बायजुसकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी होत आहेत. पण ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाहीये. या संदर्भात सरकारने याची गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे. तसेच या अशा अभ्यासक्रमांच्या संदर्भातील कायदेही तपासून पाहाण्याची गरज भासणार आहे. न्याय मिळत नसेल तर कायद्यामध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. हा प्रश्न केवळ बायजुसचा नसून हे एक उदाहरण आहे. सरकारी पातळीवर याची दखल घेतली जावी यासाठीच हा लेखप्रपंच…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
ऑनलाईन शिक्षणाचे पेव आजकाल सगळीकडे फुटले आहे. घरच्या घरी सर्व काही उपलब्ध होत असेल तर ते कोणाला नको होईल. एकाच छताखाली सर्व सोयी देण्याचे आश्वासनही दिले जाते. मुलांच्या भविष्याची चिंता असणारे पालक मुलांना अभ्यास करताना अडचणी येऊ नयेत म्हणून हा पर्याय निवडतात. सध्या पूर्वीसारखे शिक्षण राहीलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बौद्धीक क्षमताही वाढली आहे. स्पर्धेच्या युगात आपली मुले कमी पडू नयेत म्हणून हे पर्याय पालक निवडतात. पण जेंव्हा त्यांना फसवणूक झाली आहे असे लक्षात येते तेंव्हा मात्र तक्रार करायलाही शक्ती राहात नाही अशी अवस्था होऊन बसते. आजजर या जगात पुढे यायचे असेल तर प्राप्त परिस्थितीतील ही आव्हाने स्वीकारूनच पाऊले टाकावी लागतात हे लक्षात घ्यायला हवे. खिसा कापणारे आता केवळ गर्दीच्या ठिकाणीच आढळत नाहीत तर ते आपल्या आसपासही वावरताना दिसत आहेत. अशा या खिसेकापूचा ससेमिरा रोखण्यासाठी आव्हान म्हणून लढा उभा करायला हवा. तरच देशातील ही कीड नष्ट होईल हे जनतेने लक्षात घ्यायला हवे.
मोठी मोठी सेलिब्रिटी अन् मोठ्या मोठ्या जाहिराती करून जनतेच्या मनावर आपली प्रतिमा उभी करणारे प्रत्यक्षात किती फसवणूक करत आहेत याची कल्पनाही करता येणे कठीण आहे. विशेष म्हणजे यांच्या विरोधात तक्रारीसाठी नागरिक पुढे येत नाहीत यातच या सर्वांचे फावले आहे. बायजुस एक ऑनलाईन शिक्षण देणारी भलेमोठे नाव असणारी संस्था आहे. पण प्रत्यक्षात बायजुसकडून ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे. लाईफकेअर फार्मामधील श्रावण कुमार यांनी बायजुसकडून मुलासाठी अभ्यासक्रम विकत घेतला. यासाठी लागणारी सर्व रक्कम त्यांनी भरली पण त्यानंतर त्यांना बायजुसकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. ग्राहकांना सुविधा देण्यात तसेच आयटीकडून मिळणारी तातडीची मदत पुरविण्यात बायजुस पूर्णता अपयशी ठरत आहे, असे मत त्यांनी नोंदविले आहे.
ललित पालिवल हे एक वर्ष बायजुसमध्ये नोकरीस होते. पण त्यांनी नोकरी सोडली कारण ग्राहकांनी बायजुसकडून विकत घेतलेली सुविधा देण्यात त्यांची कंपनी अपयशी ठरत आहे. त्यांच्याकडे रिफंडसाठी ग्राहकांनी तक्रारी केल्या पण यावर कोणताही प्रतिसाद बायजुसकडून दिला जात नव्हता. म्हणजे बायजुसमधील कर्मचारीही या कंपनीवर वैतागलेले पाहायला मिळत आहेत, असेच म्हणावे लागेल. वैशनो कांत यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी बायजुसकडून अभ्यासक्रम खरेदी केला होता, पण त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनाही योग्य सुविधा दिली जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पैसे देताना पालकांची बिकट अवस्था होते. पण अशा फसवणूकी होत असतील तर विद्यार्थी अन् पालकांनी दाद कोणाकडे मागायची हा मोठा प्रश्न आहे. सहदेव गुप्ता, श्रृती कोल्हार, सरिता बजाज, अमन सिंग, राजेश्वर सामा, अभिनाश दास यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. तशी ही यादी खूप मोठी होऊ शकते.
खरेदी केला आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम अन् बायजुसकडून सीबीएससीचा अभ्यास पुरविला जात आहे. यात त्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे नुकसान नाही का ? गोडगोड बोलून तुमच्या तक्रारीची दखल आम्ही घेऊ अशी गोड गोड आश्वासने देऊन बायजुस ग्राहकांना फसवण्यात यशस्वी होत आहे. पण ग्राहकांना न्याय मिळत नाही हे परखड सत्य आहे. अन्य पर्याय देण्याची आश्वासने देऊन ग्राहकांना गुंतवूण ठेवण्यातही बायजुसच यशस्वी होत आहे. पण हे जेंव्हा लक्षात येते तेव्हा ग्राहकाकडे काहीच पर्याय शिल्लक राहात नाहीत. हेही सत्य आहे.
अनेकांनी या संदर्भात न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. पण बायजुसने त्यांच्याही नोटीशींना उत्तर दिलेले नाही. अशा परिस्थितीत जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे ? सरकारतरी याची दखल घेणार का ? या संदर्भात सरकारी कायदे कमी पडतात का ? याचीही चाचपणी आता सरकारला करावी लागणार आहे. सरकार कोणत्या पक्षाचे आहे किंवा सत्ता कोणाची आहे याला महत्त्व नाही जनतेला न्याय मिळत नाही हे मात्र सत्य आहे. ऑनलाईन शिक्षणा संदर्भातील अशा पसवणुकींची दखल गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.