मृत्यूनंतर श्वास थांबतो. तेव्हा आपण म्हणतो तो अनंतात विलिन झाला. म्हणजे ती शक्ती अनंतात विलीन होते. याचा अर्थ सर्वांठायी असणारी ती शक्ती एकच आहे. फक्त ती वेगवेगळ्या रुपात जन्माला आली आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685
तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा ।
आणि मजचिपासून आघवा । निर्वाहो याचा ।। 112 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10 वा
ओवीचा अर्थ – तरी अर्जुना, सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे.
जगाची उत्पत्ती कशी झाली यावर अनेक प्रयोग आजही केले जातात. पण त्याचे उत्तर अद्यापही सापडलेले नाही. गाॅड पार्टिकलचा प्रयोग या संदर्भात सर्वानाच ज्ञात आहे. स्फोटातून विश्व निर्माण झाले, असे मानले जाते. पण स्फोट म्हणजे सुद्धा एक शक्तीच आहे.
सूर्याच्या ठिकाणी अगणिक स्फोट घडतात. त्या शक्तीपासूनच विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. म्हणजे निर्मिती ही एका शक्तितून झाली, हे निश्चित. ही शक्ती म्हणजे दैवीशक्ती. हे अनेकांना मान्य नाही. देव न माननारे यावर विश्वास ठेवत नाहीत. गाॅड पार्टिकलला देव का म्हटले गेले असाही सवाल ते उपस्थित करतात. देव मानने आणि न मानने हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अवकाशाच्या पोकळीचा अंत अद्याप विज्ञानालाही लावला आलेला नाही.
सूर्य आहे. सूर्य मालिका आहे. यात ग्रह आहेत. हे सर्व सूर्याभोवती फिरत आहेत. पण या अवकाशाच्या पोकळीत हे सर्व आहे ज्या पोकळीला शेवट नाही. शेवट एक महाशुन्यच आहे. असे मानावे लागते. ही सृष्टी कशी निर्माण झाली ?. कोणी निर्माण केली ? हे आपण कोणीच सांगू शकत नाही. पण सृष्टीत असणाऱ्या प्रत्येकात एक शक्ती आहे. जी शक्ती केवळ सूर्याभोवती फिरत आहे. ही शक्ती सूर्यातून प्रकट झाली अन् ती सूर्याभोवतीच फिरत आहे. हे फिरणे अनंत कालापासून सुरू आहे. ती जन्मते कशी अन् मृतही कशी होते.?
मानवाचा जन्म म्हणजे तरी काय ? आत्मा देहात येतो म्हणजे जन्म आणि तो देहातून जातो म्हणजे मृत्यू. म्हणजे आत्मा आला अन् गेला. शेवटी आत्मा अमरच आहे. त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. देहात अडकला तेव्हा जन्म आणि देहातून गेला म्हणजे मृत्यू. प्रत्येक सजीवाची हीच अवस्था आहे. म्हणजे प्रत्येकात तो आहे. प्रत्येकात ती शक्ती आहे. कधी वाऱ्याच्या रुपात येते. कधी वीजेच्या रुपात येते. कधी अन्य रुपात येते. वारा येतो. आपणास तो जाणवतो. तसा श्वास शरीरात जातो आणि श्वास शरीरातून बाहेर येतो. मृत्यूनंतर श्वास थांबतो. तेव्हा आपण म्हणतो तो अनंतात विलिन झाला. म्हणजे ती शक्ती अनंतात विलीन होते. याचा अर्थ सर्वांठायी असणारी ती शक्ती एकच आहे. फक्त ती वेगवेगळ्या रुपात जन्माला आली आहे. या शक्तीला जाणणे. तिचा अनुभव घेणे. तिचा बोध घेणे. म्हणजेच त्या शक्तीची अनुभूती होणे. हेच अध्यात्म आहे. श्वास आत येतो सोच्या रुपात अन् बाहेर पडतो हमच्या रुपात. हेच सोहम. या सोहमचा बोध घेणे. त्याची अनुभूती जेव्हा येते तेव्हा या जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.