December 14, 2024
sugibharlya-shetatun-indrajeet-bhalerao-book
Home » लेकुरवाळ्या कृषिसंस्कृतीचे मार्दव ‘सुगीभरल्या शेतातून’
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लेकुरवाळ्या कृषिसंस्कृतीचे मार्दव ‘सुगीभरल्या शेतातून’

इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील, भिन्न लिंगी आवाज त्यांची कविता बेमालूमपणे टिपते.

तेजस चव्हाण,
7385588335 & Email : chavanteast@gmail.com

इंद्रजीत भालेराव हे मराठीतील प्रतिभावान कवी आहेत. व्यावसायिक जीवनात प्राध्यापक असणाऱ्या भालेरावांनी कवितेसह ललितलेखन व समीक्षा लेखन केले आहे. साहित्य क्षेत्रात कवी म्हणूनच ते सर्वज्ञात आहेत. शेती, निसर्ग आणि शेतकरी या तीन केंद्रादरम्यान त्यांची कविता फिरते. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याच्या जगण्याचे सारभूत तत्त्व त्यांच्या कवितेतून प्रगटते. गावखेड्यात राहणाऱ्या, शेती कसणाऱ्या किंवा शेतीशी निगडीत कामे करून जगणाऱ्या भूमिनिष्ठ लाेकांच्या आदिम शहाणपणाबद्दल त्यांची कविता सतत बाेलत असते. वाचकांशी सुसंवादाचा धागा जाेडत जगण्याविषयीचे कालातित सत्य सांगण्याचे सामर्थ्य भालेरावांच्या कवितेत असल्यामुळे त्यांची कविता वाचणाऱ्याला नेहमीच नवी आणि काहीतरी देणारी वाटते. भावसंवेदनेचा ओलावा जपत, अत्यंत निर्व्याज भाषेत गुजगाेष्टी करणाऱ्या त्यांच्या कवितेची कथनलय वाचकांना नेहमीच कवितेबराेबर घट्ट बिलगून ठेवते. परिणामी पाठ्यपुस्तकातील प्रश्नाेत्तरापल्याड, समीक्षेच्या पद्धतिशास्त्रीय काचापल्याड जाऊन त्यांची कविता सर्वसामान्य लाेकांच्या, अशिक्षितांच्या जिभेवर सहजगत्या रुळते. एक साक्षेपी आणि तितकेच लाेकप्रिय कवी म्हणून इंद्रजीत भालेरावांचे स्थान मराठी साहित्यव्यवहारात सर्वमान्य आहे. नुकतेच भालेरावांच्या कवितेची सांगाेपांग चर्चा करणारे ‘सुगीभरल्या शेतातून’ हे निवडक कवितांचे संपादन मराठी वाङ्मयात दाखल झाले आहे. मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक व समीक्षक डाॅ. रणधीर शिंदे यांनी या संग्रहाचे चाेखंदळ संपादन केले आहे. त्यानिमित्ताने या संग्रहाविषयी ही प्रासंगिक चर्चा.

इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील, भिन्न लिंगी आवाज त्यांची कविता बेमालूमपणे टिपते. शेतकऱ्याच्या अस्तित्वाला निव्वळ आजूबाजूच्या माणसांमुळेच असतेपण येत नाही; तर गाेठ्यातील जनावरं, शेतशिवार, पीकपाणी, बांधातालीचे दगडझाडी, ओढेविहिरी या सगळ्यांबराेबरच्या संबंधाने त्याचे जगणे भारित झालेले असते. या सगळ्यांबराेबरच्या शेतकऱ्याच्या व्यक्त-अव्यक्त स्तरांवरील संवादाची नेमकी नस भालेरावांची कविता तंताेतंत पकडते. कधी लाेकगीतांच्या लयीत, तर कधी अभंगाच्या रूपात ती आविष्कृत हाेते. प्राैढपणाचा कसलेही उसणे अवसान न आणता अत्यंत साध्या, सरळ देशी वाणाच्या लयीतील भालेरावांची कविता बहिणाबाई चाैधरींच्या कवितेशी नाते सांगते. कधी गहिवरून टाकणाऱ्या प्रश्नातून ती काळीज विरघळवते; तर कधी चिंतनाच्या खाेल डाेहात डुंबवते. तिच्या या सगळ्या वैशिष्ट्यांचा नेमकेपणाने वेध घेत डाॅ. रणधीर शिंदे यांनी भालेरावांच्या निवडक कवितांचे संपादन ‘सुगीभरल्या शेतातून’च्या रूपाने केले आहे. आशय, आकृतिबंध, कथनलय या बाबतीत वैविध्य असणाऱ्या कवितांची निवड करताना संग्रहाच्या सुरुवातीस मर्मग्राही विश्लेषण करणारी दीर्घ प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे. 1980 पूर्व मराठी कवितेची स्थितिगती व तिच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेत भालेरावांनी भालेरावांच्या कवितेच्या आगळेपणाचा, तिच्या स्वभावाचा, वैशिष्ट्यांचा वेध घेतला आहे. परंपरेतील शेती-मातीची महती गाणारी कविता म्हणून अधाेरेखन करताना ‘‘शेतीसंस्कृतीतील नांगरी विद्येचा प्रभाव भालेराव यांच्या कवितेमागे आहे. महाराष्ट्रातील एका भू-प्रदेशातील श्रमसंस्कृतीच्या जाणिवांचा हा आविष्कार आहे. नांगरी, कष्टकरी समूहाच्या या काळातील स्थितीचा आलेख भालेराव यांच्या कवितेत पाहावयास मिळताे.’’ (पृष्ठ 12) असे शिंदे यांनी आगत्यपूर्वक नाेंदविले आहे.

कुणब्याचे बहुतेक सगळे जगणे हे निसर्गाशी दाेन हात करत पराकाेटीच्या राबण्यात खर्ची पडत असते. सरते शेवटी आतडी तुटेपर्यंत, हाडाकाडांची माती हाेईपर्यंत राबूनही त्याच्या वाट्याला हतबलतेशिवाय दुसरे काहीच येत नाही. अशा अगतिकतेत ताे जगण्याचे आदिम शहाणपण शाेधण्याचा प्रयत्न करीत असताे. भालेरावांची कविता या शहाणीवीच्या भानाकडे अत्यंत चपखलपणे लक्ष वेधत असल्याच्या निर्वाळा रणधीर शिंदे यांनी प्रस्तावनेत केला आहे. भालेरावाची कविता निव्वळ गावखेड्यात राहणाऱ्या कुणब्यांची दु:खं मांडण्यात धन्यता मानत नाही; तर ती नवे प्रश्न उपस्थित करते. नव्या पेचाचे सूचन करते. जाणीवपूर्वक अदृश्य वास्तवाकडे वाचकांचे लक्ष वेधते. कधी खेळकर वृत्तीने काेडे-हुमान घालून माेकळी हाेते, तर कधी धीरगंभीर प्रश्नांच्या जङ्जंजाळ जंगलात वाचकाला

चुकवून त्यांची तारंबळ उडवते. एकार्थाने भालेरांवाच्या कवितेचे अंतर्वर्ती रूप हे वैचारिकतेचे वहन करणाऱ्या खळाळाप्रमाणे आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ‘कविता ही तिच्या काळात प्रचलित असलेल्या विचारांची, तत्त्वज्ञ व विचारवंत यांनी मांडलेल्या विचारांची मांडणी करते. या विचारांचे प्रतिध्वनी असेच बहुतेक कवितांचे स्वरूप असते.’ (पाटणकर वसंत, पृष्ठ 178) या वसंत पाटणकरांच्या विधानानुसार भालेरावांची कविता आजच्या शेती-मातीविषयी भाष्य करताना संत तुकारामांपासून बहिणाबाईंच्या उद्गारांचे पुनरुज्जीवन करताना दिसते. माझा बाप सत्त्वशील । सत्त्व मातीला वाहिलं ।। माती भाळली ङ्खळली । कधी उभी उङ्खाळली ।। किंवा कसा विणलास माय छान कवितेचा खाेपा / विणायला अवघड झुलायला साेपा साेपा सारख्या कवितेच्या ओळी वाचताना वरील विधानाची सत्यता पटते. समाज, संस्कृती, समकालीन राजव्यवस्थेची स्थिती याविषयी त्यांची कविता मूलग्राही भाष्य करते.

आजच्या शेतीसमाेरील प्रश्नांची विदारकता देखील अत्यंत टाेकदारपणे भालेरावांच्या कवितेतून व्यक्त हाेते. 1990 नंतर जागतिकीकरणामुळे मानवी जगण्यासह शेतीचाही कायापालट झाला. मानवी जीवनात भाैतिक वस्तूंना कमालीचे महत्त्व आले. एकीकडे भाैतिक पर्यावरण बदलत असताना अंत:स्थ स्तरावर मानवी मूल्यव्यवस्थाही बदलू लागली. या सगळ्यातून गाव आणि शेती सुटू शकली नाही. नव्या अर्थकारणाने शेती आतबट्ट्यात येत गेली. पैसाकेंद्री अर्थकारणाच्या दृष्टचक्रासमाेर पारंपरिक पद्धतीने शेती कसणाऱ्या शेतकऱ्याचा टिकाव लागला नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकटांचे पाश त्याच्या गळ्याभाेवती आवळायला सुरुवात झाली आणि साऱ्या दुनियेला तगवणारा अन्नदाता गळङ्खास घेऊन आत्महत्या करू लागला.

‘‘दरराेजच्या बैलांना पाणी पाजणं, वासरांना हिरावा चारा, दूध काढणं आणि कुटुंबात सगळ्यांशी प्रेमभराने वागत शेतकरी शेवटच्या प्रवासाला सुगावा लागू न देता नाहीसा हाेताे.’’ (पृष्ठ 23) असे निरिक्षण नाेंदवित भालेरावांची कविता शेती व शेतकऱ्याच्या वाताहतीस कारणीभूत व्यवस्थेचा निषेधही करायला कचरत नसल्याचे, अधाेरेखन शिंदे यांनी केले आहे.

भालेरावांची कविता ही शिक्षितांइतकीच अक्षर ओळख नसणाऱ्या कष्टकरी श्रमजीवी वर्गांची आहे. त्यामुळे शेतात राबणाऱ्याला प्रत्येकाला भालेरावांची कविता आपलं दुखणं लाेकाेद्गत करतेय, असे वाटते. शेतीशी संबंधित परंतु शहरात राहणाऱ्याला भालेरावांची कविता जणू आपल्या हृदयातील मातीविषयची आस्था, घुसमट सांगत असल्याचा भास हाेताे. त्याचवेळी शेतशिवाराशी अजिबात संबंध नसणाऱ्या व्यक्तीला भालेरावांच्या कवितेतील भावविेश काहीसे आडवळणाचे वाटू शकते. तिचा आवाज, शब्दकळा, संवादाची लय, प्रतिकांचे अर्थ सारे काही अपरिचित वाटू शकते. इतरांसाठी मात्र भालेरावांची कविता अत्यंत साधी, साेपी, सरळ, ऋजू वळणाची असते. अत्यंत विचारपूर्वक केलेली प्रतिमा-प्रतीकांची पेरणी कवितेला अधिक कसदार बनविते. कवितेचे भावसाैंदर्य भारित करते. लाेकसंस्कृतीतील कथनवैशिष्ट्ये अंगीकारणारी त्यांची कविता रंग, गंध, चव संवेदनेसह अधिक गहिरेपणाने वाचकांच्या हृदयाला स्पर्शते.

स्वत:पलीकडे जाऊन समूहमन जपण्याचा कृषिपरंपरेतील मानवी स्वभाव भालेरावांच्या कवितेत वारंवार आवृत्त हाेताे. त्यांच्या कवितेत नात्यांना अत्यंत महत्त्व असते. रणधीर शिंदे म्हणतात त्याप्रमाणे भालेरावांची कविता काहीशी राेमँटिक वृत्तीची आहे. त्यामुळे बाप, आई, बहिण, भाऊ, सखी, सवंगडी यांच्यासह दावणीची जनावरे यांच्यातील परस्परसंबंधाच्या हळव्या जागा भालेरावांच्या कवितेत सशक्तपणे आवृत्त हाेत जातात. ‘माती-पाणी’ सारख्या कवितेतील

केळीला दिलेल्या पाण्यामुळं / बांधावरच्या बाभळीही लसलसतात…
केळीच्या मायचा पत्ताही नव्हता / त्याआधीपासून बाभळी आहेत
(माती-पाणी, पृष्ठ 98) या सारख्या ओळी वाचताना मानव आणि वनस्पती सृष्टी यांच्या सहअस्तित्वाकडे भालेराव अत्यंत संवेदनशीलपणे पाहत असल्याचे लक्षात येते. त्यांच्या कवितांतून आविष्कृत हाेणाऱ्या मानवी नातेसंबंधांत जीवनमूल्यांना आणि कष्टाला अत्यंत महत्त्व असते.

त्यामुळेच कवितेतील कुणा एका बापाला विहिर खणण्यासाठी एकटीच विहिरीत उतरणारी लेक वाघीण वाटते. तर सुगी संपल्यावर मंदिरात कणसे नेऊन बांधणाऱ्या बापामध्ये मानवेतर जीवांना पाेसण्याचे दातृत्व दिसते. स्व: पलीकडे पाहण्याचा उदात्त मूल्यभाव भालेरावांच्या कवितेत लाेकसंस्कृतीतून झिरपत आला असावा. लाैकिक जीवनात ऐकलेल्या लाेककथा, लाेकगीते, लाेकरुढी, लाेकसंकेत, लाेकसमजुती ओव्या, अभंग, कीर्तने आदी संचिताने त्यांच्या कवित्वाचा पिंड पाेसल्याच्या खुणा कवितेत जागाेजाग आढळतात. ‘त्यांच्या कवितेत लाेकसंस्कृतीतील मिथककथा, प्राक्कथा, लाेकसमजुतीचा कल्पक आणि सर्जनशील वापर आहे…

मराठी लाेकजीवनातील लाेकसमजुतीचा सतत वापर त्यांच्या कवितेत आहे. ही लाेकतत्त्वे ग्रामीण व शेतीसंस्कृतीशी संबंधित आहेत.’ (पृष्ठ : 29) असे भालेरावांच्या कवितेविषयकचे डाॅ. रणधीर शिंदे यांचे निरिक्षण रास्त आहे. डाॅ. शिंदे यांनी प्रस्तावनेच्या तेराव्या छेदकामध्ये भालेरावांच्या कवितेच्या भाषिक रूपांबाबत मार्मिक टिपणी केली आहे.

सगळ्याच कुणबिकीची सूत्रं आपल्या हातून चाललीत /
शेतातला खत आणि गावातील पत तर साेडाच /
पण घरातलं एकमतही आपल्या हातात नाही म्हटल्यावर /
जगण्यासाठी काही कारणच उरलं नाही (ज्या सूत्रानं, पृष्ठ 90) सारख्या कवितेच्या ओळी वाचत असताना भालेरावांची कवितेचे रूप अलीकडच्या काळात पालटले असून तिच्यातील ‘सांगणे’ प्रभावी ठरत असल्यामुळे ती काहीशी विधानपरतेच्या अंगाने प्रगटू लागली असल्याचे शिंदे यांचे अवलाेकन औचित्यपूर्ण वाटते.

एकंदर, ‘सुगीभरल्या शेतातून’च्या रूपाने शिंदे यांनी इंद्रजित भालेराव यांच्या समग्र कवितांतील सत्त्वांश एकत्र केला आहे. अत्यंत विचक्षण वृत्तीने संपादित केलेल्या या संग्रहात भालेरावांच्या कवित्वाचे विविधांगी दर्शन घडते. भूमी आणि शेतकरी, निसर्ग आणि शेतकरी, आध्यात्म आणि शेतकरी, शासन यंत्रणा आणि शेतकरी, जागतिकीकरण आणि शेतकरी, शेती आणि स्त्री अशा अनेकविध आयामातून कुणब्याच्या भावविेशांचा वेध प्रस्तुत संग्रहातील कवितांच्या अर्थाकलनाद्वारे घेता येईल. 1990 नंतरचे नवे अर्थकारण आणि आतबट्ट्यातील शेती, अलीकडच्या काळात हाेत असेलेली शेतीची हेळसांड, शेतकऱ्यांची ढाेरमेहनत, त्याचा निसर्गावरील श्रद्धाभाव, सरतेशेवटी काहीच हाताशी लागत नसल्याने पत्करलेली आत्महत्या, गावगाड्यातील ढासळलेली मूल्यव्यवस्था यापैकी काहीच भालेरावांच्या नजरेतून सुटत नाही. रणधीर शिंदे यांनी अशा वैविध्यपूर्ण आशय असणाऱ्या आणि नानाविध रूपात अभिव्यक्त हाेणाऱ्या प्रातिनिधिक कवितांचा समावेश प्रस्तुत संग्रहात केला आहे.

कृषिसंस्कृतीतील अनेक भावस्थितींचे दर्शन घडविणाऱ्या 106 कवितांच्या या संपादनाच्या सुरुवातीस शिंदे यांनी ‘सुगीभरल्या शेतातून : श्रममूल्यांचे संस्कृतिभान’ या शीर्षकाची दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. 14 छेदकांत विभागलेल्या या प्रस्तावनेत डाॅ. शिंदे यांनी भालेरावांच्या कवितांच्या वैशिष्ट्यांची सूक्ष्म आणि तपशीलवार चिकित्सा केली आहे. आगळ्या दृष्टिक्षेपातून भालेरांवाची कविता समजून घेण्यासाठी प्रस्तुत संग्रहाची प्रस्तावना दिशादर्शक ठरणारी आहे. याआधी ‘इंद्रजित भालेराव यांची कविता : आकलन, आस्वाद आणि आक्षेप’ (2013) ग्रंथाद्वारे भालेराव यांच्या कवितांची समीक्षात्मक चिकित्सा करणाऱ्या लेखांचे संपादन भगवान काळे यांनी केले आहे. त्यामध्ये वाययासह इतर ज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांनी भालेरावांच्या कवितांचे आत्मियतेने अर्थाकलन, समीक्षण, मूल्यमापन, रसास्वादन केले आहे. परंतु भालेरावांच्या समग्र कवितांमधून सारभूत कवितांचे संपादन आणि त्याविषयी गुणग्रहण करणारी प्रस्तावना प्रस्तुत संग्रहाच्या रूपाने वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे. तेव्हा भालेरावांच्या कवित्वाचे अर्करूपी आकलन करून घेणाच्या दृष्टीने ‘सुगीभरल्या शेतातून’ संग्रहातील कविता वाचनीय आहे.

संदर्भ

  • सुगीभरल्या शेतातून, निवडक कविता, इंद्रजित भालेराव, संपादन : रणधीर शिंदे, सुरेश एजन्सी, पुणे, पहिली आवृत्ती, फेब्रुवारी, 2021
  • इंद्रजित भालेराव यांची कविता : आकलन, आस्वाद आणि आक्षेप, संपादन : भगवान काळे, साक्षात प्रकाशन, औरंगाबाद, पहिली आवृत्ती,7 ऑगस्ट, 2013
  • कवितेचा शाेध, वसंत पाटणकर, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ आणि माैज प्रकाशन गृह, पहिली आवृत्ती, 7 जून 2011

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading