September 17, 2024
Discussion of Ajit Pawar's party
Home » चर्चा अजित पवारांच्या पक्षाची…
सत्ता संघर्ष

चर्चा अजित पवारांच्या पक्षाची…

गेल्या निवडणुकीत अजित हे त्यांच्या पुत्राला मावळमधून निवडून आणू शकले नव्हते, यंदा पत्नीला बारामतीतून निवडून आणू शकले नाहीत. नंतर आठवडाभरातच पत्नीला राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी बिनविरोध पाठवले. महाराष्ट्राचे सत्ताकारण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभोवती फिरत आहे. यात अजित पवार कुठे आहेत ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी आपण तेव्हा वेषांतर करून जात होतो, तोंडावर मास्क व डोक्यावर टोपी घालून आपण विमान प्रवास केला, असा गौप्यस्फोट स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच आपल्या दिल्ली भेटीत केला. दुसरीकडे तुम्हाला अपात्र का ठरवू नये, अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाला दिली आहे. म्हणूनच न्यायालयाच्या निकालानंतर व विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पक्षाचे भवितव्य काय, याची राजकारणात मोठी उत्सुकता आहे.

ठाकरे सरकार हटवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षं उलटली. गेल्या वर्षी जून महिन्यात अजित पवारांनी त्यांच्या काकांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ आमदारांसह ते महायुतीत सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात अनेकांना, झाले ते बरे झाले असे काही काळ वाटले. पण अजित पवारांनी शरद पवारांना आव्हान देण्याचे जे धाडस दाखवले, त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले. काकांनी ज्यांना राजकारणात मोठे केले, सत्तेच्या पदांवर संधी दिली, मग पुतण्याने त्यांच्याविरोधात बंड का करावे ? या प्रश्नाने अनेकांची मती गुंग झाली. भाजपने त्यांना बरोबर घेण्याची गरजच काय होती, या प्रश्नानेही राज्यात काहूर निर्माण झाले. भाजप श्रेष्ठींचे आशीर्वाद व संरक्षण असल्याशिवाय शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन ताकदवान प्रादेशिक पक्षात उभी फूट पडणे शक्यच नव्हते. ज्यांनी या बंडाचे नेतृत्व केले, त्यांचे भाजपने भले केले. ए

कनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवून नव्या मित्रांचा आपण कसा सन्मान करतो हा संदेश भाजपने देशभर दिला. अजित पवार यांचेही भाजपने लाल गालिचा घालून स्वागत केले. त्यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद दिले व प्रतिष्ठेचे समजले जाणारे अर्थ मंत्रालयही सोपविण्यात आले. अजितदादांच्या बरोबर सरकारमध्ये आलेल्या छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, धर्मरावबाबा अत्राम आदी मंत्र्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली. शरद पवारांना शह देण्यासाठीच भाजपाने अजितदादांना ताकद दिली हे काही लपून राहिलेले नाही.

राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर विधानसभेत बहुमत मिळवू शकत नाही, याची जाणीव सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना व त्यांच्या प्रमुखांना आहे. महाआघाडी असो किंवा महायुती हे जनसेवेसाठी ते एकत्र आलेले आहेत की, स्वत:च्या अस्तित्वासाठी, याचा कौल निवडणुकीत बघायला मिळतो. आघाडी किंवा युती दोघांचे नेते जनकल्याणाच्या लंबे लंबे गप्पा मारतात, राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज असताना महिला, सुशिक्षित युवक, ज्येष्ठांना खिरापती वाटतात. पण निवडणुकीतील जागा वाटपापासून ते तोडफोड करून सरकार स्थापन करेपर्यंत, सरकारमधील मलईदार खाते वाटपापासून ते मतदारसंघ विकास निधी खेचून घेण्यापर्यंत, एकमेकांचे फोन कॉल्स टेप करण्यापासून ते व्हीडिओ क्लिप जाहीर करू अशा धमक्या देण्यापर्यंत सर्व खेळ चालू असतात. सत्तेच्या परिघात सतत राहण्यासाठी युती व आघाड्यांचा खो खो व हूतूतू कसा चालू असतो हे महाराष्ट्राने गेल्या साडेचार वर्षांत अनुभवले आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत महायुतीत सर्व अलबेल आहे असे वातावरण होते. महाराष्ट्रात सर्व ४८ जागा जिंकणार अशा वल्गना भाजपाचे काही नेते करीत होते, काही जण सावध म्हणून ४५ चा आकडा सांगत होते. प्रत्यक्षात महायुतीचे १७ खासदार निवडून आले. महायुतीला हा एक मोठा धक्काच बसला. महायुतीत एकोपा नव्हता, फाजिल आत्मविश्वास नडला की, जनमानस काय आहे याचा नीट अंदाज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना घेता आला नाही? सर्वात मोठे नुकसान झाले ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला. जोपर्यंत निवडणूक नव्हती तोपर्यंत एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची झाकली मूठ होती. शिंदेंच्या पक्षाचे सात खासदार तरी निवडून आले. पण सुनील तटकरे वगळता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इतरत्र दारूण पराभव झाला. तटकरे हे मोठे कलाकार आहेत, मुत्सद्दी आहेत. ते स्वत:च्या व्यवस्थापन कौशल्यावर निवडून आले आहेत. अजितदादांनी हट्टाने त्यांच्या पत्नी सुनेत्रांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून उभे केले, अजित पवारांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. त्यांनी एक प्रकारे शरद पवारांच्याच नेतृत्वाला बारामतीच्या गडावर आव्हान दिले. अजित पावारांनी सर्व काही पणाला लावले. पण सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्या.

