November 21, 2024
Farming Before Veda Indrajeet Bhalerao article
Home » वेदाआधीची शेती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वेदाआधीची शेती

॥ शेतीचे वैराज् : वेदाआधीची शेती ॥

हरप्पा आणि मोहेंजोदारो इथल्या उत्खननात तिथं पाच हजार वर्षांपूर्वीची अत्याधुनिक शहरं सापडली. त्या शहरांच्या रचनेवरून आणि तिथं सापडलेल्या वस्तूंवरून असं वाटतं की ही अत्यंत विकसित, सुसंस्कृत नगरी होती. इथल्या लोकांचा जगभर व्यापार होता. ते कापूस पिकवून जगभर निर्यात करीत. त्यातून जगभर मुलायम वस्त्रांची गोडी निर्माण झाली.

इंद्रजीत भालेराव

सिंधू संस्कृती ही वेदाआधीची संस्कृती होती असं इतिहासतज्ञ मानतात. तिथं स्त्रीसत्ताक गणराज्ये होती. ती वैराज् या नावाने ओळखली जात असत. वैराज् या शब्दाचा अर्थच स्त्रीसत्ता असा होतो. तिथले उत्पादनाचे साधन केवळ शेती हेच होते. शेतीच्या शोधक स्त्रियाच होत्या. त्यामुळे हे उत्पन्नाचे साधन स्त्रियांच्याच हातात होते. समाजावर सत्ताही स्त्रियांचीच होती. तांत्रिकी श्रुती या वेदाआधीच्या आहेत असं प्राच्यविद्या संशोधक शरद पाटील म्हणतात. वैराज्यातल्या स्त्रीसत्तेच्या काळात या तांत्रिकी श्रुती प्रचारात आल्या असं त्यांचं म्हणणं आहे. तंत्र शब्दाचा मूळ अर्थ शेती असा आहे. तर वेद शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असा आहे. सिंधू संस्कृतीच्या गणमातांनी आर्ष भाषेत रचलेल्या तांत्रिकी श्रुती हे भारताचे आद्य वाङ्मय आहे. सिंधू संस्कृती ही वेदाआधीची असल्यामुळे हे वाङ्मय वेदाआधीचे आहे असे शरद पाटील यांना वाटते. त्यांच्या मते आद्य धर्मसूत्रकार हरीती होती. तिचे एक सूत्र होते. ‘श्रुतीशच् द्विविधा वैदिकीच तांत्रिकीच’ याच सूत्राचा आधार घेऊन तांत्रिकी श्रुती ह्या वेदाआधीच्या आहेत असे शरद पाटील यांनी सिद्ध केले.

त्यांच्या मते सुरुवातीला स्त्रियांची शेतीवर मालकी होती. तेव्हा समाज मातृसत्ताक म्हणजे स्त्रीसत्ताक होता. आधी मातृसत्ताक असलेले समाज पुढं स्त्रीसत्ताक झाले. पण सगळेच मातृसत्ताक समाज स्त्रीसत्ताक झाले नाही, असंही शरद पाटलांना वाटतं. शेती ही स्त्रियांच्या कृषिमायेनेच पिकते असा पुरुषांचा विश्वास होता. शेतीची सर्व कामे स्त्रियाच करीत असल्यामुळे कृषीमायेची सर्व तंत्रे त्यांना अवगत होती. कृषीमायेची ही सर्व तंत्रे तांत्रिकी श्रुतीत मांडण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे विषय सृष्टीज्ञानाचे होते. त्यात शेतीची सर्व कामे, हवामान, पर्जन्यमान, संकेत, विधी यांचा समावेश होता. या कृषिविषयक मंत्रांना ‘छन्दासि’ असे नाव होते. शेतीच्या सुफलनासाठी या गणमाता त्याचे सामुहिक गायन करीत असत. ही गीते हा भारतीय काव्याचा पहिला अविष्कार होय. अजूनही स्त्रिया शेतात राबताना सामूहिक गायन करतच असतात.

समाज व्यवस्था स्त्रीसत्ताक असल्यामुळे शेतीचे तंत्रज्ञान स्त्रिया फक्त आपल्या मुलींनाच देत. पुरुषांना म्हणजे मुलांना देत नसत. पुरुष फक्त प्रज्योत्पादनापुरते वापरले जात. याविषयी स्त्रियांना कोणतेही बंधन नव्हते. त्या अनिर्बंध पुरुषसंबंध ठेवू शकत असत. त्यांना नवऱ्याघरी नांदायला जावे लागत नसे. पुरुषही घरी नांदायला आणण्याची गरज नव्हती. हवा तेव्हा हवा तिथे पुरूष भोगून स्त्री मुक्त असायची.

स्त्रिया कधीही नांगराने शेती करीत नसत. त्या हातानेच शेती करीत. पुढं आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट करण्यासाठी ही सगळी व्यवस्था बदलली. पुष्कळ उत्पन्नासाठी शेतीत नांगर घुसवला. स्त्रीला शेतीच्या मालकीतून काढून टाकले. तिला परकी केले. नांदायला जाणे भाग पाडले. शेतीत नांगर घुसवून आपल्याच कन्येला परकी करणारा जनक हा पहिला राजा होता. नवऱ्याघरी नांदायला जाणारी सीता ही पहिली स्त्री होती. त्यामुळेच नांगर फिरवणे हा वाक्प्रचार रूढ झाला. कारण जनकाने नुसता शेतात नव्हे तर मातृसत्ताकावरच नांगर फिरवला. सीता ही स्त्रीगीताचा सगळ्यात मोठा विषय असते त्याचे कारणही हेच. सीता ही जशी नांगरलेल्या जमिनीची पहिली प्रतिनिधी तशी न नांगरलेल्या जमिनीची शेवटची प्रतिनिधी अहल्या समजली जाते. हल म्हणजे नांगर. जी नांगर न चालवता शेतीक असते ती अहल्या असे समजले जाते.

वेद ही आर्यांची निर्मिती होती. आर्य हे पशुपालक होते. त्यांना शेती अवगत नव्हती. तरीही वेदांमध्ये कृषीविषयक ऋचा येतात. त्या कशा ? सिंधू संस्कृतीच्या अनुकरणातून ते शेती करू लागले. त्यामुळे वेदांमध्ये कृषीविषयक ऋचांचा जो समावेश झालेला दिसतो त्या ऋचा ही तांत्रिकी श्रुतीचीच उसनवारी आहे, असे शरद पाटलांना वाटते. त्यांच्या मते तांत्रिकी श्रुतीचेच रूपांतर वैदिकी श्रुतीत करून आर्यांनी निऋतीला नरक देवी ठरवले व तिची बदनामी केली. तिच्याच ज्ञानाचा वापर करून तिलाच बदनाम केले. कारण निऋती या ऋचांची निर्माती होती. तिला तिचे श्रेय तर दिलेच नाही उलट तिला हिन समजून तिची निंदा केली.

स्त्रीसत्ताक गणराज्यात स्त्रिया शेतीसाठी नांगर वापरत नसत तर मग पेरणी कशी करीत ? स्फ्य नामक काडीने पेरणी करीत. तेच त्यांचे शेतीचे औजार होते. पुराने वाहून आणलेल्या गाळाच्या जमिनीतच नदीकाठी पेरणी करणे त्यामुळे शक्य होत असे. त्या गाळालाच बीळ पाडून त्या बिळात पेरणी केली जात असे. त्यामुळेच शेती खूप मर्यादित होती. वरकड उत्पन्नाचा प्रश्नच निर्माण होत नसे. शेतीची सर्व कामे स्त्रियाच करीत. पुरुषांनी शेतीला हात लावला तर शेती जळून जाते असा त्यांचा समज होता.

जमिनीच्या सुपीकतेसाठी उन्मुक्त कामाचार आणि पुरुषमेध असे दोन विधी तेव्हा केले जात असत. उन्मुक्त कामाचारामुळे शेती उधाणून येते असा त्यांचा समज होता. म्हणून गणातील स्त्री-पुरुष उन्मुक्त कामाचार करीत असत. हा उन्मुक्त कामाचार भोगवासनेचा भाग म्हणून सदैव केला जात नसे. तर तो विशिष्ट दिवशी शेत भरघोस पिकावे म्हणून केला जात असे. हा समज त्या काळात जगात सर्वत्र प्रचलित होता असेही शरद पाटील म्हणतात. हा उन्मुक्त कामाचार हा शेती सुफलनाचा विधी होता. पुढे त्याचे रूपांतर प्रथेत झाले. पुरुषमेध हा शेतीच्या सुफलनाचा दुसरा विधी. यात शेतीचा कमी झालेला कस भरून काढण्यासाठी पुरुषाचा बळी दिला जात असे. या काळाततील समाज व्यवस्था दोनच वर्णाची होती. एक क्षेत्र दुसरा ब्रह्मण. क्षेत्र म्हणजे स्त्री जमीन आणि ब्रह्मण म्हणजे आकाश, पुरुष. विश्वाची निर्मिती व पुनरुत्पादन ‘द्यावा’ आणि ‘पृथ्वी’ यांच्या पावसाळ्यातील संभोगामुळे होते असा त्यांचा समज होता.

या काळात पुरुष हा फक्त बिजीन म्हणजे बी पेरणारा होता. तो काही स्त्रीचा मालक किंवा पती नसे. कारण तेव्हा विवाह पद्धती अस्तित्वातच आलेली नव्हती. त्यामुळे लैंगिक संबंधात कुठलाच अडसर नव्हता. मुक्तता होती. म्हणूनच आपत्याचा पिता कोण हे माहीत नसे. पित्याकडची कोणतीच नाती त्या काळात अस्तित्वात नव्हती. स्त्रीकडची सगळी नाती होती. उदाहरणार्थ भाऊ, बहीण, मामा, मावशी इत्यादी. शरद पाटील यांना ही व्यवस्था आदर्शवत वाटत होती असे नाही. पण ती तशी अस्तित्वात होती एवढेच त्यांचे म्हणणे.

वैराज्यात स्त्री कसत असलेली शेती शाश्वत नव्हती. नदी नेहमी पात्रे बदलत राहत असे. त्यामुळे गाळपेरही बदलत असे. त्या काळात शेती ही सामूहिक मालकीची होती. सगळे मिळून एकत्रित शेती करत असत आणि झालेले उत्पन्न गणमाता गरजेप्रमाणे गणात वितरित करीत असत. उरलेले पीक आग लावून शेतात उभेच जाळले जात असे. त्याचा संचय केला जात नसे. नंतर लोकसंख्या वाढली पण शेती वाढली नाही. त्यामुळे शेतातले उभे पीक जाळून टाकणे बंद करण्यात आले. अवजारात व मनुष्यबळात वाढ करण्याची गरज निर्माण झाली. शेतीबाह्य पुरुषाला त्यामुळेच शेतीत स्थान दिले गेले. त्याने शेती हाताने करण्याऐवजी प्रगत अवजारांनी करायचे असे ठरवले. मग नांगर आला. ते ओढण्यासाठी बैल आले. पुरुष या प्रगत साधनाद्वारे वरचढ होत गेला. हळूहळू त्याने शेतीवर ताबा मिळवला व स्त्री दुय्यम होत गेली. त्याचदरम्यान आर्य आले आणि त्यांनी इथे त्यांची चातुर्ण्यव्यवस्था ही निर्माण केली आणि शेतीवर पूर्णपणे ताबा मिळवला.

अतिरिक्त उत्पन्नामुळे मालकी आली. मालकीमुळे गुलामी आली. काम करणारे आणि मालक अशी नवी दास प्रथा निर्माण झाली. अतिरिक्त उत्पन्न सोबतच शोषणाची कल्पना आली. तरीही काही ठिकाणी स्त्रियांनी आपली शेती वेगळी ठेवली होती. ती प्रामुख्याने जंगलात असे. हळूहळू तिच्यावरही पुरुषांनी ताबा मिळवला. शरद पाटील यांनी आपल्या ग्रंथात रॉबर्ट ब्रिफाॅ यांच्या ‘द मदर्स’ या पुस्तकातला एक उतारा दिलेला आहे. तो यादृष्टीने पाहण्यासारखा आहे.

“जनावरांचा कळप ज्या प्रकारे व ज्या कारणांसाठी मातृसत्ताक असतो त्याचप्रमाणे आदिम मानवसमूह मातृसत्ताक असतो. तो तसा प्रस्थापित वर्चस्वामुळे नसतो तर कार्यकारी संबंधामुळे असतो. स्त्रीसत्ता येण्याचे कारण स्त्रिया मालमत्तेच्या नियंत्रक असल्याने त्यांचे आर्थिक प्रभुत्व येण्यात आहे. आदिम मातृसत्तेत नाही”. पुढे सिंधू संस्कृती ही अत्यंत विकसित होत गेली असे म्हटले जाते.

हरप्पा आणि मोहेंजोदारो इथल्या उत्खननात तिथं पाच हजार वर्षांपूर्वीची अत्याधुनिक शहरं सापडली. त्या शहरांच्या रचनेवरून आणि तिथं सापडलेल्या वस्तूंवरून असं वाटतं की ही अत्यंत विकसित, सुसंस्कृत नगरी होती. इथल्या लोकांचा जगभर व्यापार होता. ते कापूस पिकवून जगभर निर्यात करीत. त्यातून जगभर मुलायम वस्त्रांची गोडी निर्माण झाली. इथं नृत्यांसह सर्व कला विकसित झालेल्या होत्या. पक्क्या विटांची अनेक मजली घरे होती. त्यासाठी देवदाराचं लाकूड वापरलं जात असे. ते वरच्या जंगलात तोडून नदीत टाकून वाहवत आणलं जात असे. असा लाकडांचा व्यापारही या शहरात विकसित झालेला होता. अगदी आधुनिक शहरांसारखी त्या शहरांची रचना होती. त्यांची स्वतंत्र शिल्पकला आणि लिपीही विकसित झालेली होती.

मग ही नगरे अचानक ओस का पडली ? ज्या नदीच्या पाण्यावर ती सुजलाम सुफलाम झाली होती त्याच पाण्याने ती शहरं गाळाखाली झाकली. असंही म्हटलं जातं की आर्यांनी त्यांना हाकलून दिलं आणि ते दक्षिण भारतात जाऊन स्थिर झाले. पाण्याच्या किंवा आर्यांच्या आक्रमणामुळे ती शहरं नष्ट झाली हे खरं असावं. पण या पाण्याचा धोका आर्यांनाही होताच. म्हणून सिंधू या अस्थिर, लहरी नदीमुळे आर्य उत्तर भारतात गेले. सिंधुतल्या मूळ लोकांना ते असंस्कृत, पापी, नग्ननृत्य करणारे, क्रूर लोक समजू लागले. सिंधूचे महात्म्य कमी होत सरस्वती व गंगेचे महत्त्व वाढत गेले. ऋग्वेदात तर सिंधूला आवर घाला, अशा स्वरूपाची प्रार्थनाही पाहायला मिळते. ज्यांना हाकलून ज्यांची संपत्ती आणि संस्कृती आपलीशी केली, त्यांनाच आर्य दुषणे देऊ लागले, असं ॲलीस अल्बिनिया यांनी आपल्या ‘सिंधूतील साम्राज्य’ या पुस्तकात म्हटलेलं आहे.

💐
संदर्भ –

१. दास-शुद्रांची गुलामगिरी – काॅ. शरद पाटील
२. दास-सूद्रांची गुलामगिरी – काॅ. शरद पाटील
३. प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता व भारतीय समाजवाद खंड – ४, काॅ. शरद पाटील,
वरील तीनही ग्रंथांचे प्रकाशक – डॉ. सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरूर (पुणे)
४. सिंधूतील साम्राज्य – ॲलिस अल्बिनिया, मराठी अनुवाद – शाम नारायण पाठक, इंडस सोर्सबुक्स, दुसरी आवृत्ती, नोव्हेंबर २०२०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading