आपले मन हे वेगवेगळ्या विचारात अडकलेले आहे. त्यामुळे ते सतत विचलित होते. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मनातील चंचलतेमुळेच आपणास अपेक्षित यश प्राप्त होण्यात अडचणी येत आहेत. मनावर धुळीचे विविध पडदे पडले आहेत. ते दूर करायला हवेत. या पडद्यामुळेच आत्मज्ञानाचा विचार प्रकट होत नाहीये. यासाठी मनात प्रकट होणारे विचारच थांबवायला हवेत.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406
हे उपजे आणि नाशे । तें मायावशे दिसे ।
येऱ्हवी तत्त्वता वस्तु जे असे । ते अविनाशची ।। १०५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – भ्रांतीला वश झाल्यामुळे जन्म व मृत्यू हे अनुभवास येतात. एऱ्हवी वास्तविक वस्तु ( आत्मा ) जो आहे, तो अविनाशच आहे.
साने गुरुजी यांनी अवतार कल्पना स्पष्ट करताना म्हटले आहे की आपल्या हृदयातील ध्येय ज्याच्याठिकाणी अत्यंत प्रखरतेणे व स्पष्टपणे मूर्तिमंत झालेले दिसते. तो आपला अवतारी पुरूष होय. आपल्या प्रयत्नांचे पराकष्ठेचे परिणत स्वरुप जेथे आपणास दिसून येते तेथे आपला अवतार असतो.
प्रत्येक साधकाचे ध्येय आत्मज्ञानी होणे हे असते. यासाठीच तो धडपडत असतो. आत्मज्ञानी होण्यासाठीच तो आत्मज्ञानी गुरूंच्या शोधात असतो. प्रत्येकाची आवड निवड सारखी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तशी एकाच घरातील सर्वमंडळी सारखी नसतात. घरातील प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाला श्री गुरुदेव दत्त आवडतात. तर कोणाला संत ज्ञानेश्वर आवडतात. कोणाला स्वरुपानंद आवडतात तर कोणाला स्वामी समर्थ आवडतात. कोणाला खंडोबा देव आवडतो तर कोणाला जोतिबा देव आवडतो. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असल्याने कोणाला कोणाचा अवतार आवडेल हे सांगता येत नाही. ते ज्याच्या त्याच्यावरच अवलंबून असते. मात्र प्रत्येकाचे ध्येय एकच असते. सुख-शांती-समाधान अन् आत्मज्ञान मिळवणे. वाटा वेगवेगळ्या असल्या तरी पोहोचायचे ठिकाणी एकच असते. त्यासाठी कोणी कोणत्या गाडीत बसायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
स्वराज्य हे ध्येय आहे, मग त्याची निर्मिती स्वतःच करायला हवी. स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजांनी पाहीले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. दुसऱ्यी चाकरी आता बास…आपल्या पुढच्या पिढीने दुसऱ्याची गुलामगिरी न करता स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करावे असा विचार शहाजीराजांच्या मनात डोकावला. स्वराज्याचे हे बीज पेरण्यासाठी दुसऱ्याकडे भीक त्यांनी मागितली नाही. छोट्या छोट्या प्रयत्नातून सुरू झालेल्या स्वराज्याच्या विचारांना जोड देत मोठी चळवळच त्यांनी उभी केली. यासाठीच ध्येय हे महत्त्वाचे आहे. जे ध्येय शिवाजी महाराज यांनी पाहीले ते ध्येय जनतेच्या हृदयातही होते, फक्त त्याला अंकूर फुटण्यासाठी अनुकूल वातावरणाची गरज होती. शिवाजी महाराज यांच्या रुपाने हा अंकूर फुटला अन् स्वराज्य प्रकट झाले. म्हणूनच ते अवतारी पुरूष झाले. अनेकांच्या हृदयातील विचाराला योग्य दिशा देण्यात महाराज यशस्वी झाले. हा विचारांचा अवतार अविनाशीच आहे. आपल्या मनातील विचारावर बसलेल्या धुळीमुळे आपणाला जन्म-मृत्यूचा अनुभव येत आहे.
आपले मन हे वेगवेगळ्या विचारात अडकलेले आहे. त्यामुळे ते सतत विचलित होते. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मनातील चंचलतेमुळेच आपणास अपेक्षित यश प्राप्त होण्यात अडचणी येत आहेत. मनावर धुळीचे विविध पडदे पडले आहेत. ते दूर करायला हवेत. या पडद्यामुळेच आत्मज्ञानाचा विचार प्रकट होत नाहीये. यासाठी मनात प्रकट होणारे विचारच थांबवायला हवेत. असे करता आले तर काय होईल ? मन भरकटायचे थांबेल. यासाठीच तसा विचार करायला हवा अन् मन केवळ अन् केवळ साधनेवर केंद्रित करायला हवे. येणारे विचार थांबवता येणे शक्य आहे. तसे प्रयत्न करायला हवेत. विचारांचा जन्म होतो अन् मृत्यू होतो असे आपणास वाटतो. जन्म-मरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठीच स्व ला ओळखायला हवे. त्यावर मन केंद्रिय करायला हवे. हा प्रयत्नच आपणाला आपला अवतार प्रकट करेल. खरे स्वरुप दाखवेल. कारण खरे स्वरूप हे अविनाशी आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.