राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंताचे थोर अनुयायी कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने तेच विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे बंडोपंत बोढेकर सध्याच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे अभंग त्यांच्या ह्या आनंदभान अभंगसंग्रहात दिसून येतात.
दुशांत बाबुराव निमकर, मु.चक फुटाणा ता.पोंभुरणा
जिल्हा चंद्रपूर, मो.नं.-९७६५५४८९४९
चंद्रपूरातील ज्येष्ठ लेखक तथा कविवर्य बंडोपंत बोढेकर यांचा “आनंदभान’ हा अभंगसंग्रह ग्रामीण जीवन व ग्रामीण भागातील वास्तवस्थिती अधोरेखित करणारा अभंगसंग्रह आहे.प्राचीन व मध्ययुगीन कालखंडापासून संतांनी समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून ‘अभंग’ या काव्यप्रकाराचा उपयोग केला आहे. जगतगुरू श्री तुकाराम महाराजांनी जागृत व सजग समाज निर्माण करण्यासाठी ‘अभंग’ हाच काव्यप्रकार निवडला . त्याचसोबत संत नामदेव,संत ज्ञानेश्वर,संत निवृत्ती,संत सोपान, संत बंका, संत विसोबा खेचर,संत चोखामेळा आदी अनेक संतांनी सामाजिक ,मानसिक अस्थिरतेला थोपवून बहुजनांचे प्रबोधन करण्याचे महान कार्य केले. स्त्री संतांनी देखील समाज सुधारणेच्या कार्यात बहुमोल वाटा उचलला आहे. संतांच्या प्रबोधनाचा वारसा पुढे नेण्याचे अनमोल कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले आहे त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन समाजमनास दिशादर्शक असे अभंग ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी लिहिलेले आहे. ‘ग्रामगीता’ डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागातील दशा आणि व्यथा यांना सामोरे जाऊन जीवनात आनंदाचे भान निर्माण करण्याचा आशावाद कविवर्यांनी मांडलेला दिसून येतो .चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया या झाडीपट्यातील गावात
नोकरीच्या निमित्याने वास्तव करणाऱ्या कवीवर्याला आढळणाऱ्या वास्तव सामाजिक जाणिवा अभंगाच्या स्वरूपात आलेल्या आहेत. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व झाडीबोली साहित्य मंडळाचे विचार आधार म्हणून कार्य करीत असतांना साध्या, सोप्या व सरळ साडेतीन चरणाच्या अभंगातून ग्रामीण स्थिती, विनवणी, दया, करुणा, अध्यात्म, भक्ती, श्रद्धा विविध रूपातील अभंगाचे वाचन केल्यास हा अभंगसंग्रह सामाजिक जाणिवेचा अमृतकुंभच आहे याची जाणीव होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंताचे थोर अनुयायी कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने तेच विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे बंडोपंत बोढेकर सध्याच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे अभंग त्यांच्या ह्या आनंदभान अभंगसंग्रहात दिसून येतात. ग्रामीण जीवन व्यतीत करीत असतांना येणारे वादळे झेलीत, त्यांच्यावर पांघरून घालून आनंदाची किरणे डोक्यावर घ्यावी आणि त्यामधून आपल्यासह इतरांच्याही जीवनात आनंदभान निर्माण करता येते.त्याचदृष्टीने ते आपल्या अभंगातून अध्यात्म आणि विज्ञानाकडे घेऊन जाणारी चिकित्सक दृष्टी देखील वाचकांना देत असल्याचे जाणवते. त्यांच्या अभंग रचनेतून भक्तिभाव,झाडीबोलीतील वास्तव जीवन दर्शन , जीवन जगण्याची पद्धती, गावातील नातीगोती, तेथील संस्कृती , महापुरुषांचे माहात्म्य, निसर्गाचे देखणं रूप,अंधश्रध्दा,जीवनाचे ध्येय या सर्वमान्य बाबीतून सुंदररित्या प्रबोधनात्मक अभंग या आनंदभान संग्रहात दिसून येते.
विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी दंग होऊन भक्तीत लीन होऊन जातात. त्याचप्रमाणे प्रस्तुत कवींनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेप्रमाणे ग्रामनाथाचे उत्थान व्हावे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन मूर्त-अमूर्त संकल्पनेवर अभंगरचना केलेल्या आहेत . पुस्तकाच्या विषयानुरूप तयार झालेले मुखपृष्ठ आकर्षक आहे. आनंदभान या अभंगसंग्रहाच्या अंतरंगात डोकावले असता अलिकडे आलेली सामाजिक,धार्मिक,राजकीय , कौटुंबिक अस्थिरता आणि त्यावर दिलेले संतबोधावर आधारित भाष्य करीत हा अभंगसंग्रह वाचकांना जीवनानंद देऊन जातो.
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आनंदभान अभंगसंग्रहात एकूण ७८ अभंग आहेत.प्रत्येक अभंग मानवी जीवन व मानवी जीवनातील संवेदना , अंतरंग उलघडणारे आहेत.निसर्गातील दिसणाऱ्या सूक्ष्म घटकांचे निरीक्षण करून त्यावर आपल्या अभंगाच्या योग्य,समर्पक उत्तरे शिर्षकाद्वारे दिलेले आहे.झाडीबोली,निसर्ग,शेती-माती-नाती,गाव,व्यसन,मानवी प्रवृत्ती,भक्तिभाव,महापुरुष यांच्या कार्याचे स्मरण व त्याचप्रमाणे आचरण करण्याचा मनोभाव या अभंगसंग्रहात दिसून येतो.आनंदाचे घर या अभंगात त्यांनी झाडीपट्टीमधील संस्कृती,निसर्गाचे वर्णन व शेतीविषयी अभंगातून मत मांडतो आहे.
धानाची ही पेठ ! तुडुंब तलाव !
मंडई उत्सव ! गावोगावी !!
विदर्भाच्या भूमित शक्यतो चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा,गोंदिया या जिल्ह्यातील बोली येथील संस्कृती, साजरे केले जाणारे सण त्याला झाडीबोलीतील दिलेले नाव अशा अंगाचे अभंग झाडीचा पसारा, झाडीबोली, झोळी,शब्द आराधना, संजीवन रान इत्यादी अभंगातून झाडाची महती सांगितली आहे. मांडवस (गुढीपाडवा) या अभंगातून शेतीकरी राजा शुभारंभ करतो त्याचे वर्णन केलेले आहे त्यात कवी म्हणतो की,
असा हा शेतीचा ! वार्षिक संसार !
सज्ज ते वखर ! हंगामास !!
गावातील नागरिक यांचे एकमेकांशी असलेले सौहार्द नाते,शेती व्यवसायात केले जाणारे प्रयत्न,अखेर अवकाळी पावसाने हिरावून घेणारे पिवळे सोनं आणि बळीराजाची होणारी दयनीय अवस्था , नाते,माती,शेतकरी पुत्रा, प्रयत्न,अनर्थ,दुःखाचा प्रसंग,गाव ,कलह,आपदा या अभंगात मांडलेला आहे. ‘दुःखाचा प्रसंग’ या अभंगात कविवर्य खूप मोलाचा सल्ला सर्वाना देतो आहे.
“जीव असतांना ! सारे झगडती !
शेवटी मिळती ! स्मशानात !!
“सकुली झोपूनी ! मी पाही सर्वाना !
दावी दुःख नाना! एकमेका !!”
जीव असतांना एकमेकांशी असलेले वैर मात्र निधन झालेल्या व्यक्तीसाठी अखेर आसवं गाळतात हे सत्य अभंगातून सुटले नाही.मूर्त-अमूर्त वस्तू ,न दिसणाऱ्या अमूर्त संकल्पनेवर देखील अभंग रचले आहेत.मनाची निर्मिती,मानवी तत्त्व, सहिष्णुता,हास्य,जीवनाचा गाभा,ध्येय,विवेक,कणव इत्यादी.कविवर्य ‘आत्मा’ या अभंगात म्हणतात की,
कड्यापरी चंद्र ! कोसळावे हास्य!
जीवन रहस्य ! तेचि असे..!!
गावावरून देशाची परीक्षा असते.गाव समृद्ध तर देश समृद्ध या ग्रामगीतेच्या धारणेनूसार गावातील तरुणांना व्यसनमुक्त होण्याचा संदेश अभंगातून कवी देतो आहे.व्यसन,संसार,विळखा,देहभान,आत्मग्लानी,ग्रामगीता,ध्येय प्राप्ती,श्रमाचा सुगंध, तुकारामदादा गीताचार्य यासारख्या अभंगातून संस्कार मूल्य दिसून येते. ‘ग्रामनाथ राजा’ या अभंगातून कविवर्य बंडोपंत बोढेकर मौलिक संदेश देतात.
“व्हा व्यसनमुक्त ! टाळा दुर्व्यवहार!
बना रे खंबीर ! गावासाठी..!!
या तुम्ही एकत्र ! मिटवा भांडण !
करावे कांडण ! विकाराचे..!!
झाडीच्या कुशीत आदिवासी भागात वास्तव्य करीत असणाऱ्या आदिम जमातीच्या व्यथा मांडल्या आहेत.आदिवासी बाई,बुवाबाजी,विवाहबंधन,भुललिया गाय, रात्रप्रहर,अज्ञान दोष,विवेक,बोतरीची माया,देहोत्सव यासारख्या अभंगांमधून अंधश्रद्धा,आदिम जमातीचे राहणीमान,वेशभूषा,दुःख दिसून येते.’आदिवासी बाई’ या अभंगात रानातील अवस्था व व्यथा यावर भाष्य करून जातात ,
किर्र ते जंगल ! सर्वत्र अंधार !
नाही हो आधार ! व्यवस्थेचा.!!
“कटीवर बाळ ! नाही त्याला दूध !
भाषणात मध ! दावी नेते..!!
पांडुरंग हा सर्वत्र आहे.सर्व जाती-धर्म समान असून माणुसकी अंगी बानवून समतेचे बीज हाती घेण्याचे पांडुरंग,विठ्ठल आमुचा या अभंगात कवी अभंग स्वरूपात स्पष्ट सांगतो आहे.कर्म हाच आपला देव आहे तेच जीवन जगतांना असू द्यावे.
कवी म्हणतो की,
माझे काम विठू ! माझे गाव विठू !
कैसा त्यांना गाठू ! पंढरीत..!!
आपुला हा देव ! आहे विश्वात्मक !
कर्म पुण्यात्मक ! असू द्यावे..!!
प्राचीन काळापासून प्रबोधनाचे माध्यम म्हणून अभंग काव्यप्रकार संतांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे संतांचे विचार,आचार यानुसार समाजात मनुष्याने आचरण करावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान कार्यकर्तृत्व अभंगात दाखविले गेले आहे.संत विचार,महासूर्य,कौशल्य विकास,शुद्ध जीवन,कर्म,उत्तम कर्म यासारख्या अभंगातून लोभ,वासनेचा त्याग करून शुद्ध जीवनाचा धागा अंगी बाळगावे हा उदात्त हेतू कविवर्यांनी ठेवलेला दिसून येतो. ‘संत विचार’ या अभंगात ते म्हणतात की,
“संतांचा विचार ! अमृताचा झरा !
*सत्संगाचा वारा ! सुखावेल..!!
“जग आहे तुझी ! खरी पाठशाळा
*शिक तु रे बाळा! हुशारीने..!!
संतांचा विचार म्हणजे अमृताचा झराच आहे.सत्कार्य आपल्या हातून घडेल तेव्हाच आत्म समाधान मिळू शकते.सर्व विश्व हीच पाठशाळा आहे म्हणून सावधपणे शिकण्याचा संदेश देत आहे.सदर अभंगसंग्रह समाज,निसर्ग,वृत्ती-प्रवृत्ती,शेती-नाती-मातीशी जोड असणाऱ्या कृतीवर अवलंबून असून मानवी जीवनाच्या सामाजिक जाणिवा जागृत करून देणारा एक अमृत कुंभच आहे. झाडीबोलीतील खंजरी या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर सामान्य मानवी जीवनाचे पैलू उत्तमरित्या अभंगातून उलघडून दाखविण्याची प्रतिभा कौतुकास्पद आहे . ग्रामजीवनाच्या उत्थानासाठी झटणारे हे खरे विचारवंत शोभतात. सामाजिक जाणिवाचा परीघ व्यापक करत समाजजीवनात आनंद निर्माण करणारा हा ‘आनंदभान’ अभंगसंग्रह आहे. प्रत्येकांनी वाचन करून त्यांचा भावार्थ व मतितार्थ समजून घ्यावा असे मला सांगावेसे वाटते. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची लेखणी अशीच उत्तरोत्तर अशीच बहरत जावो , ह्या शुभकामना .
पुस्तकाचे नाव : आनंदभान
कवी : बंडोपंत बोढेकर ,चंद्रपूर
प्रकाशन:शब्दजा प्रकाशन,अमरावती
मुखपृष्ठ:सुदर्शन बारापात्रे,चंद्रपूर
मूल्य:१५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.