सद्गुरुंनी दिलेल्या सोहम मंत्राशी एकरुपता साधायची आहे. त्याच्यात रममान व्हायचे आहे. सद्गुरुंच्या सोहमच्या श्वासात आपला श्वास जेव्हा मिळेल तेव्हा आपणासही साम्यतेची अनुभुती येईल. या अनुभुतीतून, या अनुभवातूनच भक्तीच्या रुपाने भगवंताशी, सद्गुरुंशी एकरुपता साधायची आहे. म्हणजेच सद्गुरु स्वरुप आपण व्हायचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें ।
तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ।। ५६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – अस्सल सोन्याशी तद्रुप होणे असेल तर अस्सल सोनेंच झाले पाहिजे, त्याप्रमाणें मद्रुप होऊनच माझी भक्ति करणे शक्य आहे.
भगवंताची, सद्गुरुंची भक्ती कशी करावी ? यासाठी प्रथम भक्ती म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे. भक्ती म्हणजे आपल्या इष्ट देवतेची, भगवंताची, सद्गुरुंची मनोभावे केलेली पुजा. साहजिकच यामध्ये देवाप्रती प्रेमभाव असतो. सद्गुरु काय म्हणतात ? मी ब्रह्म आहे. हे ब्रह्म सर्वात आहे. सद्गुरुंनी या ब्रह्माची अनुभुती घेतलेली आहे. ही अनुभुती सर्वांना व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. यासाठी सद्गुरुंची खरी भक्ती कशी आहे ? तर सद्गुरुंनी एकरूपता साधून त्यांच्याशी भक्ती करायची आहे. म्हणजे सद्गुरुंच्या भावरुपात त्यांची भक्ती करायची आहे.
अस्सल सोने आणि धातू मिश्रीत सोने यामध्ये मोठा फरक आहे. अस्सल सोने हे मऊ असते तर धातू मिश्रीत सोने हे कठीण असते. सोन्याचा मऊपणा, अस्सलपणा जोपासायचा असेल तर त्यात अस्सल सोनेच मिसळावे लागले. यासाठी धातू मिश्रीत सोने हे शुद्ध करावे लागेल. शुद्ध सोन्यात शुद्ध सोने मिसळले तर त्याची शुद्धता कायम राहाते. २४ कॅरेटचे सोने हे २४ कॅरेटचेच राहील. ते २२ कॅरेटचे होणार नाही. भक्ती हा एक साधना मार्ग आहे. त्या साधनेत रममान व्हायचे म्हणजे भगवंतच्या रुपाशी, भगवंताच्या श्वासाशी आपला श्वास जुळवायचा आहे. आपला श्वास जर २२ कॅरेटचा असेल तर त्यात शुद्धता करून तो २४ कॅरेटचा करायचा आहे. म्हणजेच आपली भक्ती ही खरी भक्ती असेल.
सद्गुरुंनी दिलेल्या सोहम मंत्राशी एकरुपता साधायची आहे. त्याच्यात रममान व्हायचे आहे. सद्गुरुंच्या सोहमच्या श्वासात आपला श्वास जेव्हा मिळेल तेव्हा आपणासही साम्यतेची अनुभुती येईल. या अनुभुतीतून, या अनुभवातूनच भक्तीच्या रुपाने भगवंताशी, सद्गुरुंशी एकरुपता साधायची आहे. म्हणजेच सद्गुरु स्वरुप आपण व्हायचे आहे. दोहोमध्ये फरक राहाता कामा नये. दोघेही एकच आहोत ही अनुभुती आपणास यायला हवी. अध्यात्मात गुरु जसा आत्मज्ञानी असतो तसा शिष्यही आत्मज्ञानी व्हावा शिष्याने गुरुशी ही एकरुपता साधावी असा प्रयत्न हा गुरुंचा असतो. येथे गुरुंचीही भक्ती शिष्यावर असते अन् शिष्याचीही भक्ती गुरुंवर असते. दोघांच्या भक्तीत ऐक्य जेव्हा साधले जाईल तेव्हा दोन्ही स्वरुप हे एकच असल्याची अनुभुती येईल.
देवाशी एकरुपता साधायची म्हणजे देवासारखे आपणही व्हायचे असे आहे. देवातील देवत्व हे आपल्यात उतरायला हवे. म्हणजेच देवासारखे आपले वागणे, बोलणे, चालणे असायला हवे. बाह्यरुपाशी एकरुपतेपेक्षा मात्र अंतरंगातील एकरुपतेला येथे अधिक महत्त्व आहे. अंतःरंगातून देवाशी एकरूप व्हायचे आहे. सर्व आत्मज्ञानी संत हे सारखेच आहेत. मग ते कोणत्याही जाती, वर्णाचे असोत. बऱ्याचदा अनेक भक्त असे अनुभव सांगतात की त्यांच्या गुरुंमध्ये त्यांना हे आत्मज्ञानी संत दिसले. खरेतर दोन्ही स्वरुप एकच आहेत. मग त्यात फरक तो कसला. भगवंताशी, सद्गुरुंशी एकरुपता जेव्हा आपण साधतो तेव्हा असे अनुभव येत राहातात.
सद्गुरु आणि भक्त यांच्यातील नाते हे मैत्रीचे आहे. दोन जिवलग मित्रांमध्येही अशी एकरुपता पाहायला मिळते. आपला मित्र भुकेला असेल तर दुसऱ्याला त्याची भुक समजू शकते. कारण त्यांच्यात तितके ऐक्य असते. दोघांच्या मैत्रीमध्ये असे अनुभव हे येत राहातात. न मागताही जिवलग मित्र आपल्या मित्राला काय हवे आहे हे ओळखतो. पण तशी मैत्री, तशी एकरुपता त्यांच्यात असायला हवी. आपल्या जीवलग मित्रासोबत अशी अनुभती आपणास येत राहाते कारण त्याच्याशी आपण एकरुप झालेलो असतो. सद्गुरु आणि भक्तामध्ये असे नाते उत्पन्न होते. सद्गुरुंना न सांगताही भक्ताला काय हवे आहे ते मिळत राहाते. कारण ती सद्गुरुंची शिष्यावर असलेली भक्ती असते. दोघांच्यामध्ये भक्तीमध्येही साम्य व्हावे लागते. तेव्हाच ते एकस्वरुप इतरांना दिसतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.