कोल्हापुरातील संशोधकांचे यश !!
कोल्हापूर – न्यू कॉलेज येथील प्राध्यापक डॉ. विनोद शिंपले, संशोधक विद्यार्थी सुजित पाटील व इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्टस सायन्स महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. आम्रपाली कट्टी यांनी सह्याद्री पर्वतरांगेतील पाटेश्वर डोंगर रांगेतून गारवेल कुळातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. याबाबतचे संशोधन रीडीया या आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाले आहे.
या वनस्पतीस ‘आयपोमिया सायमोसियाना’ असे नामकरण करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. इंग्लंड येथील क्यू बोटॅनिक गार्डनमधील ज्येष्ठ संशोधक डॉ. अनारीटा सायमोस यांच्या गारवेल कुळातील वनस्पतींच्या संशोधनातील विशेष गौरव करण्यासाठी या वनस्पतीस सायमोसियांना हे नाव देण्यात आले आहे.
या वनस्पतीस ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान फुले व फळे येतात. फुले पिवळ्या रंगाची असून आकर्षक दिसतात तर बिया त्रिकोणी व मुलायम केसयुक्त असतात. ही वनस्पती भारतात महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशात या राज्यातील जंगलात आढळून आली आहे.
या वनस्पतीवर मागील बारा वर्षापासून संशोधन चालू होते. या वनस्पतीचे साधर्म्य दाखवणाऱ्या इतर वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी प्रा. विनोद शिंपले यांनी सिंगापूर व पॅरिस (फ्रान्स) येथील वनस्पती उद्यानास भेट दिली व त्यानंतर यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. जवळजवळ एक तप या वनस्पतीवर संशोधन केल्यानंतर हे यश प्राप्त झाल्याने शिंपले यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रात ही वनस्पती फक्त सातारा शहराच्या पुर्वेस असणाऱ्या पाटेश्वर डोंगर रांगेवरच आढळून येते. साधारणतः ५० ते ६० वेली अस्तित्वात असल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
या संशोधन कार्यास प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे संशोधकांनी सांगितले.

Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.