November 21, 2024
Common citizens will decide the future of Indian cinema Javed Akhtar comment
Home » भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर
काय चाललयं अवतीभवती

भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील – जावेद अख्तर

पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी, या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंचावर एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्मसिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी व सर्व संबंधित उपस्थित होते.

गीतकार जावेद अख्तर पुढे म्हणाले की, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो. या भागातील नागरिक कलेचा सन्मान करणारे आहेत. मी २० वर्षाचा असताना मुंबईला आलो. त्यावेळी मी मराठी नाटके पाहिली, अशी कला मी कधीही पाहिली नव्हती. तेंव्हापासून मी महाराष्ट्रात राहत असून दिवसेंदिवस माझे डोळे उघडत गेले. महाराष्ट्रात कलेचा सन्मान केला जातो. विशेषत: साहित्य, कला, कविता, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीताबद्दल या भागातील सामान्य नागरिक विचार करतो, त्याला सन्मानित करतो, ही खूप आशादायी बाब आहे.

समकालीन काळात चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून कोणत्या प्रकारचे चित्रपट बनतील आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनणार नाहीत; याची जबाबदारी लोकांवर आहे. त्याचप्रमाणे आजच्या चित्रपटात मूल्य, नैतिकता आणि कोणत्या प्रकारचे संस्कार असतील हे सामान्य नागरिक ठरवतील असेही यावेळी अख्तर यांनी सांगितले.

दिग्दर्शक आर. बाल्की यावेळी बोलताना म्हणाले की, मी या शहरात पहिल्यांदा आलोय, इथे येऊन मी मनापासून आनंदी आहे. मला चित्रपट महोत्सव आवडतो. सर्वांनी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आनंदाने साजरा करावा. महोत्सवाची उद्घाटन झाले असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

चित्रपटाला या भागामध्ये गंभीरपणे घेतले जाते, असा हा भाग असून या भागामध्ये एमजीएम फिल्म इन्स्टिट्यूट निर्माण केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. चित्रपट बनविण्यापेक्षा दुसरे कुठले मोठे काम नाही. विशेषत: चित्रपट क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप मानसन्मान मिळतो, असे दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले.

संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी यावेळी बोलताना अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शहराच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. या भागातील प्रतिभेला एक व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. एखाद्या फिल्म इन्स्टिट्यूटचा जन्म अशा महोत्सवातून होणे ही बहुधा पहिलीच घटना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यावेळी बोलताना म्हणाले, येत्या काळामध्ये कशा प्रकारचे चित्रपट येतील ही गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू, हा विश्वास व्यक्त करतो. त्याचप्रमाणे फिल्म इन्स्टिट्यूट वाटचाल निश्चितपणे चांगली राहील.

महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामागची भूमिका मांडली. ते म्हणाले की, जावेद अख्तर यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ आपल्यासाठी महत्वाची आहे. हा महोत्सव लोकांचा असून ही साहित्यिकांची, सुफी संत आणि सतांची भूमी आहे. आम्हाला धर्मनिरपेक्षता गीतकार जावेद अख्तर यांच्या चित्रपटातून शिकायला मिळाली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला हिंदुस्थानियत शिकवली आहे.

जगभरातील चित्रपट प्रेक्षकांना या चित्रपट महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनी ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ स्वीकारला त्याबद्दल आभार व्यक्त करतो असे महोत्सव संचालक अशोक राणे म्हणाले.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती आहे. डेलीहंट डिजीटल पार्टनर आहेत. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँण्ड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम ९०.८ हे रेडिओ पार्टनर आहेत.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म ‘फॉलन लिव्हस’ ही फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित करण्यात आली. हा चित्रपट महोत्सव पुढील चार दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.

पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना यावर्षीचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृ्रतीमान चॅटर्जी, ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी), भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता इतर गटातील सिनेमा परीक्षक ज्युरी अध्यक्ष एन.मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन पूर्वी भावे आणि नीता पानसरे वाळवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत यांनी केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading