November 14, 2024
Dummy Struglar article by Kiran Mane
Home » सलाम तात्सुया… सलाम अकिरा…
मनोरंजन

सलाम तात्सुया… सलाम अकिरा…

अभिनेता बनू इच्छिणार्‍या ज्या मुलांना अभिनय म्हणजे काय… देहबोली… कॅरॅक्टरच्या मनात येणारे विचार आणि त्याचा परिणाम म्हणून अभिनेत्याच्या चेहर्‍यावर झरझर बदलणारे भाव… या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी हा सीन जरुर पहावा …

किरण माने

एखाद्या सिनेमात, एखादा नट एखादा सिन असा काही अफलातून करतो… की आयुष्यभर तो अभिनयाचा आविष्कार काळजाच्या कुठल्यातरी कप्प्यात रूतून बसतो !
असाच एका जबराट जपानी सिनेमात एका भन्नाट अभिनेत्यानं असा काय झन्नाट अभिनय केलाय की तो सिन आठवूनसुद्धा अंगावर काटा येतो ! सगळं जग ज्याला झुकून सलाम करतं अशा बाप दिग्दर्शक अकिरा कुरोसावाचा हा सिनेमा – ‘कागेमुशा’… आणि तो अभिनेता आहे तात्सुया नाकादाई.

‘कागेमुशा’ म्हणजे ‘डुप्लीकेट’ किंवा ‘डमी योद्धा’.
सिनेमात युद्ध सुरु असताना एक राजा मरतो… पण ही गोष्ट शत्रूपक्षाला माहिती नसते. शत्रूला हे कळलं तर ते या गोष्टीचा फायदा घेऊन आपलं राज्य बळकावतील अशी चिंता सगळ्यांना लागते. त्याचवेळी सेम टू सेम राजासारखा दिसणारा एक भुरटा चोर आणला जातो. थोडीशी बावळटपणाची झाक असलेला हा सटरफटर चोर्‍या करणारा माणूस असतो. त्याला डुप्लीकेट राजा बनवायचं ठरतं !

….त्या बावळट, अर्धवट बुद्धीच्या चोराला तातडीनं अनेक राजेशाही गोष्टींचं ट्रेनिंग देण्यात येतं. राजासारखं बोलणं-चालणं-वागणं… सगळं अतिशय बारकाईनं शिकवलं जातं. एका बाजूला रणांगणात युद्ध सुरु असतानाच राजवाड्यात हे सुरू असतं. शेवटी त्याला राजाचा वेश चढवला जातो आणि रणांगणात असलेल्या राजाच्या आसनावर त्याला बसवतात.

…एका अतिशय बावळट, गबाळ्या, वेडसर दिसणार्‍या भुरट्या चोराला भर रणांगणात असं सांगीतलं जातं की “तू आमचा राजा आहेस !”
….आणि एक अप्रतिम, मोठ्ठा, नि:शब्द शाॅट सुरु होतो. दिग्दर्शकानं त्या आसनावर बसलेल्या अभिनेत्यासमोर कॅमेरा ठेवून ‘रोल’ केलाय… बास. कुठंही कॅमेर्‍याची हलवाहलवी नाही… विविध ॲंगल्सची सर्कस नाही… आणि एडीट नाही की ‘कट’ नाही… शाॅट मध्ये फक्त आणि फक्त शुद्ध अभिनयाची कम्म्माल आहे ! मूर्ख भासणारा एक अघळपघळ माणूस हळूहळू ‘राजा’सारखा दिसू लागतो… बघता-बघता तो नखशिखान्त-अंतर्बाह्य बदलून जातो ! असं वाटतं की त्याने राजाचा फक्त मुखवटा चढवलेला नाही तर आत्मा, अंतरात्मा, ह्रदय, बुद्धी सगळ्यासकट तो खराखुरा ‘राजा’ झाला आहे !

अभिनेता बनू इच्छिणार्‍या ज्या मुलांना अभिनय म्हणजे काय जाणून घ्यायचे असेल त्यांनी… देहबोली… कॅरॅक्टरच्या मनात येणारे विचार आणि त्याचा परिणाम म्हणून अभिनेत्याच्या चेहर्‍यावर झरझर बदलणारे भाव… या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी हा सीन जरुर पहावा …

आज आपल्या फिल्ममेकर्सच्या दिमतीला अत्याधुनिक कॅमेरे आहेत… एडिटिंग, काॅम्प्युटर ग्राफिक्स पासून ए. आय. पर्यन्तची नवनविन तंत्रं हात जोडून उभी आहेत… पण एखाद्या क्लायमॅक्स गाठणार्‍या क्षणी कॅमेरा एका जागी स्थिर ठेवून एखाद्या प्रतिभावान अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून घेत असा एखादा सिन लिहीला जात नाही. असा सिन घेतलेला किमान मला तरी आठवत नाही.

अकिरा कुरोसावा या दिग्दर्शकानं अशी लै धाडसं केली म्हणून तर कॅमेर्‍याची ताकद जगाला कळली.
सलाम तात्सुया… सलाम अकिरा…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading