विशेष म्हणजे आधुनिक विज्ञान, वैद्यकीय प्रगती होण्याअगोदर तुकारामांनी एवढा आधुनिकतेने विचार करावा. हे द्रष्टेपण असणारे तुकाराम म्हणूनच सर्वसामान्यांच्या मनात, ध्यानात, श्वासात, हृदयात निर्विवादपणे स्थान मिळविलेले संतश्रेष्ठ ठरले. आदर व आदर्श अशा तुकारामांच्या विचारांचे अनुकरण करण्याच्या संदर्भात काय स्थिती आहे ?
डॉ. लीला पाटील कोल्हापूर
गोहो यावा गावा । ऐसे नवस करी आवा ॥ १ ॥
कैसे पुण्य तया गाठी । व्रते वेची लोभासाठी ॥२॥
वाढावे संतान । गृही व्हावे धन्यधान्य ॥ ३ ॥
मागे गारगोटी । पारिसाचीये साटो वाटी ॥४॥
तुका म्हणे मोल । देऊन घेतला सोमवेल ॥५ ॥
(३०८०)
संत तुकारामांना कर्मकांड मान्य नव्हते. सोवळे, ओवळे, उपास-तापास, नवस, यावर आधारलेली कर्मठ व्रतवैकल्ये करण्यात सबंध समाज, विशेषतः उच्च वर्णीय मंडळी धन्यता मानत होती. हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. या अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यामुळे समाज एका मानसिक कोंडीमध्ये सापडलेला होता. तसेच स्वतः प्रयत्नशील राहण्यापेक्षा मूर्तिपूजेवर या अंधश्रद्धांचा जास्त विश्वास होता. तुकाराम महाराजांनाच नव्हे तर सर्वच संतांना श्रद्धा मान्य होती. कारण पुण्यमय जीवनासाठी श्रद्धा आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. तुकारामांच्या मते श्रद्धेला कृतिशीलतेची साथ पाहिजे.
तुकारामांना संन्यासी, जंगम, पुजारी, बडवे, ब्राह्मण अशासारख्या पोटभरू लोकांबद्दल चीड वाटते. कारण ही पोटार्थी मंडळी देवाच्या नावावर पैसे, नैवेद्य, दान, देणगी, नवसाच्या निमित्ताने कोरडे धान्य, वस्त्र, सोने-चांदीच्या वस्तू, पैसे आणि कोंबडी, बकरी वगैरेंचा बळी वगैरे उकळतात. स्वतःचा स्वार्थ साधतात आणि आव आणतात परमार्थाचा. म्हणून नवस करा, मगच देव प्रसन्न होईल असे ही मंडळी देव आणि भक्त यांच्यामधील मध्यस्थी बनून जणू लूटमार करतात.
या अभंगात तुकाराम म्हणतात…एक बाई आपला नवरा घरी परतावा म्हणून नवस करते. लोभासाठी नवसाची व्रते करते. तिच्या गाठी पुण्य कसे बरे लागेल ? वास्तविक नवरा घरी आणण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे. कोणत्या कारणाने ? कशासाठी ? कोठे गेला ? परत कसा येईल ? यासाठी प्रयत्न हवेत, शोध घ्यावा लागेल. नवस केल्याने तो परत येईल ही आशा किती निरर्थक !
संतान वाढावे, घरी धनधान्य व्हावे यासारख्या गोष्टींसाठी नवस करणे म्हणजे परिसाच्या मोबदल्यात गारगोटी मागणे अथवा मोल देऊन सोमवेल नावाचे विष घेणे होय असे विचार तुकारामांनी मांडले. अभंगातून व्यावहारिक उदाहरणे देण्याची तुकारामांची मांडणी म्हणजे दूरदृष्टी व प्रभावी परिणामाची दखल घेण्याचे द्रष्टेपण याचाच पुरावा होय. जड शब्द, क्लिष्ट उदाहरणे आणि तत्त्वज्ञान सांगण्यासाठी नीरस भाषा वापरण्याचा अट्टाहास तुकारामांनी केला नाही. दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे, तशाच उपमा आणि त्यांच्याशी जवळीक निर्माण करणारी भाषा वापरलेले तुकारामांचे ‘अभंग’ म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या हृदयाला भिडणारे, भावनांना हात घालणारे, मनामध्ये रेंगाळणारे आणि मेंदूमध्ये जागृती करणारे ठरले आहेत.
तुकारामांच्या या अभंगामागे त्यांचे विशिष्ट तत्त्वज्ञान आणि वैचारिक बैठक आहे. नवस बोलणारा हा नवस बोलला की देव आपली मनोकामना पूर्ण करेल या अपेक्षेने नव्हे भरवशावर राहतो. देवावर अवलंबून राहणं व तेही नवस ही लाच देऊन निर्धास्त होणं घडतं. तर ही वृत्ती तुकारामांना मान्य नाही. कारण असे अवलंबून राहण्याची सवय जडली की माणूस निष्क्रिय होत जातो आणि एकदा माणूस निष्क्रिय बनला की त्याला आहे त्याच परिस्थितीत खुरटे जीवन जगण्याची सवय लागते. स्वत:च्या निष्क्रियतेला प्रारब्ध योगच समजायला लागतो. परिस्थिती सुधारण्यासाठी हातपाय हलवणे म्हणजे प्रयत्न करणे सोडून देतो. दुसरं म्हणजे नवसाला देव पावला नाही म्हणून निराश होणं आणि पुन्हा भविष्य सांगणारे, साधू महाराज, मांत्रिक, पुजारी वगैरेकडे धाव घेणं घडतं. त्यातून दुबळेपण, लाचारी, परावलंबन वाढत जाते. हेच नेमकेपणाने हेरून तुकारामांनी नवस व्रत वैकल्याचा फोलपणा समाजाच्या नजरेस आणला.
दुसरे म्हणजे समाजामध्ये कर्मठ आणि कर्मभ्रष्ट या दोन टोकांच्या दोन विचारांचा प्रसार झालेला होता, याची जाणीव तुकारामांना आलेली. म्हणून त्यांनी कर्मठ आणि कर्मभ्रष्ट या दोन टोकांऐवजी कर्मयोगाचा मध्यम मार्ग समाजाला दाखवून देण्याचे प्रयत्न केले. त्यापैकी नवस हा भोळ्या भाबड्या लोकांच्या माना कापणारा होय. ते दगडाला शेंदूर फासून त्याला दैवत बनवतात आणि त्याला नवस बोलतात. नवसाने कन्या-पुत्र होत असेल, तर पती तरी कशाला करावा लागला असता? देवाने आपल्यावर कृपा करावी म्हणून नवसाच्या रूपाने त्यास काही देऊ करणे म्हणजे नवस. उदा. मूलबाळ होऊदे, चांदीचा पाळणा बांधणे, सोन्याचा मुकुट चढवणे अशी प्रार्थना करणे म्हणजे त्याला नवस बोलणे.
देवाण-घेवाण तत्त्वावर आधारलेल्या नवसाला भक्तीचा, ईश्वरप्राप्तीचा प्रकार तुकारामांना कसे मान्य होणार ? संतान होण्यासाठी नवस कसा उपयुक्त ठरणार? मग नवरा काय कामाचा ? हा स्पष्टपणे सवाल विचारून त्यांनी जाणीव जागृतीचा परिणामकारक असा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे आधुनिक विज्ञान, वैद्यकीय प्रगती होण्याअगोदर तुकारामांनी एवढा आधुनिकतेने विचार करावा. हे द्रष्टेपण असणारे तुकाराम म्हणूनच सर्वसामान्यांच्या मनात, ध्यानात, श्वासात, हृदयात निर्विवादपणे स्थान मिळविलेले संतश्रेष्ठ ठरले. आदर व आदर्श अशा तुकारामांच्या विचारांचे अनुकरण करण्याच्या संदर्भात काय स्थिती आहे ?
दुर्दैवाने आजही तुकारामांचे नवसरूपाने देवाला लाच देणं पूर्णपणे निषिद्ध मानणे घडत नाही. माणूस जितका श्रीमंत तितका त्याचा नवस मोठा अशीच जणू स्थिती जाणवते. करिअर, पैसा, प्रसिद्धी याच्या मागे धावणारे ज्या ताण-तणावाची शिकार बनत आहेत, हाव संपत नाही, लोभ सुटत नाही. त्या पाठोपाठ अनिश्चित, धोका, असुरक्षितता भावना त्यांना घेरतेच. यातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून देव-देवता, नवस याच वाटेने जाणे ही पलायन वृत्ती स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे की काय ? शिक्षितसुद्धा या प्रवृत्तीतून सुटेनासे झाले आहेत.
वास्तविक भक्ताने ईश्वराची भक्ती निरपेक्षपणे केली पाहिजे अशी तुकारामांची स्पष्ट वैचारिक बैठक आणि भूमिका आहे. भक्तीच्या मोबदल्यात ईश्वराकडून मागणं इष्ट नव्हे असेही ठामपणे सांगितले आहे. तरीही एखाद्या मांत्रिक, भटजी महाराज यांच्या आहारी जाण्याची विज्ञान युगातील मानसिकता इतकी मूल वाचू दे, गुप्तधन मिळू दे म्हणून नरबळी देण्यापर्यंत मजल जाणं ही समाजाच्या अंधश्रद्धेच्याच परिपाकाची कृती नव्हे काय ?
माहिती – तंत्र – विज्ञानाचा विस्फोट होत आहे. माणूस चंद्रावर जात आहे. वैश्विकीकरणाची स्वीकृती केलेली आहे. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन यातून क्षमता व कौशल्ये प्रगत होत आहेत. आर्थिक प्रगती, आधुनिक राहणी, सांस्कृतिक अभिसरण, सामाजिक परिवर्तन यादृष्टीने घोडदौड होत आहे. आता तरी तुकाराम महाराजांचे ‘नवस म्हणजे परिसाच्या मोबदल्यात गारगोटी’ हे खऱ्या धर्माचे मर्म आत्मसात करणे घडावे ही अपेक्षा..
डॉ. लीला पाटील कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.