November 17, 2025
महाराष्ट्रातील निवडणुका जवळ आल्याने नेत्यांमध्ये ‘अॅनाकोंडा, अजगर, पप्पू’ अशा भाषेचा वापर वाढला असून सभ्य राजकारणाची पातळी खालावल्याचे चित्र दिसते.
Home » अॅनाकोंडा, गद्दार, अवलाद, अजगर, पप्पू…
सत्ता संघर्ष

अॅनाकोंडा, गद्दार, अवलाद, अजगर, पप्पू…

मुंबई कॉलिंग –

निवडणुकांचा हंगाम जसा जवळ येऊ लागला आहे तसे राजकीय आरोप प्रत्यारोपांना राज्यात उधाण येऊ लागले आहे. केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेते, लोकप्रतिनिधीही असभ्य भाषेत बेलगाम वक्तव्ये करीत आहेत. विशेष म्हणजे एकमेकांचा बाप आणि अवलाद काढणारी भाषा वापरणाऱ्यांना त्यांच्या पक्षाचे नेतेही समज देत नाहीत किंवा ते चुकीचे बोलले अशी जाहीर कबुली देत नाहीत.

डॉ. सुकृत खांडेकर

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपावर मत चोरीचा आरोप करीत लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधींप्रमाणे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोठ्या पडद्यावर सादरीकरण करून मुंबईत एका कार्यक्रमात उदाहरणे देऊन काही पुरावे मांडले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. राहूल गांधी स्टेजवर येर झारे मारत असतात , तसे आदित्य यांनी करण्याची गरज नाही. मी त्यांनी पप्पू म्हणत नाही, पण त्यांनीही पप्पू बनू नये…

गेली चार पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळेच जानेवारी २०२६ पूर्वी महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, आदींच्या निवडणुका घेणे सरकारला क्रमप्राप्त आहे. निवडणुकांचा हंगाम जसा जवळ येऊ लागला आहे तसे राजकीय आरोप प्रत्यारोपांना राज्यात उधाण येऊ लागले आहे. केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेते, लोकप्रतिनिधीही असभ्य भाषेत बेलगाम वक्तव्ये करीत आहेत. विशेष म्हणजे एकमेकांचा बाप आणि अवलाद काढणारी भाषा वापरणाऱ्यांना त्यांच्या पक्षाचे नेतेही समज देत नाहीत किंवा ते चुकीचे बोलले अशी जाहीर कबुली देत नाहीत. कहर म्हणजे पक्षाचे बडे नेतेच दुसऱ्यावर टीका करताना भान ठेवत नसतील तर परस्परांचे वस्त्रहरण करणाऱ्या बेताल प्रवक्त्यांना व पक्षाच्या दुय्यम फळीतील नेत्यांना आवरणार तरी कोण ?

भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील शक्तिमान नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पक्ष संघटनेत चाणक्य समजले जातात. त्यांच्या शब्दाशिवाय पक्षात पान हालत नाही. पक्षातील सर्व प्रमुख नेमणुका व कारवाया त्यांच्या संमतीनंतरच होत असतात. शतप्रतिशत भाजपा ही पक्षाची घोषणा आहेच व तोच पक्षाचा सर्व राज्यात व राष्ट्रीय पातळीवर अजेंडा आहे. त्यामुळे एका बाजुने विरोधी पक्षाला संपवणे व दुसरीकडे मित्र पक्षांचे महत्व कमी करणे किंवा त्यांना दुर्बल करणे ही पक्षाची रणनिती आहे. पक्ष विस्तारासाठी अन्य राजकीय पक्षातून दिग्गजांना आणणे व त्यांचा उपयोग करून घेणे हे गेली दहा अकरा वर्षे योजनाबध्द चालू आहे. अमित शहा यांनी मुंबईत येऊन पक्षाच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन केले. महाराष्ट्र हौसिंग फायनान्स महामंडळाचा मुंबईच्या चौपाटीवर मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड भाजपाने मिळवला त्यावर पक्षाचे नवीन भव्य असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. तोच धागा पकडून उबाठा सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अमित शहांवर अॅनाकोंडा म्हणून टीका केली. ते म्हणाले, मुंबईत अॅनाकोंडाचे आगमन झाले, त्याला मुंबई गिळायची आहे… अॅनाकोंडा हा अजगरापेक्षा मोठा असतो, त्याच्या तोंडात कितीही कोंबले तरी तो गिळत गिळत पुढे जातो… त्याला मुंबई गिळायची आहे, पण तुझं पोट फाडून बाहेर नाही आलो तर नावाचा नाही….

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेचच उद्धव यांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव यांचा उल्लेख भस्म्या झालेला अॅनाकोंडा असा केला. शिंदे म्हणाले, ते मुंबई महापालिकेच्या तिजोरीला विळखा घालून बसले आहेत. या अॅनाकोंडाने मुंबईची तिजोरी गिळली, मुंबईतील रूग्णांची खिचडी गिळली, मुंबईचे भूखंड गिळले तरी त्याचे पोट भरत नाही.

भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना अजगर म्हटले तर दुसरे मंत्री आशिष शेलार यांनी आयत्या बिळावर नागोबा अशी उद्धव यांच्यावर टीका केली. बावनकुळे हे माजी प्रदेशाध्यक्ष तर शेलार हे माजी मुंबई भाजपा अध्यक्ष आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमी भाव मिळावा यासाठी माजी मंत्री व प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नागपूर येथे महाएल्गार आंदोलन उभारले. संमृध्दी महामार्गासह दोन राष्ट्रीय महामार्ग बंद पाडले, रेल रोकोची धमकी दिली. न्यायालयाने त्यांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. तेव्हा माजी मंत्री महादेश जानकर म्हणाले- मिस्टर फडणवीस , तुझा बिस्तारा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरकार हरतयं की आम्ही हरतयं तेच हेच बघतो… याच आंदोलनात बच्चू कडू सरकारला आव्हान देताना म्हणाले- साले , तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दाची अवलाद आहे.जेल कमी पडेल, आम्हाला अटक करा…

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा, असे विधान बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. नंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले—आमदाराऐवजी दोन- चार मंत्र्यांना कापा पण मागे हटू नका… नेपाळमधे जसे मंत्र्याना तुडवून तुडवून मारले, … मी तर बच्चुभाऊंना सांगेन नागपूरनंतर आंदोलनाचा चौथा टप्पा मुंबईत ठेवा… हरामखोरांना मुंबई- महाराष्ट्रातून निघून जावे लागले पाहिजे…

राधाकृष्ण विखेपाटील व छगन भुजबळ हे दोघे महायुती सरकारमधे कॅबिनेट मंत्री आहेत. मराठा विरूध्द ओबीसी, जरांगे विरूध्द भुजबळ असा आरक्षणावरून संघर्ष जारीच आहे. विखे आला नि सर्व महाराष्ट्रात विखार पसरवून गेला… असा संताप भुजबळांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे.
एक नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाच्या व महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली तेव्हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टार्गेट केले. सदावर्ते म्हणाले- राज ठाकऱ्या , तुझ्यात दम असेल तर चुनांव रोक के दिखावं… हे दळभद्री उद्या मरणार म्हणून आज गोवऱ्या रचत आहेत… राज, उद्धव, शरद पवार म्हणतात म्हणून मुंबईत गलत काम चालणार नाही….

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना म्हणाले- माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतदान कसे घेतले, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबड कापव लागतं, कुणासाठी बकरं कापावं लागतं, कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं , यात तुम्ही सारे एक्सपर्ट आहात….

भाजपाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे सतत वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. त्यांनी मध्यंतरी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टार्गेट केले होते. जयंत पाटील यांच्यावर त्यांनी अरे तुरेच्या भाषेत टीका केलीच पण जयंत हे राजारामबापूंचे वारस आहेत की नाही , असा प्रश्न विचारून सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पण त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे आशीर्वाद त्यांना त्यांच्या बॉसकडूनच मिळाले आहेत…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading