इंद्रियांना मिळालेल्या अनुभवावरून मनावर परिणाम होत असतो. यासाठी इंद्रिये नित्य अन् शाश्वत सुखात गुंतवायला हवीत अर्थातच ती साधनेत गुंतवायला हवीत. इंद्रियांना साधनेची गोडी लागली तर नित्य शाश्वत सुख अनुभवायास मिळते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
हे विषय जयातें नाकळिती । तया सुख दुःखे न पवती ।
आणि गर्भवासुसंगती । नाही तया ।। १२३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही.
विषयांच्या तावडीत आपण सापडणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. म्हणजे आपणास कसलाच त्रास होत नाही. साधनेत मन रमवायचे असते तर हे करणे आवश्यक आहे. विषयात आपण गुरफटलो तर आपण त्यातून बाहेर पडणे अवघड असते. इंद्रियामधून आपली सुटका करून घेणे आवश्यक आहे. यासाठीच ही इंद्रियेच साधनेमध्ये गुंतवायला हवीत.
चांगली घटना घडली की सुख, आनंद प्राप्त होतो. पण वाईट घटना घडल्यानंतर आपणास दुःख होते. आपण त्यात गुंतल्यामुळे आपणास सुख, दुःख होते. दुसऱ्याची कोणी निंदा केली अन् ते शब्द आपल्या कानावर पडले तर आपणास बरे वाटते, पण एखाद्याने त्याची स्तुती केली की आपणास चिड येते. वाईट वाटते. ही मानसाची वृत्ती आहे. चांगले-वाईट ऐकल्याने दोन्हीचाही आपल्या मनावर परिणाम होतो. सुंदर निसर्ग दृष्टीस पडल्यानंतर त्याचा आपल्या मनावर चांगला परिणाम होतो. मन प्रसन्न होते. पण तेच एखादी दुर्घटना पाहील्यानंतर मन हळहळते. मनाला दुःख होते. भयानक गोष्टी पाहील्यानंतर त्याचा वाईट परिणाम मनावर झालेला पाहायला मिळतो.
सुगंधी द्रव्याच्या वासाने मन प्रसन्न होते. पण तेच मन दुर्गंधीने विचलित होते. गोड पदार्थाने आनंद मिळतो तर तिखटाने मनातील तिखट भाव जागृत होतात. पण हे सर्व क्षणिक असते. ज्या त्या परिस्थितीनुसार हा परिणाम हा क्षणिक असतो. पण आपण त्यात गुंतत गेल्याने सुख-दुःखे अनुभवास येतात. विषय कसा आहे यावर हे सर्व अवलंबून असते. इंद्रियांना मिळालेल्या अनुभवावरून मनावर परिणाम होत असतो. यासाठी इंद्रिये नित्य अन् शाश्वत सुखात गुंतवायला हवीत अर्थातच ती साधनेत गुंतवायला हवीत. इंद्रियांना साधनेची गोडी लागली तर नित्य शाश्वत सुख अनुभवायास मिळते.
साधनेतील सोहमचा स्वर कानांनी ऐकायची सवय लावायला हवी. तो स्वर श्वासाने अनुभवायाल हवा. त्या स्वराचा स्वाद जीभेने चाखायला हवा. त्या स्वराचा स्पर्ष त्वचेने अनुभवायाला हवा. डोळ्यांनी त्या स्वराचे दर्शन घ्यायला हवे. म्हणजेच इंद्रियांनी तो स्वर अनुभवायाला हवा. यासाठीच या स्वरामध्ये इंद्रिये गुंतवायला हवीत. यातून मिळणारे सुख हे शाश्वत असते. मिळणारा आनंद हा उच्च कोटीचा असतो. यातूनच मग आपली आपणाशीच ओळख होते. अन् आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.