March 5, 2024
Home » गारवेलच्या नव्या प्रजातींचा शोध
संशोधन आणि तंत्रज्ञान

गारवेलच्या नव्या प्रजातींचा शोध

आयपोमोईया अर्थात गारवेल जैवविविधतेच्या दृष्टिने महत्त्वाची समजली जाणारी ही वनस्पती. या वनस्पतीवर अनेक किटक उपजिविका करतात. त्यामुळे ही वनस्पती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो. यासाठी संशोधकांनी या वनस्पतींच्या प्रजातींचा शोध घेतला. या संदर्भातील लेख…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

गारवेलच्या (आयपोमोईया) सुमारे 58 प्रजातींची नोंद भारतात केली गेली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत न्यू कॉलेजमधील डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. आम्रपाली कट्टी यांनी यावर संशोधन केले. डॉ. शिंपले आणि डॉ. कट्टी यांनी संशोधनामध्ये प्रामुख्याने आफ्रिकेच्या जंगलात आढळणाऱ्या तीन प्रजातींची नव्याने नोंदणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट या संशोधनासाठी अर्थसहाय्य केले. 

मराठवाड्यातील पैठणमध्ये आयपोमोईया टेन्युपेस, गुजरातमधील बलसाडमध्ये अकॅन्थोकारपा ही दुसरी, तर कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात नंदी हिल्स या डोंगररांगांत फल्विकाऊलिस ही तिसरी प्रजाती आढळल्याची नोंद डॉ. शिंपले व डॉ. कट्टी यांनी केली आहे. यामध्ये नंदी हिल्समधील प्रजातीस मार्चमध्ये, तर इतर जातींना डिसेंबरपर्यंत फुले येत असल्याचे आढळले. 

आयपोमोईया लॅक्‍सिफ्लोरा ही प्रजाती उत्तर भारतात आढळते. ही भारताशिवाय अन्यत्र कोठेच आढळत नाही. भारतात आढळणाऱ्या 58 प्रजातींपैकी सुमारे 40 प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. यातील काही प्रजाती प्रदेशनिष्ठ असून ठराविक प्रदेशातच त्या वाढतात. त्यामध्ये आयपोमोईया लॅक्‍सिफ्लोरा, क्‍लार्की, डायव्हर्सिफोलिया, सालसेटेन्सिस, डेक्कना व्हरायटी लोबाटा आदींचा समावेश आहे. आयपोमोईयाच्या दुर्मिळ प्रजातीमध्ये असारिफोलिया, मोम्बास्साना, म्युल्लेरी, रुबेन्स, लाक्‍युनोसा आणि टेन्युपिस यांचा समावेश होतो. या प्रजाती संपूर्ण भारतात एक किंवा दोन ठिकाणीच सापडतात. 

गारवेलचे महत्त्व 

1. आयपोमोईया (गारवेल)मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आयपोमोईया मोरेसियाना यामध्ये ऍन्टिडायबेटिक गुणधर्म आहेत. त्याच्या मुळांचा उपयोग हर्बल मेडिसिनमध्ये केला जातो. यामध्ये ऍन्टिमायक्रेबेल गुणधर्म आहेत. संसर्गजन्य जीवाणूंच्या नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होतो. 
2. आयपोमोईया स्पेसकॅपरी ही वनस्पती समुद्रकिनारी आढळते. समुद्राच्या लाटांमुळे जमिनीची धूप होते; पण ही वनस्पती धूपप्रतिबंधक म्हणून कार्य करते. तिची मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. 

जैवविविधतेमध्ये महत्त्व 

संशोधकांच्या मते, गारवेलच्या काही प्रजाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला मोठा धोका पोहोचू शकतो. फळातील रस शोषणाऱ्या कीटकांचे (कॅटरपिलर) जीवनचक्र या वनस्पतीवर अवलंबून आहे. ही वनस्पती नष्ट झाल्यास हे कीटकही नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच भुंगे, मुंग्या, बिट्‌स, मधमाशाही यावर अवलंबून आहेत. त्यांचेही जीवनचक्र धोक्‍यात येऊ शकते.

 विषारी गुणधर्म आयपोमोईया कारनिया किक्‍युलर (बेशरम किंवा गारवेल) ही वनस्पती विषारी आहे. या वनस्पतीच्या चिकात विषारी गुणधर्म आहेत. आयपोमोईया असारीफोलिया या वनस्पतीची पानेही विषारी आहेत. शेळी, मेंढी, डुक्कर यांनी ही पाने खाल्ल्यास त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. तर आयपोमोईया ट्रायलोबा हे उसाच्या शेतात तण म्हणून आढळते. 

मॉर्निंग ग्लोरी असेही टोपणनाव 

ही वेलवर्गिय वनस्पती असून त्यांना आकर्षक फुले येतात. म्हणून त्यांचा उपयोग शोभेची झाडे म्हणून सुद्धा होतो. या प्रजातींना मॉर्निंग ग्लोरी असे टोपणनाव आहे कारण यांची फुले पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत उमलतात आणि दुपारी बारा वाजता सुकतात. पहाटे फुले उमलण्याची प्रक्रिया खूप प्रजातींमध्ये पहावयास मिळते, पण काही प्रजातींची फुले रात्री उमलतात. त्या प्रजाती I. aculeata, I. alba, I. violacea, I. salsettensis, I. involucrata आणि I. kotschyana या होत. रात्री उमलणाऱ्या प्रजातींची फुले मुख्यत्वे पांढरी आहेत, पण I. involucrata आणि I. kotschyana प्रजातींची फुले गुलाबी रंगाची आहेत. 

नोंदविण्यात आलेल्या काही प्रजाती 

1. I. salsettensis प्रजाती मुंबईच्या सालसेट द्विपावर 1958 नोंद, 2016 मध्ये राजापूर (रत्नागिरी) मध्येही आढळल्याची नोंद. 
2. I. aculeata आणि I deccana var. lobata या प्रजातींचा आढळ गोवा राज्यात. 
3. समुद्र किनारी आढळणाऱ्या प्रजाती I. violacea, I. pes-caprae, I. littoralis 
4. I. kotschyana गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील वालुकामय प्रदेशात. 
5. I. tenuipes, I. tuberculata या उष्ण व कमी पाण्याच्या ठिकाणी.

Related posts

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

…यासाठीच नको विदेशी वृक्षांची लागवड

Leave a Comment