कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब, कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती
कणकवली – येथील कवी किशोर डी. कदम यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बालविश्व या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे शनिवारी ( 15 मार्च रोजी ) सायंकाळी साडे चार वाजता येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कादंबरीकार तथा कोमसपाच्या केंद्रीय कार्यकारणी सल्लागार उषा परब यांच्या हस्ते बालविश्व काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य- सांस्कृतिक कार्यकर्ते ॲड. विलास परब, कोमसापाचे वरिष्ठ कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सचिव जेष्ठ कवी विठ्ठल कदम, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
किशोर कदम हे साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील कार्यकर्ते असून निबंध आणि काव्य लेखन ते करत असतात. यापूर्वी प्रभा प्रकाशनातर्फे त्यांचे निबंध लेखनाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांचा बालविश्व हा बालकवितांचा काव्यसंग्रह प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या संग्रहाच्या सदर प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब,कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर हे बालविश्व काव्यसंग्रहाबद्दल मांडणी करणार आहेत.
बालविश्व बालकाव्यसंग्रहातील कविता किशोर कदम यांनी आजवर जपलेल्या बालविश्वाची प्रचिती देतात. साध्या सोप्या शब्दात लिहिली गेलेली ही कविता बालवाचक आणि त्यांच्या पालकांनाही प्रभावित करते. बाल मनाचे भावनिक नाते ज्या भवतालाशी जोडले गेले आहे तो भवताल बालविश्व मधील कवितेच्या केंद्रस्थानी आहे.
दुसऱ्या बाजूला बालपणाच्या जडणघडणीत ज्या निसर्गाशी आपण जोडलेले असतो तो निसर्ग आयुष्यभर सोबत कशी करतो याचा प्रत्ययही या कवितांमधून येतो. श्री कदम हे प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचे नित्याचं जगणं बाल जीवनाशीच निगडित आहे. त्यामुळे बालकांचे भावनिक विश्व त्यांनी जवळून अनुभवलेले आहे. त्याचे सखोल चिंतन बालविश्व कवितेत प्रकटलेले दिसते. तरी या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सम्यक संबोधी साहित्य संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.