महाराष्ट्राची दुर्गपंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले
दुर्ग हे केवळ हौसे-मौजेची ठिकाणे नव्हेत; तर आपल्या जगण्याची ऊर्मी आहेत. गडकोटांचा हा वारसा काही हजार वर्षांचा असला, तरी शिवकालाने आपल्याला पुन्हा एकदा त्या वारशाची जाणीव करून देत तो आपल्या नसानसांत भिनवला आहे. म्हणूनच आपली पावले तिकडे वळतात, तेव्हा आपण आपल्याच पूर्वजांच्या पाऊलखुणांवर पाऊल टाकतोय, ही जाण मनी असायला हवी.
अॅड. मारुती गोळे, पिरंगुट
(सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान)
इतिहास आणि भूगोल केवळ त्या-त्या प्रदेशाचीच नव्हे, तर माणसांच्या घडणुकीची, त्यांच्या संस्कारांची आणि त्यांच्या गेल्या काही पिढ्यांवर पडलेल्या प्रभावाचीच ओळख सांगतो. सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर या दुर्गचौकडीचे नाव घेतले, तरी ‘स्वराज्य’ ही संकल्पना या शिलेदारांच्या अंगाखांद्यावर रुजत तिचा वटवृक्ष कसा झाला, हे इतिहासाची पाने आपल्याला सांगू लागतात. महाराष्ट्राच्या ज्या-ज्या भागाला शिवछत्रपतींची चरणधूळ लाभली, ती-ती ठिकाणे म्हणूनच आपल्यासाठी तीर्थक्षेत्रे. नाशिक म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते गडकोटांतले सर्वोच्च स्थान, अर्थात साल्हेर. महाराष्ट्रातला सर्वांत उंचीचा गड. सालोटा, मुल्हेर, मोरा, हरिहर, इंद्राई, राजदेहेर अशा अवशेषसंपन्न दुर्गांची मालिका या जिल्ह्याला लाभली आहे.
नाशिक जिल्ह्याचा प्रत्येक तालुका दुर्गांचा इतिहास सांगणारा आहे. नाशिक परिसरात लहान-मोठे अनेक दुर्ग आहेत. सातपुडा, सेलबारी-डोलबारी या परिघातले हे गडकोट वैशिष्ट्यपूर्ण रचनेनं आपल्या मनाचा ठाव घेतात. इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदलेल्या घटनांचा विचार केला, तर साल्हेर परिसरात मुघलांसोबत शिवछत्रपतींनी कांचनबारीजवळ (जिचा वणी-दिंडोरीची लढाई असा उल्लेख होतो) खुल्या मैदानात दिलेली लढाई आपल्या पराक्रमाची साक्ष देणारी आहे. आभाळाला भिडलेल्या साल्हेर-सालोट्यानं हे कवतिक आपल्या डोळ्यांनी न्याहाळत ‘राजा खासा घोड्यावर बैसून बख्तर, घुगी घालून, हाती पट्टे चढवून’ लढताना पाहिलेल्या आपल्या राजाची दृष्ट काढली असेल… कांचनानं कृतार्थतेनं राजाची छबी डोळ्यांत साठवली असेल. हे सुरतेच्या छाप्यानंतर घडलेले आहे, याची याद आपण ठेवायला हवी.
हरिहरगडाच्या पायऱ्यांचे कौतुक नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. धोडपची वैशिष्ट्यपूर्ण रचना, त्याची माची आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड केल्यावर आपल्याला नाशिकमधले इतरही गडकोट खुणावू लागतील. त्र्यंबकगड-दुर्गभांडार पाहताना, प्रदक्षिणा करताना आपण इतिहासात हरवून जाऊ. जालन्याकडून स्वराज्यात येताना पट्टा ऊर्फ विश्रामगडावर विसावलेल्या शिवरायांनी या अवघ्या जागेलाच धन्य केले. बहिर्जी आणि राजे हे द्वैत पाहताना पट्टागडाचे डोळेही नक्कीच भरून आले असतील… असे किती नि काय काय सांगावे… नाशिकपासून थोडक्या अंतरावर असलेल्या रामसेजने औरंगजेबाशी शंभूछत्रपतींनी दिलेल्या चिवट लढ्याची गाथा अजरामर केली आहे. रामसेजच्या त्या पराक्रमाची, किल्लेदाराची, त्या मावळ्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आपण जायला हवे. आता कुठे प्रकाशझोतात येऊ लागलेला कण्हेरगड म्हणजे रामजी पांगेरा या पराक्रमी वीराचे स्मारकच. चौल्हेरही राजांनी जिंकल्याचे उल्लेख मिळतात. त्यांचे पाय या दुर्गाला लागले असतील काय?
म्हणूनच दुर्ग हे केवळ हौसे-मौजेची ठिकाणे नव्हेत; तर आपल्या जगण्याची ऊर्मी आहेत. गडकोटांचा हा वारसा काही हजार वर्षांचा असला, तरी शिवकालाने आपल्याला पुन्हा एकदा त्या वारशाची जाणीव करून देत तो आपल्या नसानसांत भिनवला आहे. म्हणूनच आपली पावले तिकडे वळतात, तेव्हा आपण आपल्याच पूर्वजांच्या पाऊलखुणांवर पाऊल टाकतोय, ही जाण मनी असायला हवी. ती चिमूटभर माती भाळी रेखत आपण या दुर्गांना अभिमानाने मुजरा करायला हवा.
दुर्गमित्र संदीप भानुदास तापकीर यांनी पट्टा रांग, नाशिक उपरांग, त्रिंबक रांग, सातमाळा, चणकापूर, डोलबारी, सेलबारी, दुंधेश्वर, गाळणा टेकड्या अशी विभागणी करत या दुर्गवैभवाची ओळख करून दिली आहे. साठएक गडांचा जागरच त्यांनी मांडला आहे. सह्याद्रीचा भुत्या होत माहितीचा हा येळकोट गर्जला आहे. नव्या पिढीने हीच तळी उचलून धरायला हवी. कोणत्या गडावर केव्हा जावे, कुठे मुक्काम करावा, पाण्याचे स्रोत, गडाची वैशिष्ट्ये, घेऱ्यातून त्यावर येणाऱ्या वाटा या सगळ्यांचे वर्णन या दुर्गमावळ्याने तन्मयतेने केले आहे. इतिहासात प्रसिद्ध झालेल्या गडकोटांसह काही आडवाटेवरचे, काही वाटेपासून जवळ असूनही अनेकांना परिचित नसलेले दुर्ग यात आपल्या भेटीला येतील. दुर्गभ्रमंती हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी शिवछत्रपतींचाच हात पाठीवर हवा. ती तन्मयतेने मांडणे हे आणखी पुढचे पाऊल. या दुर्गसेवेसाठी संदीप तापकीर यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. आपण या परिश्रमांची योग्य दखल घेत ती रुजू करायला हवी. आणिक काय लिहावे… जय भवानी, जय शिवराय… स्वराज्यसंकल्पक महाराज शाहजीराजे आणि आई जिजाऊसाहेब यांना मुजरा…
अॅड. मारुती गोळे, पिरंगुट
(सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान)
पुस्तकाचे नाव – महाराष्ट्राची दुर्ग पंढरी – नाशिक जिल्ह्यातील किल्ले
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
किंमत – ४५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9168682201, 9168682202
पुस्तकाच्या खरेदीसाठी लिंक –
https://vishwakarmapublications.com/product/maharashtrachi-durgpandhari-nashik-jilyatil-kille/
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.