September 9, 2024
Narendra Modi Speech on centrian festival of Matrubhoomi Newspaper
Home » प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी
काय चाललयं अवतीभवती

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

‘मातृभूमी’ वृत्तपत्राच्या शतकमहोत्सवी वर्ष समारंभाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

मातृभूमी चे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. श्रेयांस कुमार, संपूर्ण चमू आणि मातृभूमीचे वाचक तसेच मान्यवर अतिथी,

नमस्कारम् !

मातृभूमीच्या शतक महोत्सवी वर्षाचा आज शुभारंभ होत असतांना या कार्यक्रमात आपले विचार मांडण्याची संधी मला मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे. या निमित्त, या वृत्तपत्राशी संबंधित सर्व लोकांना माझ्या शुभेच्छा ! या आधी देखील ज्यांनी, या प्रसार माध्यम समूहासाठी आपले योगदान दिले, त्या सर्वांचे मी या निमित्ताने स्मरण करतो. मातृभूमी, या वृत्तपत्राशी आजवर अनेक दिग्गजांनी योगदान दिले आहे. श्री के. पी. केशव मेनन, के. ए. दामोदर मेनन, केरळचे गांधी समजले जाणारे, श्री के  केलप्पन आणि कुरूर नीलकंठन नंबुद्रिपाद या सगळ्यांनी हे वृत्तपत्र नावारुपाला आणले.  मला यावेळी, एम.पी, विरेन्द्र कुमार यांचा विशेष उल्लेख करायला आवडेल कारण त्यांच्याच काळात, मातृभूमीचा अत्यंत जलदगतीने विकास झाला. आणीबाणीच्या काळात, त्यांनी देशाची लोकशाही मूल्ये जपण्यासाठी केलेले परिश्रम आपण कधीही विसरू शकत नाही. ते अत्यंत उत्तम वक्ते, विद्वान आणि अतिशय ध्येयासक्त आणि पर्यावरणवादी देखील होते.

मित्रांनो,

महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक बळकट करण्याच्या हेतूने मातृभूमी सुरु झाले. देशभरात, देशातील जनतेला, वसाहतवादी साम्राज्याविरोधात भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी जी वृत्तपत्रे स्थापन झाली, त्यात मातृभूमी वृत्तपत्र अग्रभागी होते. आज जर आपण आपल्या इतिहासाकडे पहिले तर आपल्याला दिसेल की देशातील वृत्तपत्रांशी अनेक थोरांचा संबंध आहे. लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे सुरु केली. गोपाळ कृष्ण गोखले, लोकहितवादीशी  तर स्वामी, प्रबुद्ध भारत विवेकानंदांशी जोडलेले होते.  जेव्हा आपण महात्मा गांधीजींचे स्मरण करतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या ‘यंग इंडिया’, नवजीवन आणि हरिजन या वृत्तपत्रांमधून त्यांनी केलेल्या  लिखाणाचीही आठवण येतेच. श्यामजी कृष्ण वर्मा, ‘द इंडियन सोशीओलॉजिस्ट’ चे संपादन करत असत. मी आता केवळ काहीच उदाहरणे देऊ शकलो, खरे तर ही यादी खूप मोठी आहे.

मित्रांनो,

मातृभूमीचा जन्म, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात झाला होता आणि आज जेव्हा आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, अशावेळी, या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.स्वराज्यासाठी देशात सुरु असलेल्या लढ्यात सहभागी होण्याची, त्यात त्याग, बलिदान करण्याची संधी तर आपल्याला मिळाली नाही. मात्र, आजच्या अमृत काळाने आपल्याला, एक मजबूत, विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याची संधी दिली आहे. कोणत्याही देशासाठी विकसित होणे, उत्तम धोरणे तयार करणे, हा एक पैलू असतो. मात्र ती धोरणे यशस्वी होण्यास मदत करणे आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडेल, हे सुनिश्चित करणे, यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग अतिशय आवश्यक असतो आणि याच ठिकाणी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. गेल्या काही वर्षात की प्रसार माध्यमांचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल, हे आपण बघितले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण तर सर्वश्रुतच आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी या अभियानाला विशेष महत्त्व दिले होते. त्याचप्रमाणे, योग लोकप्रिय करण्यात , फिटनेस आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या उपक्रमांना प्रसार माध्यमांनी मोठा सक्रिय  पाठिंबा दिला. हे सगळे विषय, राजकारण आणि राजकीय पक्षांच्या पलीकडचे आहेत. येत्या काळात देशाला एक उत्तम राष्ट्र बनविण्याविषयीचे हे विषय आहेत. त्याशिवाय, ‘आझादी का अमृत महोत्सव’ लक्षात घेता, आणखीही काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. अलिकडे आपण बघतो, की लोक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या मात्र अज्ञात योद्ध्यांचा आणि त्यांच्या शौर्यकथा अधिकाधिक समोर आणत आहेत.

हे प्रयत्न आणखी वाढवण्याचे प्रसारमाध्यमे  हे एक उत्तम माध्यम असू शकते. त्याचप्रमाणे प्रत्येक शहरात किंवा गावात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित ठिकाणे आहेत. त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. आपण  ती ठिकाणे सर्वज्ञात करू शकतो आणि लोकांना त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. प्रसारमाध्यमाची पार्श्वभूमी नसलेल्या उदयोन्मुख  लेखकांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो आणि  त्यांना त्यांचे लेखन कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ देऊ शकतो का? भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे आपली विविधता. तुम्ही एक माध्यम म्ह्णून तुमच्याकडे असलेल्या आपल्या  इतर भाषांमधील प्रमुख शब्द लोकप्रिय करण्याचा विचार करू शकतो का?

मित्रांनो,

आजच्या युगात जगाला भारताकडून अनेक अपेक्षा आहेत.जेव्हा कोविड-19 महामारीचा फटका बसायला सुरुवात झाली, तेव्हा भारत या  महामारीचे व्यवस्थापन करू शकणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भारतातील जनतेने या टीकाकारांना चुकीचे ठरविले. आपण  समाजाचे आरोग्य आणि आपल्या  अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी गेल्या दोन वर्षांचा आपण उपयोग केला.दोन वर्षांपर्यंत 80 कोटी लोकांना विनामूल्य शिधा मिळाला .लसीच्या 180 कोटी मात्रा  देण्यात आल्या. अशा काळात, जेव्हा अनेक देशांत लस घेण्यासंदर्भात  टाळाटाळ होती, तेव्हा भारतातील जनतेने लसीकरणाला प्रतिसाद देत या देशांना मार्ग दाखवला. भारतातील प्रतिभावान तरुणाईच्या  बळावर, आपला देश आत्मनिर्भरता किंवा स्वयंपूर्णतेकडे  वाटचाल करत आहे.भारताला देशांतर्गत आणि जागतिक गरजा भागवणारे आर्थिक शक्ती-केंद्र बनवणे हा या तत्त्वाचा गाभा आहे. अभूतपूर्व सुधारणा आणल्यामुळे  आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना विविध क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आल्या. भारताचे स्टार्ट-अप कार्यक्षेत्र यापूर्वी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण नव्हते. श्रेणी -2, श्रेणी -3 शहरे आणि गावांमधील तरुण उत्कृष्ट काम करत आहेत. आज भारत तंत्रज्ञान प्रगतीच्या क्षेत्रात जगात आघाडीवर आहे. गेल्या 4 वर्षांत, युपीआय व्यवहारांची संख्या 70 पटीने वाढली आहे.हे सर्व सकारात्मक बदल स्वीकारण्याची आपल्या नागरिकांची  उत्सुकता दर्शवते.

मित्रांनो,

अत्याधुनिक  पायाभूत सुविधांचे महत्त्व आम्हाला पूर्णपणे समजले आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनवर 110 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.पायाभूत सुविधा निर्मिती आणि प्रशासन पीएम गतिशक्ती अधिक सुलभ करणार आहे. भारतातील प्रत्येक गावात हाय – स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी  सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. भविष्यातील पिढ्या सध्याच्या पिढ्यांपेक्षा चांगली जीवनशैली जगतील हे सुनिश्चित करणे हे आमच्या प्रयत्नांचे मार्गदर्शक तत्त्व आहे.

मित्रांनो,

महात्मा गांधी यांनी पूर्वी मातृभूमी संस्थेला  भेट दिली होती तेव्हा ते म्हणाले होते आणि त्याचा उल्लेख मी येथे करतो : मातृभूमी ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असलेली संस्था आहे.भारतातील काही वृत्तपत्रेच हे करू शकतात. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रांमध्ये मातृभूमीचे वेगळे स्थान आहे. मला विश्वास आहे की, बापूंचे हे शब्द मातृभूमी संस्था सार्थ ठरवेल. मातृभूमीचे त्यांच्या शतक महोत्सवी  सोहळ्याबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि वाचकांना माझ्या शुभेच्छा देतो.

जय हिंद


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेवंतीची लागवड करताना…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी खेडेगावात..काय आहे याचा इतिहास ?

साहित्याचा केंद्रबिंदू शहराकडून गावाकडे सरकतोय : विजय चोरमारे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading