समाजात जी लोक मोठी झालीत त्या सर्वांसाठी एक बाब सारखीच आहे. ती म्हणजे प्रत्येकाकडे 24 तासाचा दिवस होता. त्यांनी निर्माण केलेली संधी हीच महत्त्वाची होती.
सौ. पुष्पा सुनील वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका
पी. डी. कन्या शाळा, वरुड
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यशाकडे वाटचाल करीत असताना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पैकी येणाऱ्या आगामी वर्ग दहावी व बारावीच्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत होऊ घातलेल्या परीक्षेच्या दालनात प्रवेश करायचा आहे. त्याकरिता घ्यावयाची खबरदारी, दक्षता व काळजी याचे नियोजन करावयाचे आहे. कारण कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्याबद्दलची मानसिकता आत्मसात करावी लागेल. परिश्रमाने व साधनेने यशसिद्ध करता येते.
समाजात जी लोक मोठी झालीत त्या सर्वांसाठी एक बाब सारखीच आहे. ती म्हणजे प्रत्येकाकडे 24 तासाचा दिवस होता. त्यांनी निर्माण केलेली संधी हीच महत्त्वाची होती. ‘Time is Money’. ही शिकवण वारंवार मनाला दिली पाहिजे. परीक्षा काळात वेळेला फार महत्त्व आहे. गेलेले क्षण पुन्हा परत येणार नाही. ही सुवर्णसंधी आहे. या संधीचे सोने करा. ध्येय व सिद्धी यामध्ये आळसाचा डोंगर उभा असतो. त्याकरिता आपण आळसाला झटका. कारण ‘आळस हा माणसाचा शत्रू आहे.’ आपली इच्छाशक्ती वाढवा जिद्द, चिकाटी, संयम, परिश्रम, आत्मविश्वास व दूरदृष्टी ठेवा.
मला माझं ध्येय साध्य करायचं आहे हा मनाचा निर्धार महत्त्वाचा आहे. याकरिता नियोजन आवश्यक आहे. वर्षभरात शिक्षकाच्या अध्यापन मार्गदर्शनातून आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान याचे वारंवार पठण करणे त्याची आवर्तन व पुनरावृत्ती केल्याशिवाय स्मृती पटलावर ते कोरल्या जाणार नाही. गोंधळून न जाता हळूहळू वाचन करावे. आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता सुरुवातीला सुगमांकडून संकिरणाकडे जावे. म्हणजे आपल्याला आत्मसात होणारा भाग सुरुवातीला वाचा. सोप्याकडून कठीणकडे गेल्यास आत्मविश्वास वाढेल म्हणजे मला जमते. सुरुवातीला लक्षात राहणार नाही परंतु प्रयत्नाने स्मरणशक्ती वाढेल. यामुळे प्रेरणा, स्फूर्ती व आत्मिक समाधान लाभेल.
करत-करत अभ्यास !
जडमती होय सुजान !
व्याकरण रचियता पानीनीचा अनुभव सिद्ध झाला.
१. Impossible हा शब्द I am possible असा वाचा.
२. जर तुम्ही प्रयत्न केलात तरच तुम्ही स्वप्न साकार करू शकाल.
३. यशस्वी होण्याकरिता निष्ठा, शिस्त, निश्चय हे गुण आवश्यक असतात.
विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की मला यश मिळणारच आणि मला शक्य आहे याची सदैव चिंतन करा. चिंता करू नका. केलेल्या अध्ययनाचे चिंतन व मनन करा. वाचून झाल्यावर मनन तेवढेच महत्त्वाचे आहे. चिंतन, मनन व निदिद्यासन हे करणे गरजेचे आहे.
या सर्व अभ्यासाची तयारी करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. वेळेवर जर आपले प्रकृती स्वास्थ बिघडलं तर आपण केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या जाईल. सिमित आहार आपल्याला आवश्यक आहे. अभ्यास करीत असताना जेणेकरून सुस्ती व आळस येणार नाही याची काळजी घ्यावी. पुरेशी झोप आवश्यक आहे. एकसारखी बैठक झाल्यावर योग्य व्यायामाची देखील आवश्यकता आहे. सकाळ संध्याकाळ एकतास तरी व्यायाम, खेळ याकरिता द्या. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मोबाईलला परीक्षेपर्यंत सुट्टी द्या.
परीक्षा दालनात प्रवेश करण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता अशी-
१. वेळापत्रकाप्रमाणे कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे हे वारंवार तपासून घ्यावे.
२. आपल्या जवळ दोन पेन बाळगावे व ते व्यवस्थित चालू स्थितीत आहेत काय हे पडतळावे व कंपास पेटी सोबत ठेवावी.
३. मोबाईल असल्यास वर्गातील पर्यवेक्षकाकडे सुपूर्द करावे.
४. आपल्याजवळ पाण्याची बॉटल बाळगावी.
५. पेपरच्या तीस मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
६. फलकावर आपला आसन क्रमांक नीट पडताळून बघा म्हणजे गोंधळ होणार नाही.
७. आपले परीक्षेचे प्रवेश पत्र ( hall ticket ) अवश्य सोबत न्यावे.
८. आपला बारकोड नंबर तपासून घ्या.
९. सुवाच्चअक्षर काढण्याचा प्रयत्न करा. उत्तर पत्रिकेमध्ये जास्तीच्या सूचना लिहू नये.
या सर्व सूचनांचे पालन करून परीक्षा दालनात प्रवेश करावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खुप छान vidio विद्यार्थ्यांना प्ररेणा देणारा