November 21, 2024
conservation-of-lepidochelys-olivacea-olive-redle
Home » कासव..एक ‘संघर्षयात्री’..!
व्हिडिओ

कासव..एक ‘संघर्षयात्री’..!

पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जीवन जगणारी आणि उभ्या आयुष्यात आई-वडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्ले ही जगाच्या पाठीवर एकमेव असावीत. या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना अन्य मांस भक्षी पक्षी, प्राणी यांच्यापासून बराच संघर्ष करावा लागतो. ही संघर्ष यात्रा निश्चितच सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

कुसुमानंद
कासव संवर्धन

दापोली वन परिक्षेत्रामध्ये दापोली, मंडणगड, व खेड तालुक्यांचा सामावेश आहे. या वनपरिक्षेत्रात कासव संवर्धन व संरक्षणाचे काम करण्यात येत असून, 2011 पासून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या 55 हजार 916 संघर्षयात्री कासव पिल्लांनी स्वतंत्र जीवनासाठी समुद्राकडे धाव घेतली आहे.

महर्षी दुर्वासा ऋषींनी इंद्र देवाला दिलेल्या शापापासून सुरुवात झालेल्या पद्मपुराणातील कथेची, भगवान विष्णूच्या कुर्मावताराने समाप्ती झाल्याचे दिसून येते. अमृतासह तेरा अमुल्य रत्नप्राप्तीसाठी रवीरुपी मंदार पर्वत, वासुकी नागरुपी दोरीने समुद्र मंथन करताना मंदार पर्वत समुद्रात खचू लागला. त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी कुर्मावतार घेवून, हा पर्वत आपल्या पाठीवर घेतला, अशी अख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी कासवाच्या टणक पाठीचे महत्व अधोरेखित होते. याच पाठीचा ढालींसाठी उपयोग व्हायचा.

व्हिडिओ, छायाचित्रे – प्रशांत सातपुते

कासव हा पृष्ठवंशीय आणि समषितोष्ण कटीबंधात राहणारा प्राणी आहे. कासवाच्या सुमारे 220 प्रजाती असून, भूचर आणि सागरी कासव असे दोन प्रमुख प्रकार आढळतात. गोड्या पाण्यातील नर मादीपेक्षा लहान, भूचर प्रामुख्याने शाकाहारी तर, सागरी कासव सर्वभक्षीय असतो.

ऑलिव्ह रिडले समुद्री कासव ( Lepidochelys olivacea) एक मध्यम आकाराचा सागरी कासव आहे. प्रशांत आणि हिंद महासागरामध्ये प्रामुख्याने त्याचा वावर आढळून येतो. ऑलिव्ह रिडले समुद्री कासव पूर्वेकडील समुद्रकिनारी (ओरिसाचे) समुद्रकिनारे मोठ्या संख्येने कासव घरटे तयार करतात, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली (मौजे दाभोळ, लाडघर, कर्दे, मुरूड, कोळथरे, आंजर्ले, केळशी) व मंडणगड (मौजे वेळास ) तालुक्याच्या 8 समुद्रकिनारी समुद्री कासवे आपली घरटी तयार करतात. त्यामध्ये दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि मंडणगड तालुक्यातील वेळास या ठिकाणी घरटी सापडण्याचे प्रमाण जास्त आहे.

ऑलिव्ह रिडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करते. वाळूच्या खाली १००-१५० या प्रमाणात अंडी देते. पुन्हा वाळूच्या सहाय्याने अंडी मुजवते आणि समुद्रामध्ये निघून जाते. अंडी वाळूच्या खड्डयांमध्ये स्वतःच उबतात. समुद्री कासव इतर प्राण्याप्रमाणे त्या जागी अंडी उबवण्यासाठी थाबंत नाहीत. त्यामुळे कासवांनी घातलेल्या अंड्यांना कुत्रे, कोल्हे, मुंगुस व कावळ्यांपासून धोका निर्माण होतो. परिणामी, समुद्री कासवाने घातलेली अंडी नष्ट होवून जातात. या कारणास्तव वनविभागामार्फत समुद्री कासवाचे संवर्धन केले जाते. अंडी वाळूत असताना, मिळणाऱ्या तापमानावर नर – मादी ठरते.

वनविभागामार्फत हंगामी व स्थानिक दोन व्यक्तीस (कासवमित्र) म्हणून माहे नोव्हेंबर ते मे पर्यंत नेमणूक करण्यात येते. कासवमित्रांना कार्यशाळेचे आयोजन करून योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. कासव मित्र रात्री समुद्रकिनारी गस्त घालून, या कालावधीमध्ये समुद्री कासवांने तयार केलेली घरटी शोधून, घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पध्दतीने खड्डा खोदून, त्यामधील अंडी योग्य पध्दतीने हाताळून समुद्र किनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये खड्डा खोदून, त्यामध्ये अंडी उबवण्यासाठी ठेवली जातात. हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या घरट्याला चिन्हांकित करून, घरटे मिळाल्याचा दिनांक आणि वेळ नोंदवण्यात येते.

45 ते 55 दिवसानंतर ही अंडी फलीत होतात. त्यामधून बाहेर पडलेली पिल्ले खड्ड्यांमधून वर येतात. समुद्र कासवांच्या मेंदूत पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र वाचण्याची क्षमता असते, जेणेकरून ते त्याच किना-यावर पुन्हा घरटं करू शकतील, असा अंदाज आहे. असे म्हटले जाते की, मादी ऑलिव्ह रिडले ती ज्या समुद्रकिनारी जन्माला आली आहे, त्या समुद्रकिनारी ती अंडी घालण्यासाठी परत येते. असे करण्यासाठी ती कधीकधी हजारो मैलांपर्यंत प्रवास करते.

व्हिडिओ, छायाचित्रे – प्रशांत सातपुते

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाला वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये अनुसूची 1 मध्ये स्थान प्राप्त झाले आहे. आययुसीएनद्वारे असुरक्षित म्हणून रेड डाटा बुक मध्ये समाविष्ट आहे. CITES नुसार देखील त्याला संरक्षण प्राप्त झाले आहे. ज्यावर भारत स्वाक्षरीकर्ता आहे. कासव घरटी देणारा समुद्र किनारा संवेदनशील पर्यावरणीय प्रणाली आहेत आणि कोस्टल रेग्यूलेशन झोन २०११ अंतर्गत संरक्षित आहेत. ऑलिव्ह रिडले समुद्री कासव पाहण्यासाठी, घरट्यामधील अंडी जेव्हा नोव्हेंबर आणि मे दरम्यान असतात तेव्हा सर्वोत्तम काळ मानला जातो.

ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा तपशील –

१. शास्त्रीय नाव: Lepidochelys olivacea
२. अंदाजे वयोमर्यादा :- ५० वर्षापर्यंत
३. वजन: प्रौढ नर सरासरी २५-४५ किलोपर्यंत
वजन : मादी ३५ ते ४५ किलोपर्यंत
४. आकारामान :- लांबी सुमारे २ फूट
५. अंडी देण्याची क्षमता: ४० ते १७० पर्यंत
६. अंडी उबविण्याचा कालावधी: ४५-५५ दिवस
७. नवजात पिल्लांचे आकारमान लांबी ३७-५० मि.मी.
८. नवजात पिल्लांचे वजन:- सुमारे १२-२३ ग्रॅम
९. विणीचा हंगाम : प्रामुख्याने नोव्हेंबर, मे, मार्च
१०. स्वरूप :- हृदयाच्या आकाराच्या शीर्ष शेलसह ऑलिव्ह / राखाडी हिरवे
११. आहार :- एकपेशीय वनस्पती, लॉबस्टर, खेकडे, मॉलस्क, कोळंबी मासा आणि इतर लहान मासे

पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जीवन जगणारी आणि उभ्या आयुष्यात आई-वडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्ले ही जगाच्या पाठीवर एकमेव असावीत. या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना अन्य मांस भक्षी पक्षी, प्राणी यांच्यापासून बराच संघर्ष करावा लागतो. ही संघर्ष यात्रा निश्चितच सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

व्हिडिओ, छायाचित्रे – प्रशांत सातपुते


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading