निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी अध्यात्माचा अभ्यास करताना देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
म्हणोनि माझिया भजना। उचितु तोची अर्जुना।
गगन जैसें अलिंगना । गगनाचिया ।। ५६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ते कसें तर आकाश जसे आकाशाच्या अलिंगनास योग्य आहे.
सद्गुरूंचे, देवाचे नामस्मरण म्हणजे भजन. भक्तीची गोडी भजनाने लागते. सध्याच्या नव्या पिढीत भजनाची आवड निर्माण होणे, याची गोडी लागणे, या गोष्टी अशक्यच आहेत. नव्या पिढीला पैशाची गुर्मी आहे. सर्वच गोष्टी ते पैशाने मोजतात. भक्ती, अध्यात्म या गोष्टीही ते पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करतात; पण या गोष्टी पैशाने विकल्या जात नाहीत याची कल्पना त्यांना नाही, याचेच मोठे दुःख वाटते.
या गोष्टीचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. भगवंतांना फक्त मनाने विकत घेता येते. फक्त फूल, फळ तेही शुद्ध भावनेने दिलेले एवढेच ते स्वीकारतात. महालक्ष्मी या नावातच लक्ष्मी आहे, पण या मंदिरातही दानपेटी असते. त्यात ते दान टाकतात. काही मंदिरात, धर्मात तर दान टाकण्याची स्पर्धा असते. सर्वाधिक दान देणाऱ्यांचा सत्कारही होतो. सर्वाधिक मान पैशाने मोजला जातो. याचे लिलावही चालतात. हे अध्यात्म नाही. ही भक्ती नाही. कारण देवाला याची काहीच गरज नाही. भक्तीत याची आवश्यकता नाही. भारतीय संस्कृतीत अनेक राजांनी संन्यास घेतला अन् त्याच्या सन्यस्थ पिढीतील वंशज पुढे महान संत, योगी झाले. राजाच्या वंशजांनी कपड्याचाही त्याग केला अशा महान योगींच्या नावाने उभारलेल्या मंदिरातील मूर्ती या रत्नजडित जवाहिरांच्या असतात. हे दान देण्यासाठी स्पर्धा असते.
खरं तर, निरपेक्ष बुद्धीने दिलेले दानच भगवंत स्वीकारतात. पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी अध्यात्माचा अभ्यास करताना देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त व्हायला शिकले पाहिजे. तशी भक्ती करायला हवी. तीच खरी भक्ती आहे. तीच खरी श्रद्धा आहे. आकाश होऊनच जसे आकाशाचे अलिंगन घेता येते, तसे आत्मज्ञानी होऊनच आत्मज्ञानी संताचे भजन करावे. तीच खरी श्रेष्ठ सेवा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.