February 19, 2025
Treasures of creeping fort splendor Forts of Kolhapur district
Home » रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले
मुक्त संवाद

रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

गगनगडाप्रमाणेच भुदरगड हा किल्लादेखील भक्ती मार्गातील किल्ला म्हणून ओळखला जातो; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम किल्ला म्हणून रांगणा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. या किल्ल्यावरील देवता, जंगल, तटबंदी, बुरूज यांविषयी विस्तृत माहिती वाचावयास मिळते.

अरुण बोऱ्हाडे
ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते

शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची जिल्हानिहाय माहिती देणारी पुस्तके संदीप भानुदास तापकीर यांनी लिहिली आहेत. याच मालिकेतील कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक ‘रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले’ या नावाने प्रकाशित करण्यात आले आहे.

लेखकाने दुर्गप्रेमींना मार्गदर्शक ठरावे या हेतूने प्रत्येक किल्ल्याची प्राचीन आणि ऐतिहासिक माहिती, त्याचा इतिहास, जडणघडण आणि अलीकडे झालेली पडझड विशद केली आहे. स्वतः केलेली दुर्गभटकंती शब्दबद्ध करताना त्या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग, किल्ल्यावरील अवशेष यांची माहिती आणि त्या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कुठे काय पाहावे, कुठे काळजी घ्यावी, कुठे किती वेळ लागेल हे सर्व सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्याची दोन शकले झाली. ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली करवीर राज्याची निर्मिती झाली. साहजिकच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड इत्यादी किल्ल्यांचा इतिहास ताराराणी आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांभोवती फिरतो. यापैकी पन्हाळा आणि विशाळगड या दोन किल्ल्यांची विस्तृत माहिती लेखकाने दिलेली आहे.

पन्हाळगड हा आजही एका तालुक्याचे तहसील कार्यालय म्हणून सर्वांच्या वापरात आहे. तसेच पर्यटन स्थळ म्हणूनही त्याची ओळख आहे. मात्र, या पन्हाळगडाची प्राचीन ओळख लेखकाने सांगितली आहे. ब्रह्मगिरी, प्रणालपर्वत, पन्हाळगड अशी या गडाची विविध नावे वाचताना या किल्ल्याचा त्या त्या काळातील महिमा नजरेसमोर येतो. पन्हाळगडाच्या शेजारी असलेला, मात्र फारसा परिचित नसलेला पावनगड याचा इतिहासही पन्हाळगडाशी संबंधित आहे. या गडाविषयीदेखील लेखकाने विस्तृत माहिती दिलेली आहे.

पन्हाळ्याप्रमाणेच स्वराज्याचा इतिहास विशाळगडाभोवती फिरतो. शिवछत्रपतींच्या पराक्रम आणि शौर्याशी निगडित असलेले पन्हाळा आणि विशाळगड हे दोन्ही किल्ले इतिहासप्रेमींच्या विशेष आवडीची ठिकाणे आहेत. या विशाळगडाविषयीदेखील या पुस्तकामध्ये विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय फारसे परिचित नसलेले कार्जिडा घाटातील मुडागड आणि दाजीपूर अभयारण्यातील शिवगड या वनदुर्गांची माहिती थोडक्यात देताना लेखकाने नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यातील वादाचा ओझरता उल्लेख केलेला आहे. अर्थात, या दोन्ही वनदुर्गावर उल्लेखनीय अवशेष उरलेले नाहीत.

मुळातच कोल्हापूर जिल्हा हा अधिक पावसाचा, सह्याद्रीच्या डोंगररांगांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलेला परिसर असल्याने कोणत्याही डोंगरमाथ्यावर गेले, तरी नजरेला आनंददायी निसर्ग पाहावयास मिळतो. ऐतिहासिक कारणापेक्षा धार्मिक किंवा भक्ती मार्गातील किल्ला म्हणून गगनगडचा उल्लेख केला जातो. गगनगडाप्रमाणेच भुदरगड हा किल्लादेखील भक्ती मार्गातील किल्ला म्हणून ओळखला जातो; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्तम किल्ला म्हणून रांगणा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. या किल्ल्यावरील देवता, जंगल, तटबंदी, बुरूज यांविषयी विस्तृत माहिती वाचावयास मिळते.

या पुस्तकात लेखकाने काही पर्यटनक्षेत्रांचाही ओझरता उल्लेख केलेला आहे. पाटगावातील मौनी महाराजांचा मठ, ज्याचा संबंध खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि मौनी महाराजांच्या भेटीशी आला होता, त्याचीही माहिती या पुस्तकात दिलेली आहे. चार-पाच विहिरींचे संकुल असलेल्या सामानगडाची माहिती देताना लेखकाने आपल्याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेसरी येथील स्मारकाविषयीचीही माहिती दिली आहे. ती वाचून नेसरीची खिंड डोळ्यांसमोर उभी राहते. कोणतेही विशेष अवशेष शिल्लक नसलेला चंदगड तालुक्यातील गंधर्वगड, तसेच महिपालगड, कलानिधीगड, पारगड या किल्ल्यांविषयी लेखकाने थोडक्यात माहिती देताना आख्यायिका आणि काही इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचबरोबर या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ किल्ल्यांची माहिती किंवा इतिहास न सांगता अलीकडे काही संस्थांनी केलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्याची माहितीदेखील लेखकाने आवर्जून सांगितली आहे. पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण आणि गडसंवर्धन यांचे महत्त्व लेखकाने विशद केले आहे. पुस्तकामध्ये महिपालगड, कलानिधीगड, विशाळगड, गगनगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांची रंगीत छायाचित्रे लक्ष वेधून घेतात. ‘रांगड्या दुर्गवैभववाचा खजिना’ या नावाने असलेल्या या कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. विविध किल्ल्यांतील काही अवशेषांची छायाचित्रे आपले लक्ष वेधून घेतात.

हे पुस्तक म्हणजे ‘गाईड बुक’ आहे. हे पुस्तक सोबत ठेवल्यास आपण कोणताही किल्ला बारकाईने पाहू शकतो, समजून घेऊ शकतो म्हणूनच इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर हे निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.

पुस्तकाचे नाव – ‘रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना : कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले’
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स
किंमत – १९५ रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading