्रीधर नांदेडकर यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली. पुरस्कारांची घोषणा करताना डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, किरण सगर उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.