गेल्या निवडणुकीत अजित हे त्यांच्या पुत्राला मावळमधून निवडून आणू शकले नव्हते, यंदा पत्नीला बारामतीतून निवडून आणू शकले नाहीत. नंतर आठवडाभरातच पत्नीला राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी बिनविरोध पाठवले. महाराष्ट्राचे सत्ताकारण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभोवती फिरत आहे. यात अजित पवार कुठे आहेत ? अजित पवार हे कुशल प्रशासक, रोखठोक बोलणारे, दिलेली वेळ अचूक पाळणारे, काम होणार असेल तर होणार आणि नसेल होणार तर नाही असे स्पष्ट सांगणारे, कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणारे, लोकांमध्ये – गर्दीमध्ये मिसळणारे आणि आपल्याकडून झालेली चूकही मिष्किलपणे सांगणारे अशी त्यांची प्रतिमा आहे. मग लोकसभा निवडणुकीत ते व त्यांचा पक्ष कुठे कमी पडला ? ते प्रचारासाठी जास्त काळ बारामतीत गुंतून राहिल्याने पक्षाच्या अन्य उमेदवारांना वेळ देऊ शकले नाहीत का ? अजित पवार यांचा स्वभाव कोणाच्या पुढे – पुढे करणारा नाही, आपल्या भाषणात ते वरिष्ठांवर उगीचच स्तुतिसुमने उधळताना दिसत नाहीत. काकांच्या बरोबर असतानाही ते शरद पवारांच्या नावाची माळ ओढत नव्हते, आता भाजपाबरोबर आलेत म्हणून मोदी-शहांच्या पुढे-पुढे करताना दिसत नाहीत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप किंवा संघ परिवारातून जे नाराजीचे सूर उमटले, त्यात अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने कशाला बरोबर घेतले, असा आक्षेप ध्वनित झाला. लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कसर अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत भरून काढायची आहे. राज्यात येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक अपेक्षित असल्याने महायुतीत जागा वाटपावरून आतापासूनच दावे करण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या वाट्याला किती जागा येणार व महायुतीत त्यांच्या पक्षाला किती महत्त्व दिले जाणार हा कळीचा मुद्दा आहे. जागा वाटपात पक्षाला भरीव वाटा मिळावा यासाठीच त्यांनी अमित शहांकडे आग्रह धरला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीतीतील वाटपात ८० ते ९० जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात असा पक्षांतर्गत दबाव आहे. जागा वाटपात सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे निर्विविवाद आहे.

भाजप १५० ते १६० जागा लढवू शकेल असा अंदाज आहे. उर्वरित जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना वाटून दिल्या जातील. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातूनही १०० जागांची मागणी पुढे रेटली जात आहे. महायुतीतील जागा वाटपात जास्तीत जास्त जागा खेचून घेण्यासाठी अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पुण्यात भाजपच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच परिषद झाली. सहा हजार प्रतिनिधी त्याला हजर होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. निवडणूक प्रचाराचा अजेंडाच जाहीर केला. (१) शरद पवार हे देशाच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी असून ते भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत, राज्यातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले. (२) कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या मांडीवर बसून स्वत:ला बाळासाहेबांचे वारस म्हणविणारे उद्धव ठाकरे, हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. (३) काँग्रेसने निवडणुकीत संविधान बदलण्याचा अपप्रचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या काँग्रसने त्यांचा जेवढा अपमान केला तेवढा इंग्रजांनीही केला नव्हता.अमित शहा यांनी महाआघाडीला टार्गेट करताना तिन्ही पक्षांवर हल्ले चढवले. पण त्यांचा धारदार व प्रखर हल्ला हा शरद पवारांवर होता. विशेष म्हणजे, पवारांना भ्रष्टाचाराचे म्होरके म्हटल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून हूं की चू… झाले नाही. पवारांवरील वैयक्तिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला आवडत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता. आता अमित शहा, पवारांना भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके म्हणालेत. अशा वक्तव्यातून शरद पवारांना सहानुभूती मिळू शकते व त्याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो. भाजपबरोबर आल्यामुळे अजित पवार काहीसे बदलले आहेत. यंदा त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तुकोबाचा अभंग आहे. व्हीडिओ क्लिपच्या माध्यमातून संपर्कही चालू आहे. आपल्यावर झालेला एकही आरोप सिद्ध झाला नाही, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळते हे वास्तव आहे. पण अजितदादांनी संवाद लाडक्या बहिणींसोबत, हा कार्यक्रम घेऊन आपला वाढदिवस साजरा केला.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

केवळ आदिवासी व्यक्तींच्याच भूमिका असलेला भारतातील पहिलाच चित्रपट “धाबरी कुरुवी”

‘संत विचार पिठाची’ स्थापना पुढील काळात ऐतिहासिक ठरावी

जाणून घ्या, लसूण लागवडीबद्दल…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading