November 12, 2025
डॉ. स्नेहल कुलकर्णी (दिशा) यांचा ‘दिशांतर’ गझलसंग्रह म्हणजे संवेदनांचा, आत्मप्रत्ययाचा आणि जीवनदृष्टीचा भावपूर्ण प्रवास, मराठी गझलेला नवी दिशा देणारा.
Home » दिशांतर…एक गझलप्रवास
मुक्त संवाद

दिशांतर…एक गझलप्रवास

‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावा असाच आहे. स्नेहलताईंचा दिशांतर हा दुसरा संग्रह आहे. यापूर्वी स्नेहांकित हा गझलसंग्रह वैचारिक समृद्धी आणि आशय समृद्धीला घेऊन उतरल्याने तो लोकप्रिय ठरला. त्याचप्रमाणे दिशांतरही ठरतो आहे.

— सतिश गुलाबसिंह मालवे
(एक गझलप्रेमी | रसिक| वाचक)

पाताळ शोधल्यावर तारे मला मिळाले
मी थांबले तरीही झाले कसे दिशांतर

मराठी गझलविश्व आज अनेक प्रतिभासंपन्न, जाणीवसंपन्न आणि संवेदनशील गझलकारांनी समृद्ध होत आहे. या गझलपर्वात काही महिला गझलकारा ज्या ताकदीने आणि जाणिवेने गझलेला आत्म्याचा स्पर्श देतात, त्यात डॉ. स्नेहलताई कुलकर्णी (दिशा) यांचे नाव मोठ्या आदराने घेतल्या जाते.. हे नाव रसिकांच्या मना-मनात कोरले गेले आहे. आणि म्हणूनच आजच्या महिला गझलकारांमध्ये त्यांचे नाव ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ झाले आहे. स्नेहलताईंचा प्रसिद्ध झालेला गझलसंग्रह “दिशांतर” हे त्याचेच भक्कम उदाहरण होय. या संग्रहातील गझलांना केवळ शब्दसौंदर्य नाही, तर एक स्पष्ट आशय, जीवनदृष्टी आणि आत्ममूल्यांची सखोल मांडणी आहे. डॉ. स्नेहलताई (दिशा) वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनदेखील त्यांचं मन साहित्यात अत्यंत उत्कट आहे. गझलच्या नियमांच्या चौकटीत राहून स्वतःची स्वतंत्र भाषा, स्वतःचं जीवनदर्शन त्या शब्दबद्ध करतात. त्यांच्या लिखाणात एक सुसंस्कृत वैचारिकता आहे. दिशांतर संग्रह हाती पडल्याबरोबर संग्रहाचं मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते.

संकल्पनात्मक सौंदर्य… एका एकाकी, चाललेल्या बाईची आकृती, भोवती रंगांची स्वप्नाळू उधळण, आणि पार्श्वभूमीतील धूसर अंधुकता हे सगळं मिळून ‘दिशांतर’ या संकल्पनेला आशयगर्भ पातळीवर अधोरेखित करणारे हे मुखपृष्ठ चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारले आहे.

या संग्रहातील गझला वाचताना प्रथम जाणवतो तो म्हणजे स्नेहलताईंचा शब्दांवरील अलौकिक हक्क. त्या साध्या, सहज भाषेत खोल अर्थ सांगतात. विशेष म्हणजे संग्रहात स्त्रीजाणीवा, नातेसंबंधातील सूक्ष्म भावनिक गुंतागुंत, आत्मसंवाद, वैयक्तिक संघर्ष, आणि आधुनिक जीवनातील विसंगती यांचे चित्रण अत्यंत नजाकतीने आणि ठामपणे केले आहे. अनेक गझलांमध्ये अंतर्मुख स्त्रीच्या अनुभवांचे गहिरे दर्शन होते.

रडू ऐकून बाळाचे म्हणाले माफ कर देवा
पुजा सोडून अर्ध्यावर उठावे लागते आहे

वरील शेर वाचून वाचक निःशब्द होणार नाही तर नवल!

पडणे पडून उठणे आयुष्य हेच जर
जातोय तोल त्याला सावर कसे म्हणू

स्नेहलताईंच्या गझलांचा उल्लेख करताना सर्वप्रथम नमूद करावे लागेल की, त्यांनी गझलेच्या पारंपरिक रचनेशी नाते ठेवत त्यात स्त्रीदृष्टी, अनुभवांची झालर आणि शब्दांच्या संकोचातून विचारांचा विस्तार साधला आहे. त्यांच्या बहुतेक गझलांमध्ये प्रकटतेपेक्षा अधिक सूचकता आढळते.

ठेवून रिकामी ओंजळ मी कसे पाठवू त्याला
तो प्रेम मागण्यासाठी गुडघ्यावर बसला आहे

‘दिशांतर’ ही फक्त भौगोलिक नव्हे तर भावनिक स्थलांतराची प्रक्रिया आहे, हे स्पष्ट दिसते. त्या एकीकडे यमक, लय, गेयता या घटकांशी इमान राखतात, तसंच अर्थगर्भतेला प्राथमिकता देतात.

एवढे माझी चुकीचे शब्द पसरवले कुणी
तीर्थ मी मागितले तर रक्त शिंपडले कुणी

हा शेर भाषेच्या चुकीच्या अर्थांचे परिणाम किती विकृत स्वरूप धारण करू शकतात हे दर्शवतो. पावित्र्याची मागणी करताना हिंसेची प्रतिक्रिया मिळणे हे आजच्या सामाजिक व राजकीय भाषेचं वास्तव स्नेहलताईंनी किती कमी शब्दात मांडले आहे.

एवढ्या हलक्या थराला सूर्य नाही जायचा
कवडसा पाहून माझे तेजही गिळले कुणी

इथे तेजाचा संदर्भ स्वत्वाशी आहे. कवडसाच्या भ्रमात इतरांनी आपलं तेज ओरबाडून नेणं ही फार वेदनादायी जाणीव या शेरातून व्यक्त केल्याचे दिसून येते.

स्नेहलताईंची शब्दावरची जी पकड आहे ती पाहून कधी कधी तर थक्क व्हायला होतं.

बनवली बाहुली त्याने इथे प्रत्येक गोष्टीची
तुझी का मूर्त एखादी मना घडू शकत नाही

प्रेमातील स्वीकार, ओळख आणि स्मृती याबद्दल असलेला हा शेर वस्तूंना मूर्त स्वरूप देता येते, पण मनाच्या कोपऱ्यात घर करून बसलेल्या आठवणींचे स्वरूप नाही देता येत, ही हळूवार जाणीव इथे ताईंनी व्यक्त केलेली दिसते.

मला प्रत्येक गोष्टीची नशा विधिवत हवी होती
धुक्यामध्ये विहरताना उन्हे सोबत हवी होती

हा शेर समांतर जगण्याची, भरकटलेल्या अस्तित्वाची, आणि तरीही प्रकाशाच्या आसक्तीची अनुभूती देऊन जातो.

गडच शृंगार दोघांचा विसरले श्रावणानंतर
पुन्हा भरायची संधी तुझ्यामार्फत हवी होती

इथे प्रेमात ओहोटीचा काळ आणि त्यानंतर नव्याने सुरूवात करण्याची आर्तता अतिशय हळुवारपणे व्यक्त केलेली आपल्याला दिसून येईल.

बानू बानू मारत हाका दारी आला आहे
माझ्यासाठी गड सोडुन मल्हारी आला आहे

हा शेर लोक कथेमधील संदर्भ वापरून व्यक्तिगत भावभावना स्पष्ट करतो. समर्पण, आश्वासकता आणि प्रेमातील धैर्य या भावनांचं दर्शन इथे नक्कीच वाचकाला घडवून आणतो.

इतकी सुंदर कधीच नव्हते दिसली कोणालाही
कुठुन पारखी नजरेचा जोहारी आला आहे

जोहारीच्या दृष्टिकोनातून सुंदरतेचा शोध हा केवळ बाह्यतेपेक्षा अधिक खोल असतो. त्यातून उद्भवणारी स्त्री-प्रसिद्धी या शेरात प्रकट होते.

नको देऊस गुंगारा तिला समजून मनमौजी
तुझ्यामागे दिशा अपुली प्रथा मोडून येते का?

या शेरात स्त्रीच्या निर्णय क्षमतेविषयी आणि पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील रूढींच्या विरोधात स्त्री स्वतःचा मार्ग शोधते याची परिचिती वाचकाला झाल्याशिवाय राहत नाही

सूर्य रात्रीच्या कुशीतुन ओघळावा लागतो
गारव्यापोटी उन्हाला जन्म घ्यावा लागतो

हा शेर निसर्गचक्राचा दाखला देऊन परिवर्तन, समर्पण, आणि पुनर्जन्म या तात्त्विक संकल्पना अधोरेखित करणारा वाटतो..

पित्त त्याचेही खवळते रोज माझ्यासारखे
शंकराला चंदनाचा लेप द्यावा लागतो

शांततेचे प्रतीक असलेल्या देवतेलाही रोजच्या यातना असतात, त्यालाही शमन लागते ही मानवी भावना या शेरात किती अप्रतिमपणे मांडली आहे

‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावा असाच आहे. स्नेहलताईंचा दिशांतर हा दुसरा संग्रह आहे. यापूर्वी स्नेहांकित हा गझलसंग्रह वैचारिक समृद्धी आणि आशय समृद्धीला घेऊन उतरल्याने तो लोकप्रिय ठरला. त्याचप्रमाणे दिशांतरही ठरतो आहे.

पुस्तकाचे नाव – दिशांतर
लेखिका – डॉ. स्नेहल कुलकर्णी
प्रकाशक – गझल मंथन प्रकाशन, कोरपना मोबाईल – 9823645655
किंमत – २५० रुपये

पाताळ शोधल्यावर तारे मला मिळाले
मी थांबले तरीही झाले कसे 'दिशांतर'
मानवी मनोव्यापारांचा आध्यात्मिक पातळीवर जाऊन विचार करणारी पण आशयाची वास्तवाशी असलेली नाळ तुटू न देणारी गझलकारा म्हणून डॉ. स्नेहल कुलकर्णी सध्या मराठी गझलविश्वाला परिचित आहेत. निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या मारून तात्कालिक आनंद न देता आपल्या शेरांमधे वाचकांना चिरकाल गुंतवून ठेवण्याचे कसब त्यांच्या लेखनात असल्यामुळेच त्या सध्याच्या काळातील एक महत्त्वाच्या गझलकारा ठरल्या आहेत. त्यांचा 'दिशांतर' हा दुसरा गझलसंग्रह नावाप्रमाणेच मराठी गझलेला पारंपरिक दिशांच्या पार घेऊन जाणार आहे. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या जोरावर गझलेशी प्रामाणिक राहून सातत्यपूर्ण उत्कृष्ट लिखाण करत असतानाच कुठल्याही वादविवादात न अडकता गझलेच्या प्रचार आणि प्रसाराचे कामही त्या तितक्याच मनोभावे आणि निरपेक्ष वृत्तीने करताना दिसतात.
स्नेहलजींच्या गझलेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी मला सर्वात जास्त भावलेले वैशिष्ट्य म्हणजे लिखाणाची स्वयंभू शैली आणि प्रासादिक शब्दकळा होय. प्रासादिकता म्हणजे काय हे त्यांची गझल वाचून आपल्याला समजते. 'दिशांतर' मधील प्रत्येक गझल वाचकाच्या भावविश्वाशी एकरूप होऊन त्याचे अंतर्मन उलगडून तर दाखवतेच पण वेगवेगळ्या अस्पर्श खयालांच्या माध्यमातून गझलेचा आणि गझलकाराच्या प्रतिभेचा प्रचंड आवाका लक्षात आणून देते. त्यांच्या 'स्नेहांकित' या पहिल्या गझल संग्रहाच्या पुढे एक पाऊल टाकून मराठी गझलेत 'दिशांतर' घडवून आणण्यासाठी, तसेच पुढील गझल आणि साहित्य प्रवासासाठी डॉ. स्नेहल कुलकर्णी (दिशा) यांना मनापासून शुभेच्छा !

डॉ. शिवाजी काळे

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading