‘एलियन आला स्वप्नात’ हा आगळावेगळा आणि अद्भूतरम्य असा, बालवाचकांना निरामय आनंद देणारा कवितासंग्रह आहे. शब्दांच्या करामती, रंजकतेचा ध्यास, आनंदाची पेरणी व जिज्ञासातृप्ती करणारी भावाभिव्यक्ती या कवितेत आहे.
डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर.
मो. 9834342124
‘मनी ठसे ते स्वप्नी दिसे’ अशी एक म्हण आहे. जे विचार, कल्पना, गोष्टी दिवसभर आपल्या मनात येतात, ठाण मांडून बसतात, त्यांचाच आविष्कार रात्री स्वप्नात दृष्टीस पडतो. दिवसा आपण जे पाहतो, ऐकतो, मित्रमैत्रिणींशी संवाद करतो, त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे, प्रभाव हा स्वप्नावर होतो, असा मानसशास्त्रीय निष्कर्ष आहे. हाच धागा पकडून डॉ. सुरेश सावंत यांनी सप्तरंगी, आकर्षक चित्रांनी बोलका केलेला आणि विषयवैविध्याने नटलेला ‘एलियन आला स्वप्नात ‘ हा बालकवितासंग्रह साकारलेला आहे.
डॉ सुरेश सावंत हे मराठी बालसाहित्याला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. बालसाहित्यातील कथा, कविता आणि कादंबरीची द्वारे त्यांनी आपल्या सशक्त लेखणीने बालचमुसाठी खुली केलेली आहेत. अध्यापन हे सेवाव्रत मानून मुलांच्या जीवनात आनंद पेरण्याबरोबरच त्यांची प्रबोधनाची भूक व जिज्ञासातृप्ती करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य त्यांनी अतिशय तन्मयतेने आणि निष्ठेने केलेले आहे. मुलांचे भावविश्व लक्षात घेऊन कल्पनेची स्वैर भरारी मारत असताना शब्दवैभवाची झलक त्यांच्या कवितांच्या उद्यानामध्ये पाहावयास मिळते. ‘एलियन आला स्वप्नात’ हा असा आगळावेगळा, मुलांना माहिती देणारा, त्यांच्या ज्ञानात भर घालणारा, त्यांना कल्पनेच्या जगात स्वैर विहार करायला लावणारा व त्यांच्या मनातील शंकांना पूर्णविराम देणारा देखणा बालकवितासंग्रह आहे.
परग्रहवासीयांविषयी नेहमीच आबालवृद्धांच्या मनात कुतूहल राहिलेले आहे. आज इंटरनेट, टीव्ही आणि मोबाईलमुळे ज्ञानाची कवाडे खुली झालेली आहेत. त्यामुळेच एलियन विषयीची माहिती, ऐकीव कथा, त्यांचे दिसणे याबाबत मुलांमध्ये प्रचंड कुतूहल व भीतीचा भाव आहे. एलियनला प्रत्यक्षात आपण कुणीच पाहिलेले नाही. तोच एलियन स्वप्नात येऊन मुलाशी गुजगोष्टी करतो आहे. तो आकाशमार्गे येऊन आपल्या सरकारला भूतलावरील गुप्त माहिती पुरवितो आहे. एक प्रकारे तो परग्रहावरील गुप्तहेरच आहे. पण येथे मात्र तो कवितेतील लहानग्याला चंद्रावर येण्याचे प्रेमाने आमंत्रण देतो आहे:
‘एलियन माझ्या स्वप्नात आला
मला म्हणाला, ‘चल रे भाऊ,
एका जागी कंटाळला आहेस
छानपैकी चंद्रावर फिरून येऊ’.
प्राणी, पक्षी, फुले, फळे म्हणजेच जल, जीव आणि जंगल असे व्यापक अवकाश या संग्रहातील कवितांतून डॉ. सुरेश सावंत यांनी व्यापलेले आहे. डायनॉसोर नामशेष झाले असले तरी, त्याची बहीण आपले अस्तित्व टिकवून आहे. तिचा आहार- विहार आणि दिसणे असे सगळेच बारकाईने कवीने ‘डायनॉसोरची बहीण’ या कवितेत टिपलेले आहे. जिराफदादाचा पूर्वेतिहास काव्यबद्ध करून त्याची शिकवण मुलांना सांगितली आहे.
‘सर्वात उंच प्राण्याकडून ह्या
तुम्ही आम्ही शिकायचे काय?
डोके आभाळाला भिडले तरी
जमिनीवरच असावेत पाय’.
काझिरंगा अभयारण्यातील एकशिंगी गेंडा, गाढवाचा शहाणपणा, काटेरी साळिंदराची स्वसंरक्षक शरीररचना, मुंगूसमामा, पट्टेवाला तरस याही कविता प्राणीवैशिष्ट्ये सांगणाऱ्या, त्यांच्या उपजत गुणांचा परिचय करून देणाऱ्या आहेत.
सागराला थांग नाही. तो अथांग आणि अमर्याद आहे. त्याच्यात असणाऱ्या जलजीवांविषयी मुलांना नेहमीच उत्सुकता राहिली आहे. त्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती कवीने आपल्या कवितेतून दिलेली आहे. ‘पेंग्विनदादा’ ह्या कवितेत आपणास कवीच्या अफाट निरीक्षणशक्तीचा व कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो.
‘पेंग्विनदादा पेंग्विनदादा
चोचीवर रंगीबेरंगी नक्षी
खरंच सांगा पेंग्विनदादा,
तुम्ही प्राणी आहात की पक्षी?’
अगडबंब व्हेल अर्थात देवमाश्याच्या हालचाली, सवयी व खोडकरपणाचा उहापोह करणारी ‘देवमासा’ ही कविता, सागरकिनारी अंडी घालणारा व शर्यतीत सशाला हरवणारा कासव याबाबतची इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण माहिती कवी आपल्या कवितांतून देतो आहे.
मुलांना नेहमीच पक्ष्यांचे आकर्षण राहिलेले आहे. हे पक्षी मुलांच्या अनुभव कक्षेतील आहेत. यातील मोर मुलांना ‘मामाच्या मळ्यात’ या कवितेत भेटतो.
‘मामाच्या मळ्यात
कष्टाला येतो रंग
पिसारा फुलवून
मोर नाचण्यात दंग’.
फळांच्या बागेत पक्ष्यांचे थवे, त्यांच्या हालचाली, करामती, आहारविहार, दंगामस्ती यांचे चित्रण करून मुलांना राघूदादाची चांगली ओळख कवी करून देतो. पावशा पक्षी, घुबड, बुलबुलचं घरटं, हॉर्न बिल या कविताही पक्षीनिरीक्षण, पक्षीवर्णन या अंगाने पक्षीजगताची ओळख करून देतात.
मुलांच्या जडणघडणीत शाळा माऊलीचे खूप मोठे योगदान आहे. खेळाच्या तासाची तक्रार, त्याच्यावर होणारा अन्याय व त्याची आवश्यकता कवी पटवून देतो. एक प्रकारे मुलांची इच्छा ओळखून त्यांची तृप्ती करतो. तसेच मुख्याध्यापकांची सहमती घेऊन खेळाच्या तासाचे समाधानही कवी करतो.
‘आठव्या तासाची तक्रार ऐकून
मुख्याध्यापक सहमत झाले
शाळा सुटल्याची घंटा वाजली
मैदान आनंदाने फुलून गेले’.
याशिवाय जांभयांची साथ आली, बालवाडी आनंदवाडी याही कविता मानवी सवयी, आनंद आणि उल्हासावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
एकंदरीत ‘एलियन आला स्वप्नात’ हा आगळावेगळा आणि अद्भूतरम्य असा, बालवाचकांना निरामय आनंद देणारा कवितासंग्रह आहे. शब्दांच्या करामती, रंजकतेचा ध्यास, आनंदाची पेरणी व जिज्ञासातृप्ती करणारी भावाभिव्यक्ती या कवितेत आहे. यातील विषय, आशय आणि विचार भावसौंदर्याने नटलेले असल्यामुळे येथे काव्यसौंदर्याची लयलूटच पाहावयास मिळते. अतिशय नेटका, देखणा व आशयाभिव्यक्तीने नटलेला सुंदर कवितासंग्रह साकारल्याबद्दल डॉ. सुरेश सावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुस्तकाचे नाव – ‘एलियन आला स्वप्नात’ (बालकवितासंग्रह)
कवी : डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे.
मुखपृष्ठ आणि सजावट : पुंडलिक वझे
आर्ट पेपरवरील रंगीत छपाई पृष्ठे ५६
किंमत रु. ३६०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.