जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी २
आठवडा बाजार असो वा भीमथडी जत्रा, तेथे स्टॅालवर सुरेखा वाकुरे स्वतः भेटतात. एखाद्या माणसाने विचारले, ‘कोणाचा ब्रॅन्ड विकता ?’ यावर त्या अभिमानाने सांगतात, ‘माझाच ! माझे स्वतःचे प्रॅाडक्शन आहे. या नावातील सुरेखा मीच.!’ अनेक महिलांना प्रेरणादायी ठरावे असे त्यांचे हे शब्द मीही ऐकले आहेत.
अॅड. शैलजा मोळक
लेखक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता
मो. 9823627244
‘सुरेखा मसाले ब्रॅन्ड’ चा स्टॅाल भीमथडी जत्रेत शोधणारे माझ्यासारखे अनेकजण..! २५ वर्षांपूर्वीच्या सुरेखाताईंना मी ओळखते. कित्येकजणी पुण्यात लग्नानंतर येऊन आपले स्थान निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण सुरेखाताई एक वेगळंच रसायन. मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यांतील आंदोरे या गावाच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दोन बहिणी व एक भाऊ अशा कुटुंबात वाढलेल्या. वडील शेतकरी असतानाही त्यांना शिक्षणाचे महत्व पटलेले असल्याने त्यांनी मुलींना पदवीपर्यंत शिक्षण दिले.
दुर्दैवाने सुरेखाताई पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले आणि सुरेखाताईंनी शेती करण्यास सुरुवात केली. ऊसाचे पीक काढून ते पाठवायचा अनुभवपण त्यांनी घेतला. सुरेखाताई लहानपणापासूनच आत्मविश्वास व हिंमतीच्या जोरावर सारी कामे करत असत. तोच पुढे त्यांना उद्योजक बनायला कामी आला. उस्मानाबादचे शिवाजी वाकुरे पुण्यात रहायला असल्याने त्या लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाल्या. एक वर्ष शहरी जीवनाशी जुळवून घेतल्यानंतर काहीतरी नोकरी धंदा करावा असा विचार त्यांना केला.
त्यांच्या चुलत सासूबाई डॅाक्टर होत्या त्यांनी तू पदवीधर आहेस तेव्हा पुण्यात तू काहीही करू शकतेस हा कानमंत्र दिला. ताईंनी नोकरी न करता घर सांभाळून काय करता येईल याचा विचार केला आणि ताईंनी तिखट, हळद करून विकण्यास सुरू केले. तेव्हाच पुण्यात आगाखान पॅलेसमधे मसाले व्यवसायाचे प्रशिक्षण सुरु असल्याचे समजले व ताईंनी तेथे प्रवेश घेतला. महिनाभर सारे तंत्र-मंत्र शिकून घेतले. तेव्हा त्यांचा मुलगा १ वर्षाचा होता. त्याला बरोबर घेऊन त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ताईंनी मागे वळून पाहिलेच नाही. हळद तिखटाबरोबर मराठवाड्यातील पारंपारिक मसाले आणि विविध मसाले सुरु करून विक्री सुरु केली.
व्यवसाय सुरु करायचा म्हटलं की, भांडवल, यंत्रसामग्री हवीच. घरच्यांच्या मदतीने व्यवसाय सुरू झाला. मसाल्याचे नाव, पॅकिंग, वजन इ. माहितीच्या चिठ्ठया हाताने तयार करून घरगुती पॅकिंग सुरु केले. पण स्वतःची ओळख बाजारात निर्माण करण्यासाठी केवळ स्वतःचे नाव ‘सुरेखा मसाले’ देऊन चालणार नव्हते. बाजारातील स्पर्धेत उतरायचे असेल तर खास मसाला स्पेशॅलिटी हवी यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ग्राहकांची मागणी काय?, विक्रीसाठी योग्य बाजारपेठ कुठे मिळेल याचा शोध घेणे, आपली वेगळी स्पेशॅलिटी निर्माण करणे हे मनाशी बाळगून मराठवाड्यातील खासियत असलेला ‘येसूर’ मसाला बनवायची किमया त्यांनी साधली आणि येसूर मसाला पुण्यात अल्पावधीतच लोकप्रिय झाला. आज त्या काळा, गोडा, मटण, बिर्याणी, सांबार, तवा, सब्जी, पावभाजी, कोल्हापुरी, कोकणी, मच्छी, मिसळ मसाला असे जवळपास १६ ते १८ प्रकारचे मसाले बनवतात.
सन २००६ मधे सुरेखाताईंना भीमथडी जत्रेत स्टॅाल लावायची संधी मिळाली. पहिल्या वर्षी रू. ८००/- ची विक्री झाली. ताई आनंदून गेल्या. त्यानंतर सलग १७ वर्ष त्या प्रतिवर्षी लाखाहून अधिक विक्री करत आहेत. ‘सुरेखा मसाले ब्रॅन्ड’ घरोघरी पोहोचवण्यात भीमथडीचा मोठा वाटा आहे हे त्या अभिमानाने सांगतात. यामुळे ताई उद्योजिका म्हणून प्रसिध्दीस आल्या. व्यवसाय, प्रसिध्दी, उत्तम दर्जा, कायमचा ग्राहक मिळवण्यासाठी जे जे करायला, शिकायला हवं ते ते ताईंनी केले आहे.
आज ताई तीन टनाहून अधिक मसाला करतात. हे त्यांचे काम १२ महिने सुरु असते. या व्यवसायामुळे तीन चार महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे.
त्यांनी या व्यवसायाच्या जोरावर दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले आहे. मोठा मुलगा सिव्हील इंजिनिअर होऊन नोकरीसाठी परदेशी गेला आहे. दुसऱ्या मुलाने हॅाटेल मॅनेजमेंट करून घरच्या व्यवसायात मदत सुरु केली आहे. मुलांच्या व पतीच्या मदतीने आता त्यांचा व्यवसाय ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. ही सारी प्रगती केवळ बचतगटाच्या मदतीने केली हे त्या आवर्जून सांगतात. ताईंचे स्वादिष्ट मसाले हे पुण्यातील अनेक हॅाटेलमधे तर जातातच पण पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर सातासमुद्रापारही पोहोचले आहेत हे त्या अभिमानाने सांगतात.
हा व्यवसाय आणखी वाढवण्याचे व त्यासाठी स्वतःची जागा, मसाले कुटण्याचा डंक, आणखी काही महिलांना रोजगार, जगभर मसाले पोहोचवणे हे त्यांचे स्वप्न व ध्येय आहे. आणि ते पूर्ण करून दाखवू हा आत्मविश्वास त्या व्यक्त करतात. इतर महिलांनी छोटा-मोठा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे रहावे. यश तुमचेच आहे असा संदेश त्या महिलांना देतात.
आठवडा बाजार असो वा भीमथडी जत्रा, तेथे स्टॅालवर त्या स्वतः भेटतात. एखाद्या माणसाने विचारले, ‘कोणाचा ब्रॅन्ड विकता?’ यावर त्या अभिमानाने सांगतात, ‘माझाच ! माझे स्वतःचे प्रॅाडक्शन आहे. या नावातील सुरेखा मीच.!’ अनेक महिलांना प्रेरणादायी ठरावे असे त्यांचे हे शब्द मीही ऐकले आहेत. अशा या यशस्वी उद्योजिका असलेल्या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
सुरेखा वाकुरे – मो. 92256 33677
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.